बांगलादेशच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात काही दिवसांपूर्वी जी कथित चर्चा झाली, तिच्या तपशिलाबाबत दोन्ही देशांनी प्रसृत केलेल्या निवेदनांत तफावत असल्याचा मुद्दा गाजतो आहे. बांगलादेशातील परिस्थिती आणि त्या देशातील हिंदूंची सुरक्षितता या मुद्द्यांचा अंतर्भाव संभाषणात होता, असे भारताच्या परराष्ट्र खात्याने प्रसृत केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र असा उल्लेख व्हाइट हाऊसच्या संकेतस्थळावर, याच संभाषणाबाबतच्या निवेदनात नाही. यावरून खरोखरच मोदी आणि बायडेन बांगलादेशातील हिंदूंविषयी बोलले का, याविषयी शंका उपस्थित झाल्या. त्यावर परराष्ट्र मंत्रालयाने नाराजीवजा खुलासा करताना, निवेदनात सारे तपशील दिले जात नाहीत आणि दोन देशांची निवेदने वेगवेगळी असू शकतात, असे म्हटले. या असल्या गोंधळाचे तसे काही प्रयोजन नाही. शेख हसीना यांच्या पदत्याग व देशत्यागानंतर बांगलादेशात हिंदूंच्या मत्तांवर, मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताने चिंता व्यक्त केली. पण याविषयी त्या देशातील हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनीही संवेदनशीलता दाखवली असून, स्वत:हून काही मंदिरांना भेटी दिल्या व त्यांच्या सुरक्षिततेविषयी हमी दिली. तरीदेखील बांगलादेशातील हिंदूंची चिंता वारंवार व्यक्त करण्याची गरज भारतातील अनेक नेत्यांना का वाटावी? शेख हसीना या भारतमित्र होत्या, म्हणजे त्या हिंदुमित्र आहेत असा समज तेथील काही मूलतत्त्ववाद्यांचा होत असेल, तर त्यास नाइलाज आहे. मूलतत्त्ववादी मंडळींनी विवेक आणि विचार अशा दोहोंचा त्याग केलेला असतो. पण तेथील हिंदूंच्या सुरक्षिततेविषयी आपण अमेरिकेसमोर गाऱ्हाणे मांडून अनेक संकेतांचा भंग करतो का, याचाही विचार करावा लागेल. भारतातील मुस्लीम असुरक्षित आहेत असे कोणत्याही देशाने किंवा देशातील नामदारांनी म्हटल्यावर इथल्या सरकारदरबारींचा तिळपापड होतो. त्यात गैर नाही. भारत हा सार्वभौम देश आहे आणि येथील सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षा व समृद्धीविषयी संवेदनशील आणि सक्षम आहे ही धारणा त्या नाराजीमागे असते. बांगलादेश हाही सार्वभौम देश आहे आणि तेथील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेविषयी अद्याप तरी संवेदनशील आहे, असे मानावयास जागा आहे.

भारताच्या दृष्टीने या संपूर्ण अध्यायात काही अडचणीच्या बाबी आहेत. एक तर आपण आश्रय दिला, त्या शेख हसीनाबाईंचे काय करायचे, हा प्रश्नच आहे. हसीनांविरोधात बांगलादेशातील न्यायालयात एक किंवा अधिक खटले सुरू झाले, तर आपली पंचाईत होईल. अशा वेळी आपण हसीनांना थारा देणे ही निव्वळ राजकीय बाब ठरणार नाही. ब्रिटनसारख्या पाश्चिमात्य देशांनी त्यांना राजकीय आश्रय देणे नाकारले आहे. शिवाय दलाई लामांसारख्या एका राजकीय शरणार्थीला आश्रय देणे अनेकदा अडचणीचेच ठरते, हेही दिसून आले आहे. दलाई लामांसारखा आगाऊ उत्साह हसीनाबाईदेखील दाखवू लागल्या, तर ते आपल्यासाठी डोईजडच ठरेल. तशात पुन्हा योगी आदित्यनाथ, हेमंत बिस्व सर्मांसारख्या नेत्यांची वक्तव्ये आगीत तेल ओतणारी ठरत आहेत. बंगालमधील अनेक हिंदू राजकीय अभ्यासकांच्या मते, बांगलादेशातील हिंदू असुरक्षित असल्याच्या वृत्तांमध्ये सर्वस्वी तथ्य नाही. अशा बातम्या प्राधान्याने देशातील हिंदुत्ववादी संघटना आणि अनिवासी भारतीयांमधील बिगर-बंगाली पसरवत आहेत. शिवाय बांगलादेशातील हिंदू धोक्यात असल्याचे दावे बांगलादेशात या हिंदूंसाठी छातीचा कोट करणाऱ्या मुस्लिमांसाठी आणि हसीनांविरोधात तेथील मुस्लीम विद्यार्थ्यांबरोबरीने उतरलेल्या हिंदू विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असल्याचा इशारा या बंगाली, हिंदू विश्लेषकांनी दिला आहे.

mohhammad mizzu meet india
भारतविरोधी भूमिका घेणारे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष भारत दौर्‍यावर; या दौर्‍यामागील त्यांचा उद्देश काय?
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
Hindenburg on Madhabi Puri Buch
‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांना संसदेच्या लोकलेखा समितीचे समन्स; हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी होणार?
PM Modi visit Thane on Saturday Mahayutti office bearers defaced Ghodbunder with placards
पंतप्रधानांच्या सभेपूर्वी घोडबंदर विद्रुप, मोदी हेलेकाॅप्टरने येणार तरीही अतिउत्साही पदाधिकाऱ्यांची घोडबंदरभर फलकबाजी
BJP questioned Rahul Gandhi after a corruption case was filed against Siddaramaiah
सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल
PM Narendra Modi US visit, Narendra Modi US,
अमेरिकेने भारताला ‘गिऱ्हाईक’ समजू नये…
tirupati temple animal fat in laddoos row
चंद्राबाबू नायडूंच्या आरोपानंतरही तिरुपती मंदिरातील लाडूच्या विक्रीवर परिणाम नाही; गेल्या चार दिवसांत विकले गेले तब्बल ‘इतके’ लाडू
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”

तेव्हा गोंधळ आणि गोंधळी अशा दोहोंना थारा न देता सम्यक विचार आणि सदसद्विवेकबुद्धीने परिस्थिती हाताळण्याची गरज आहे. बांगलादेशात तेथील अल्पसंख्याकांविरोधात हंगामी सरकारच्या संमतीने आणि भागीदारीने अन्याय होत असेल, तर त्याबद्दल बांगलादेशाच्या कोणत्याही नेत्याशी संवादाचा मार्ग आपण खुला ठेवू शकतोच. त्यासाठी आपण किंवा बांगलादेश याव्यतिरिक्त तिसऱ्या देशाकडे हा मुद्दा नेण्याची काहीही गरज नाही. बांगलादेशातील काही हिंदू शिक्षकांना सक्तीने नोकऱ्या सोडायला लावणे किंवा हिंदू मंदिरे वा मत्तांची नासधूस करणे या प्रकारांबद्दल आपण तेथील सरकारकडे विचारणा करू शकतो. यासाठी इथल्या काही नेत्यांच्या बेताल आणि बेजबाबदार वक्तव्यांना आवर घालणे हेही आपले कर्तव्य आहे हे सरकारने विसरता कामा नये.