न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारताचे रोहित शर्मा, विराट कोहली आदी रथी-महारथी फलंदाज पुण्यातील मैदानावर नांग्या टाकत असताना त्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री हळूच भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीचा संघ जाहीर करण्यात आला. रात्री उशिरा आलेल्या त्या ई-मेलच्या माध्यमातून जगापर्यंत माहिती पोहोचवण्याचे सोपस्कार उरकून टाकले गेले. न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपण्याआधी असे का केले गेले, याविषयी खुलासा वगैरे करण्याची विद्यामान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची परंपरा नाही. कदाचित ही तारीख पूर्वनिर्धारित होती. ती जेव्हा ठरवली गेली त्यावेळी न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरूच झाली नसेल. कदाचित मालिका गमावण्याची नामुष्की आपल्यावर येईल, असे बीसीसीआयला किंवा निवड समितीला वाटले नसेल. गेलाबाजार ती ०-३ अशी गमवावी लागेल याची तर शक्यताही त्यांनी गृहीत धरली नसेल. पण त्यावेळची परिस्थिती पाहून हा निर्णय पुढे ढकलता आला असता. बेंगळूरुतील कसोटी भारताने गमावली होती. पुण्यात पहिल्या डावात १५६ धावांपर्यंत भारताला कशीबशी मजल मारता आली. त्या सामन्यात आपण पिछाडीवर होतो. दिवसअखेरीस न्यूझीलंडने अडीचशेहून अधिक धावांची आघाडी घेतली आणि त्यांचा निम्मा संघ बाद व्हायचा होता. म्हणजे भारत सामनाच नव्हे, तर मालिका गमावण्याचीही शक्यता होती. १२ वर्षे आणि १८ मालिका वगैरे अपराजित राहिलेला भारतीय संघ मालिका गमावण्याच्या स्थितीत असताना, त्या परिस्थितीची जराही दखल घेण्याची गरज बीसीसीआयला वाटली नाही. यापूर्वीही ऐन मालिकेदरम्यान इंडियन प्रीमियर लीगचे लिलाव वगैरे पुकारण्याचे प्रकार झालेले आहेत. कोटी-कोटी किंवा लक्ष-लक्षच्या बोली लागत असताना (किंवा नसताना) कोणता खेळाडू सामन्यावर लक्ष केंद्रित करू शकेल, अशी विचारणा त्यावेळीही झाली होती.

किंवा कदाचित न्यूझीलंडविरुद्धची मालिका हेच प्रमाण प्रगतिपुस्तक मानले गेले, तर अनेकांची खैर नाही याची कुणकुण आपल्या क्रिकेटधुरीणांना लागली असावी. यातून झाले असे की, कसोटी मालिकेचे गांभीर्य राहिले नाहीच. पण ती अशा प्रकारे हातातून निसटून जात आहे याचे भानही उरले नाही. ९१ वर्षांमध्ये प्रथमच भारताने मायभूमीत तीन सामन्यांची मालिका ०-३ अशी गमावली. नवीन सहस्राकात भारतीय संघ मायदेशी उत्तम कसोटी क्रिकेट खेळतो असे आकडेवारी सांगते. या काळात केवळ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन देशांनी भारताला कसोटी मालिकेत हरवून दाखवले आहे. पण त्या मालिका इतक्या एकतर्फी नव्हत्या. शिवाय न्यूझीलंडसह इतर कोणत्याही देशाला मालिका जिंकता आली नव्हती. त्यामुळे न्यूझीलंडला आपण गांभीर्याने घेतले नाही किंवा ती ०-३ अशी गमावू असेही आपल्याला वाटले नाही. पहिल्या कसोटीत पहिल्या डावात भारतीय संघ ४६ धावांमध्ये गारद झाला, तेव्हाच खरे म्हणजे काहीतरी मोठी त्रुटी आपल्या नियोजनात आहे हे दिसून आले होते. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात भारतीय संघ ३६ धावांत गारद झाला, त्यावेळचा प्रतिसाद आणि आताचा प्रतिसाद यात मोठी तफावत होती. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर नेहमीचे प्रारूप वापरले गेले. अलीकडे अनेकदा आपण भारतीय मैदानांवरही सुरुवातीची कसोटी गमावत आहोत. मग पुढील कसोटींसाठी कुस्तीचा आखाडा वाटावा अशी फिरकी-स्नेही खेळपट्टी बनवायची आणि त्यावर प्रतिस्पर्धी संघाला लोळवायचे हे सूत्र ठरून गेले होते. यासाठी आपल्या फलंदाजीचे नाणे खणखणीत वाजणे गरजेचे होते. ते वाजलेच नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज फलंदाजांना संपूर्ण मालिकेत मिळून अनुक्रमे ९३ आणि ९१ धावाच करता आल्या! जेथे या बड्यांची त्रेधा उडाली, तेथे युवा आणि अननुभवी फलंदाजांकडून काय अपेक्षा बाळगायची? फिरकी खेळपट्ट्यांवर प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी घेऊ शकतील अशी अपेक्षा आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्याकडून एका तपानंतरही बाळगत राहणे हे त्यांच्यासाठी अन्यायकारक आहे. गौतम गंभीरसारख्या प्रशिक्षकाच्या राष्ट्रीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच इतकी सुमार कामगिरी होणे त्याच्या क्षमतेविषयीदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करते. फिरकीस पोषक खेळपट्ट्या बनवून प्रतिस्पर्धी संघांना गुंडाळण्याची ठरलेली, बोथट झालेली क्लृप्ती आपण वापरत राहिलो. अखेरीस न्यूझीलंडच्या संघाने भारताचीच ‘फिरकी’ घेतली!

Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत
Story img Loader