‘मी तुम्हाला विनंती करतो, की स्टेडियममध्ये या आणि भारताचा फुटबॉल सामना पाहा. तुमचा वेळ वाया जाणार नाही, ही खात्री आम्ही देतो. भारतीय फुटबॉलवरील तुमचा विश्वास कमी झाला आहे, मला ठाऊक आहे; पण केवळ समाजमाध्यमांवरून टीका करण्यात काय मजा! स्टेडियममध्ये या, आम्हाला प्रोत्साहन द्या, आम्ही नाही चांगले खेळलो, तर आमच्यावर जरूर ओरडा. कोणी सांगावे, आम्ही तुम्हाला बदलू शकू आणि आमच्यावर टीका करणारे तुम्ही, आम्हाला डोक्यावर घेणारे झालेले आम्ही पाहू शकू..’ सन २०१८ मध्ये इंटरकॉन्टिनेन्टल करंडक स्पर्धेच्या वेळी भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने  केलेले हे आवाहन फुटबॉल प्रेक्षकांनी ऐकले, भारताच्या पुढच्या सामन्यांना प्रेक्षकांनी जोमाने हजेरी लावली. ही स्पर्धा भारत सुनील छेत्रीच्याच नेतृत्वाखाली जिंकला. छेत्री निवृत्त होत असताना या प्रसंगाची उजळणी अशासाठी महत्त्वाची की, भारतीय फुटबॉल प्रवासात गेल्या दोन दशकांत जे काही चमकते क्षण आले, त्याचे निर्माणिबदू सुनील छेत्री या व्यक्तिमत्त्वात आहेत. इतकेच नाही, तर १९९५ पासून बायचुंग भुतियाने भारतीय फुटबॉलमध्ये आणलेली जी जान होती, तिचा दमसास टिकविण्यातही छेत्रीची कळीची भूमिका आहे.

भारतीयांना कोणत्याही खेळात एखादा तारा लागतो. क्रिकेटने अनेक दिले. हॉकीत काही काळापूर्वीपर्यंत होते. फुटबॉलमधील शोधण्यासाठी खूप मागे जावे लागते. मुळात पश्चिम बंगाल, केरळ, गोवा आणि ईशान्य भारत सोडला, तर फुटबॉल भारतात तितकासा लोकप्रिय नव्हता. तरी पन्नासच्या दशकात पी. के. बॅनर्जी, चुनी गोस्वामी, बगाराम आदींमुळे जगात भारतीय फुटबॉलचा डंका वाजत होता. १९५६ च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये आपण उपान्त्य फेरीपर्यंतही पोचलो होतो. अर्थात, असा जिंकणारा संघ घडविण्यात मार्गदर्शक सइद अब्दुल रहीम यांचाही मोठा वाटा होता. तरीही ‘भारतीय संघाने अनवाणी खेळण्याची मागणी केली म्हणून १९५० च्या फुटबॉल विश्वकरंडकात आपल्याला स्थान मिळाले नाही,’ वगैरे दंतकथांमध्येच आपला फुटबॉल इतिहास झाकोळला आहे. आपण १९४८ च्या ऑलिम्पिक स्पर्धात अनवाणी खेळलोही; पण विश्वकरंडकात न जाण्याचे कारण ते नव्हते. १९५० च्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी ब्राझीलने आपल्याला निमंत्रण धाडले, संघाचा खर्चही करायची तयारी दर्शवली होती; पण अ. भा. फुटबॉल महासंघाला जहाजाने अर्धी जगप्रदक्षिणा करून अशा ‘छोटय़ा स्पर्धे’त संघ पाठवणे महत्त्वाचे वाटले नाही. या स्पर्धेपेक्षा ऑलिम्पिक महत्त्वाचे आहे, या कारणाखाली संघ गेला नाही! एखाद्या खेळाचे बहरणे कसे खुडले जाऊ शकते, त्याचे हे उत्तम उदाहरण.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta anvyarth intercontinental cup tournament indian captain sunil chhetri football amy
First published on: 20-05-2024 at 01:05 IST