जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) निवडणूक निकालाची जितकी चर्चा होते तितकी देशातील कुठल्याच विद्यापीठातील निवडणुकांची होत नाही. अनेक विद्यापीठांत विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकाही होत नाहीत. ‘जेएनयूएसयू’च्या पदाधिकाऱ्यांवर देशविरोधी असल्याचा, शहरी नक्षल असल्याचा आरोप कितीही केला तरी, याच संघटनेच्या माध्यमातून विद्यापीठातील आणि किंबहुना देशातील लोकशाही टिकवू शकते याची प्रचीती येते. गेल्या आठवड्यात झालेल्या ‘जेएनयूएसयू’च्या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष महासचिव आणि संयुक्त सचिव ही प्रमुख चारही पदे डाव्या विद्यार्थी संघटनांच्या आघाडीने जिंकली.

गेल्या वर्षी संयुक्त सचिवपद भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेला (अभाविप) मिळाले होते. पण, या वर्षी ‘एआयएसए’, ‘एसएफआय’ आणि ‘डीएसएफ’ या तीनही संघटनांनी आघाडी करून ‘अभाविप’ला एकही केंद्रीय पद मिळवून दिले नाही. यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे ४७ पैकी बहुतांश कौन्सिलर्सची पदेदेखील डाव्यांनी जिंकली. ‘जेएनयू’मध्ये स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, स्कूल ऑफ लँग्वेजेस आणि स्कूल ऑफ सोशल सायन्सेस या तीन महत्त्वाच्या शैक्षणिक विभागांत ‘अभाविप’ला एकही कौन्सिलरपद मिळाले नाही; हे पाहिले तर या वेळी ‘जेएनयू’मध्ये विद्यार्थ्यांनी अभाविपच्या आक्रस्ताळेपणाला नाकारल्याचे स्षष्ट होते. तसेही दिल्ली विद्यापीठातील हिंदुत्वाच्या, राष्ट्रावादाच्या उग्रपणाला ‘जेएनयू’मध्ये मवाळ करावे लागते हे ‘अभाविप’ला कळते. ‘जेएनयू’मध्ये आरक्षणाविरोधात तितकी आक्रमक भूमिका घेता येत नाही. तरीही ‘अभाविप’ने गेल्या वेळी असलेले पदही यंदा गमावले. गेल्या काही वर्षांपासून संघ-भाजपने ‘जेएनयू’ला हिंदुत्वाचा आखाडा बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. तो डाव्या विद्यार्थी संघटना सातत्याने फोल ठरवत आहेत. इथले विद्यार्थी कडवा विरोध कसा करतात हे ‘जेएनयूएसयू’च्या निवडणुकीच्या निकालातून दिसतेे. कोविडचे कारण देत या निवडणुकीवर प्रशासनाने बंदी घातली होती. गतवर्षी विद्यार्थ्यांनी तीव्र संघर्ष करून निवडणुका घेण्यास प्रशासनाला भाग पाडले. ‘जेएनयू’मध्ये बहुतांश विद्यार्थी सर्वसामान्य परिस्थितीतून आलेले असतात. स्वत:च्या हक्कांसाठी त्यांचा हा लढाच ‘जेएनयू’चे बुरुज कोसळण्यापासून वाचवत आहे असे म्हणावे लागते!

देशातील अनेक शैक्षणिक संस्था-संघटना संघविचारांना बळी पडल्यानंतरही ‘जेएनयू’ने डाव्या विचारांची कास सोडलेली नाही हे सत्ताधाऱ्यांना खटकत नसेल असे म्हणणे अतिशयोक्तीच ठरेल. ‘जेएनयू’चे आजी-माजी असे सलग दोन कुलगुरू संघविचारांशी निगडित आहेत. संघाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांची ऊठबस असते. त्यांच्यामार्फत संघ-भाजपला ‘जेएनयू’मध्ये आपले विचार रुजवायचे आहेत हे लपून राहिलेले नाही. काही वर्षांपूर्वी उजव्या विचारांच्या संघटनांच्या सदस्यांनी ‘जेएनयू’च्या आवारात घुसून केलेला हिंसाचार पाहिला तर जरब बसवण्यासाठी सत्ताधारी कुठल्या स्तराला जाऊ शकतात याचे प्रत्यंतर घडले होते. तरीही ‘जेएनयूएसयू’मध्ये ‘अभाविप’चा पराभव होतो ही बाब पुरेशी बोलकी म्हणता येईल. दोन वर्षांत ‘अभाविप’ने उसळी मारलीच नाही असे नव्हे, त्यांनी सर्वशक्तीनिशी निवडणूक लढवली. पण डाव्या संघटनांना एकत्र येण्याचे शहाणपण सुचल्याने निवडणूक त्यांच्या हातून निसटली नाही. यंदाच्या निवडणुकीत निधी कपात आणि ग्रंथालयातील पाळत हे दोन मुद्दे प्रभावी होते. ‘जेएनयू’चे ग्रंथालय दिल्लीतील काही महत्त्वाच्या ग्रंथालयांपैकी एक. ते रात्रंदिवस उघडे असते. तिथे आजी-माजी विद्यार्थी येऊन संदर्भांचा उपयोग करत असतात. तिथे आता देखरेख ठेवली जात आहे. यामागे अप्रत्यक्षपणे भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा तर प्रयत्न नाही ना असे विद्यार्थी विचारू लागले आहेत. गाझा, पॅलिस्टिन, उमर खालिदची अटक हे संघ-भाजपला नको असलेले विषय ‘जेएनयू’त चर्चिले जाणारच. वादग्रस्त विषयांवर विद्यापीठात खुलेपणाने चर्चा होणार नसेल तर कुठे होणार?

निधी कपातीमुळे काही वर्षांत जेएनयूला आर्थिक चणचण भासू लागली आहे. ‘जेएनयूटीएस’ या प्राध्यापकांच्या संघटनेने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, ‘जेएनयू’चा निधी ३६ टक्क्यांनी कमी झालेला आहे. २०१५-१६ मधील ३१ कोटींचा निधी २०२१-२२ मध्ये १२.७८ कोटी रु.वर आला. सात वर्षांत १८ कोटींची निधीकपात. देशातील या अग्रगण्य विद्यापीठाला मोदी सरकार पुरेसा निधी देत नसेल तर ही बाब संघ-भाजपचा आकस असल्याच्या आरोपांना पुष्टी देणारी ठरते. संशोधन, अभ्यास दौरे, ग्रंथालयातील आवक, प्रयोग, चर्चासत्रे, शिष्यवृत्ती अशा सगळ्याच बाबींवरील खर्च कमी होत गेला आहे. त्याचा परिणाम शैक्षणिक दर्जावर होण्याचा धोका आहे. त्याविरोधातील लढाई ‘जेएनयूएस’मध्ये निवडून आलेल्या विद्यार्थी सदस्यांना लढावी लागणार आहे. जेएनयूचा किल्ला अजून शाबूत आहे, पण, बुरूज कोसळू नये याची दक्षता डाव्या विद्यार्थी संघटनांना घ्यावी लागेल, त्यासाठी त्यांच्यातील ऐक्यही गरजेचे असेल.