पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री तसेच राज्यांचे मंत्री यांना कोणत्याही गुन्ह्यात अटक झाली आणि सलग ३० दिवस तुरुंगात राहावे लागल्यास ३१व्या दिवशी त्यांना आपोआप ‘पदास अपात्र’ ठरवण्याची तरतूद असलेल्या १३०व्या घटना दुरुस्ती विधेयकाची छाननी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीवर बहिष्कार घालण्यावरून विरोधी इंडिया आघाडीत सहमती होऊ शकलेली नाही. विधेयक संसदेत मांडण्यात आले तेव्हाच सर्व विरोधी पक्षांनी या कायद्याचा सत्ताधारी भाजपकडून दुरुपयोग होण्याची भीती व्यक्त केली होती. द्रमुक, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी आदी विरोधी पक्षांनी कायद्याच्या विरोधात भूमिका घेतल्याने काँग्रेसनेही संयुक्त संसदीय समितीत सहभागी होण्यास नकार दिला. इंडिया आघाडीत अपवाद फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा. पक्षाने संयुक्त संसदीय समितीत सहभागी होण्यास होकार दिल्याने सुप्रिया सुळे यांची समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. ‘बहिष्काराबाबत काँग्रेसने आमच्याशी काहीच चर्चा केलेली नाही,’ असा सुप्रिया सुळे यांचा दावा आहे. सदस्यीय संयुक्त संसदीय समितीत विरोधी पक्षाच्या फक्त तीन सदस्यांचा समावेश असेल. काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी या समितीवर नाहीत; ‘बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र समितीही नाहीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने इंडिया आघाडीच्या विरोधी भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाच्या चौकशीसाठी संसदेची संयुक्त समिती नेमावी, अशी मागणी काँग्रेससह विरोधकांनी लावून धरली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाकडून होणारी चौकशी अधिक प्रभावी ठरेल’, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी केली असता शरद पवारांनी या मागणीला पाठिंबा दिला नव्हता. संवेदनशील विषयांवर उघड चर्चा नको, अशी पवारांची भूमिका होती. राष्ट्रवादीने १३०व्या घटना दुरुस्तीवरूनही इंडिया आघाडीच्या विरोधी भूमिका घेतली आहे. संयुक्त संसदीय समितीत सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना ‘भाजप आणि भाजपचा ब संघ’ अशी उपमा काँग्रेसने दिली आहे.
पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकेल अशा गुन्ह्यांमध्ये अटकेनंतर सलग ३० दिवस तुरुंगात राहावे लागल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्र्यांना आपोआपच अपात्र ठरविण्याची कायद्यात तरतूद केली जाणार आहे. तसे विधेयक गृहमंत्री अमित शहा यांनी पावसाळी अधिशवेशनात मांडले होते. या संदर्भातील तीन स्वतंत्र विधेयकांची चिकित्सा करण्यासाठी ही विधेयके संयुक्त संसदीय समितीसमोर पाठवण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केले होेते. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समितीचा अहवाल लोकसभेत मांडण्याची योजना होती. पण समिती स्थापन करण्यास झालेला विलंब लक्षात घेता अहवाल पुढील १५ दिवसांमध्ये तयार होण्याबाबत साशंकता आहे. अर्थात, भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाची इच्छा असेल तसेच समितीबाबतही घडेल.
मोदी सरकारच्या काळात गैरव्यवहार व पैशांच्या अफरातफरीवरून दिल्लीचे अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे हेमंत सोरेन या दोन मुख्यमंत्र्यांना ईडीने अटक केली होती. यापैकी सोरेन यांनी तुरुंगात जाण्यापूर्वी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला होता. केजरीवाल यांना अटक झाल्यावर पाच महिन्यांनंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या पाच महिन्यांच्या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वत:कडे कायम ठेवले होते. राज्यात नवाब मलिक यांनीही अटकेनंतर मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. लालूप्रसाद यादव, जयललिता, चंद्राबाबू नायडू, मधू कोडा या माजी मुख्यमंत्र्यांना गैरव्यवहारावरून अटक झाली, पण अटकेनंतर कोणीही पदावर नव्हते. तुरुंगात असताना मुख्यमंत्रीपद कायम ठेवणे हे नैतिकदृष्ट्या अयोग्यच. पण विरोधी नेत्यांचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांना अटक केली जाऊ शकते, ही विरोधी पक्षांची भीती निरर्थक नाही. म्हणून तुरुंगात गेल्यावरही पद कायम ठेवणे कितपत योग्य याचाही विचार होणे आवश्यक आहे.
संसदेच्या उभय सभागृहांमध्ये भाजप वा एनडीएकडे पुरेसे संख्याबळ असल्याने सलग ३० दिवस तुरुंगात काढावे लागल्यास ३१व्या दिवशी अपात्र ठरवण्याची तरतूद असलेला कायदा मंजूर होण्यास काहीच अडथळा येणार नाही. अशा वेळी संयुक्त संसदीय समितीत सहभागी होऊन विधेयकात काही दुरुस्त्या सुचवण्याची विरोधकांना संधी होती. राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात बोफोर्स तोफा खरेदीच्या व्यवहाराच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीवर भाजप व विरोधकांनी बहिष्कार घातला होता, अशी आठवण काँग्रेसने आता करून दिली आहे. यापेक्षा गंभीर आक्षेपाची अपेक्षा प्रमुख विरोधी पक्षाकडून करता येत नाही; कारण भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या सोयीचे राजकारण करतात. संयुक्त संसदीय समितीच्या निमित्ताने केवळ विरोधकांतली दुफळीच नव्हे, तर राजकारण आणि नैतिकता यांतली दरीही दिसून येते आहे.
