धर्मगुरू, साहित्यिक आणि सामाजिक त्यातही पर्यावरणवादी कार्यकर्ते या तशा एकमेकांपासून वेगवेगळ्या असणाऱ्या भूमिका. कारण धर्मगुरू सहसा समाजकारणात शिरत नाहीत. सामाजिक कार्यकर्ते किंवा साहित्यिक एकमेकांच्या क्षेत्रात ‘लुडबूड’ करताना दिसत नाहीत. पण या तीनही भूमिका खऱ्या अर्थाने आणि परिणामकारकरीत्या जगलेले व्यक्तिमत्त्व म्हणून फादर प्रान्सिस दिब्रिटो यांचे योगदान कधीच नाकारता येणार नाही. १९७२ पासून ते वसईत ख्रिाश्चन धर्मगुरू होते. ‘सुवार्ता’ या मराठी मासिकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले. ‘सुबोध बायबल’ असे बायबलचे मराठीत रूपांतर केले. धर्मगुरू म्हणून वावरताना स्थानिक भाषेशी, स्थानिक संस्कृतीशी जोडून घेण्याची त्यांची वृत्ती थेट फादर स्टीफन्स यांच्याशी नातं सांगणारी ठरली. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मराठीतून विपुल लेखन केले. ‘नाही मी एकला’ हे त्यांचे आत्मकथनही प्रसिद्ध आहे. त्यांची ही साहित्यसेवा त्यांना ९३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन गेली. असे अध्यक्षपद भूषवणारे फादर द्रिब्रिटो हे एकमेव धर्मगुरू. विशेष म्हणजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड सर्व विभागांतून सहमतीने झाली होती. वसईतील ख्रिास्ती समाजाने जास्तीत जास्त मराठीचा वापर करावा यासाठी त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक बिशप थॉमस डाबरे आणि फादर दिब्रिटो यांच्या प्रयत्नांमुळे वसईतील ख्रिास्ती समाजात मराठीचा प्रसार झाला. या सगळ्याच्या दशांगुळे उरेल अशी कामगिरी फादर दिब्रिटो यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात केली. १९८५ नंतर मुंबईतील जागांचे भाव गगनाला भिडले होते. साहजिकच राजकारणी-बिल्डर मंडळींचा डोळा निसर्गरम्य अशा वसई-विरारवर केंद्रित होता. वसईच्या हरित पट्ट्यातील २८५ भूखंडांचे आरक्षण बदलण्यात आले आणि निवासी वापराकरिता परवानगी देण्यात आली. माजी विरोधी पक्षनेत्या मृणालताई गोरे, प. बा. सामंत, वर्टी सर यांनी वसईतील ‘भूखंडाचे श्रीखंड’ अशी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या सरकारवर जोरदार टीका केली होती. त्याच दरम्यान ठाणे जिल्ह्यात राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची बीजे रुजू लागली होती. वसईत भाई ठाकूर टोळीची दहशत वाढली होती. हरित पट्ट्यातील जमिनी विकण्यासाठी शेतकऱ्यांना धमकावले जात होते. वसई तालुक्यात जमीन विक्रीच्या व्यवहारात अपप्रवृत्ती घुसल्या होत्या. या विरोधात आवाज उठविला तो फादर दिब्रिटो यांनी. या पट्ट्यातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढाकार घेऊन त्यांनी ‘हरित वसई संरक्षण समिती’ची स्थापना केली. वसईतील दहशतवादाला विरोध करण्यासाठी फादर दिब्रिटो यांच्या हरित वसई संरक्षण समितीने १ ऑक्टोबर १९८९ रोजी मोर्चा काढला. या मोर्चात २५ ते ३० हजार नागरिक सहभागी झाले होते. हळूहळू ही चळवळ विस्तारत गेली. १९९० मध्ये ‘सिडको’ने वसईचा विकास आराखडा तयार करून मसुदा जाहीर केला. यातून पर्यावरणाची मोठी हानी होऊन काँक्रिटचे जंगल उभे राहणार होते. या विरोधात २६ जानेवारी १९९३ रोजी फादर दिब्रिटो यांच्या मार्गदर्शनाखाली वसईत मोठा मोर्चा निघाला. दिब्रिटो यांनी तेव्हा तालुका पिंजून काढत जनजागृती केली होती. शेवटी सरकारला आराखड्यात दुरुस्ती करणे भाग पडले. वसईत टँकर लॉबीचे प्रस्थ वाढले असता फादर दिब्रिटो यांच्या नेतृत्वाखाली पाणी बचाव महिला आंदोलन ही चळवळ उभी राहिली. तेव्हा स्थानिक गुंडांनी या आंदोलनकर्त्यांवर हल्ले केले होते. पण न डगमगता दिब्रिटो यांनी टँकर लॉबीला विरोध केला. शेवटी जिल्हा प्रशासनाला वसई तालुक्यातील पाणी उपस्यावर नियंत्रण आणावे लागले. ठाकूर टोळीची प्रचंड दहशत असताना दिब्रिटो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गांधीवादी मार्गाने लोकचळवळ उभी केली. वसईच्या चर्चमधूनच काही जणांनी फादर दिब्रिटो यांच्या विरोधातच नाके मुरडली होती. पण कार्डिनल सायमन पिमेंटा आणि वसई धर्मप्रांताचे तत्कालीन बिशप थॉमस डाबरे हे फादर दिब्रिटो यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. या सगळ्या काळात वसईला बिल्डर लॉबीने अक्षरक्ष: ओरबडले. पण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जो काही हरित पट्टा अजून शिल्लक आहे त्याचे सारे श्रेय फादर दिब्रिटो यांना द्यावे लागेल. ५० वर्षे धर्मगुरूपद भूषविलेल्या फादर दिब्रिटो यांनी या लोकलढ्याला धार्मिक रंग येऊ दिला नाही की ही चळवळ राजकारण्यांच्या घशात जाऊ दिली नाही.