इराण समर्थित दोन संघटनांच्या म्होरक्यांची दोन दिवसांमध्ये हत्या करून इस्रायलने पश्चिम आशियाला पुन्हा एकदा व्यापक संघर्षाच्या उंबरठ्यावर खेचले आहे. हेजबोला आणि हमास या दोन संघटनांचे म्होरके अनुक्रमे फुआद शुकर आणि इस्मायल हनिये इस्रायली हल्ल्यांमध्ये ठार झाले. यांतील दुसरा म्हणजे इस्मायल हनिये याला तर इराणची राजधानी तेहरान येथे संपवले गेले. हनिये हा इराणचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या शपथविधी समारंभासाठी तेथे गेला होता. मंगळवारी शपथविधी झाला आणि बुधवारी पहाटे हनिये राहात असलेल्या हॉटेलवर लक्ष्यवेधी क्षेपणास्त्रसदृश हल्ला झाला, ज्यात हनिये आणि त्याचा अंगरक्षक ठार झाला. या दुसऱ्या हल्ल्याविषयी इस्रायलने अधिकृतपणे काही म्हटलेले नाही. पण अशा प्रकारचे दूरस्थ हल्ले करून शत्रूला संपवणे ही अलीकडे इस्रायलची नीती राहिलेली आहे. यापूर्वी अशा प्रकारे मृत्युमुखी पडलेल्यांत जसे दहशतवादी गटांचे कमांडर होते, तसेच इराणचे अणुशास्त्रज्ञ किंवा परदेशात तैनात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे जनरलही होते. गेल्या सहा-सात वर्षांत अशा प्रकारे इस्रायली हल्ल्यात खात्मा झालेल्यांची संख्या डझनावारी तरी भरेल. इराणमध्ये सध्या पेझेश्कियान हे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे पूर्वसुरी इब्राहिम रईसी यांच्यापेक्षा ते खूप अधिक नेमस्त मानले जातात. पण आंतरराष्ट्रीय धोरण आणि लष्करी कारवायांच्या बाबतीत पेझेश्कियान यांच्या मताला फारसे वजन नाही. त्या बाबतीत इराणी लष्कर, रिव्होल्यूशनरी गार्ड्स हे विशेष दल इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे मत प्रमाण मानते. एरवीही खामेनी आणि इराणी लष्करी जनरल यांच्यात अधिक युद्धखोर कोण, हे ठरवणे अवघड आहे. इस्रायलला शत्रू क्रमांक एक ठरवून त्याच्या विरोधात लढणाऱ्या गटांना शस्त्र, निधी आणि प्रशिक्षण पुरवणे हे सतत सुरू असते. त्यामुळे इस्रायलमधील हमास आणि इस्रायलच्या उत्तरेस लेबनॉन-स्थित हेजबोला या संघटनांच्या मार्फत इस्रायलविरुद्ध अप्रत्यक्ष युद्ध छेडणे हे इराणचे राष्ट्रीय धोरण आहे. तशात एप्रिल महिन्यात इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करून आपण त्या देशावर थेट हल्ले करू शकतो असे इराणने दाखवून दिले आहे. गतवर्षी ७ ऑक्टोबरला हमासकडून झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या कारवाईत अद्यापही हमास संपलेली नाही आणि तेथे युद्धविरामही जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांत हेजबोलाच्या माध्यमातून इस्रायलच्या उत्तरेस दुसरी आघाडी उघडून त्या देशाला बेजार करण्याचे धोरण इराण आखतो, यातून त्या देशाची युद्धखोरी स्पष्ट होते.

पण या युद्धखोरीस प्रत्युत्तर देण्याची क्षमता आणि खुमखुमी इस्रायल पुरेपूर बाळगून आहे, ही खरी पंचाईत आहे. लेबनॉनच्या भूमीवर हेजबोला कमांडरवर हल्ला होणे वेगळे नि इराणच्या राजधानीत तसा तो होणे आणि त्यात इराणच्या राष्ट्रीय पाहुण्याची हत्या होणे वेगळे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड्या पडल्या की युद्धखोर देश शत्रुदेशावर अधिक बेलगाम कारवाई करण्यालाच मलमपट्टी समजतात. इराण तशा प्रकारे उत्तर देणार ही बाब पश्चिम आशियातील शांततेसाठी प्रयत्न आणि प्रार्थना करणाऱ्यांची हुरहूर वाढवणारी ठरते. दर महिन्यात इस्रायल-हमास आणि इस्रायल-इराण ही परिस्थिती अधिकाधिक हाताबाहेर जाताना दिसत आहे. युद्धविरामाची शक्यताही हल्ली कुणी बोलून दाखवत नाही. आता तर, युद्धविराम वाटाघाटींमध्ये हमासचा चेहरा असलेला हनिये यालाच संपवण्यात आले आहे. हमासचे राजकीय आणि लष्करी नेतृत्व संपवण्यात इस्रायलला सातत्याने यश मिळत आहे. तरीदेखील हमास संपत का नाही, याविषयी विचार करण्याची परिपक्वता दुर्दैवाने इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याकडे नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयांनी युद्धगुन्हेगार ठरवले, अमेरिकेसारख्या जुन्या मित्रदेशात तेथील काँग्रेसमध्ये खंडीभर अमेरिकी प्रतिनिधींनी त्यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला, यातून नेतान्याहू बोध घेताना दिसत नाहीत. युद्ध आणि लष्करी कारवायांनीच साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात, अशी त्यांची आणि त्यांच्या आघाडी सरकारमधील अतिउजव्या यहुदी पक्षांची ठाम समजूत आहे. इस्रायली नागरिकांना जसा धोका हमास-हेजबोला, इराणकडून आहे, तसाच तो अशा टोकाच्या विचारसरणीच्या राजकीय नेत्यांकडूनही आहे. ही ‘आरपारची लढाई’ मानली जात असल्यामुळे, प्रत्येक हिंसक कृतीला उत्तर हिंसेनेच मिळणार हे उघड आहे. त्यामुळे या भडक्याने होणारे नुकसान कुठवर जाते, एवढाच प्रश्न.