गाझा पट्टीमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांला तात्पुरता विराम देण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये घडून आलेले मतैक्य हा या घडामोडीतील महत्त्वाचा टप्पा ठरतो. ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यामध्ये १२०० इस्रायली नागरिक ठार झाले आणि साधारण २४० नागरिकांना गाझात पळवून नेऊन ओलीस ठेवले गेले. आता या ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायली तुरुंगातून पॅलेस्टिनी बंदिवानांची सुटका होणे हा शस्त्रविराम सहमतीनाम्याचा एक भाग आहे. सुटका होणाऱ्या पॅलेस्टिनींमध्ये नागरिक आहेत, तसेच हमासचे हस्तकही आहेत. हमासचा हेतू इस्रायली ओलिसांच्या बदल्यात या सगळय़ांची सुटका करणे इतका मर्यादित नसावा. त्याऐवजी इस्रायलला धडा शिकवून ओलिसांच्या बदल्यात जास्तीत जास्त मागण्या मान्य करून घ्याव्यात आणि मनुष्यहानीकडे बोट दाखवून पाश्चिमात्य सत्तांच्या हस्तक्षेपाची प्रतीक्षा करावी हेही हमासला अभिप्रेत आहे. कारण स्वत:चे नागरिक इतक्या मोठय़ा प्रमाणात मारले गेल्यानंतर इस्रायलचा प्रतिहल्ला अत्यंत तीव्र राहील, हे न समजण्याइतके हमास दुधखुळे नाही. झालेही जवळपास तसेच. पॅलेस्टिनी प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांच्या अंदाजानुसार, इस्रायलच्या प्रतिहल्ल्यामध्ये १२ हजारांहून अधिक नागरिक ठार झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये रुग्णालये, आश्रयकेंद्रे यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. अशा संवेदनशील क्षेत्रांच्या परिसरात आणि इमारतींखाली भूमिगत संरचनेत हमासचे अतिरेकी दडून बसले होते, असे इस्रायलचे म्हणणे होते. ते जसे इस्रायलला पूर्णत: सिद्ध करता आलेले नाही, तसे हमासला नि:संदिग्धपणे खोडूनही काढता आलेले नाही. इरेला पेटलेल्या या दोघांच्या संघर्षांत हजारो नागरिकांचे हकनाक प्राण जात होते. तेव्हा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा शस्त्रविराम आवश्यकच होता. तो अखेरीस घडून आला.
अर्थात हा शस्त्रविराम तात्पुरता आहे. तो शुक्रवारनंतरच अमलात येईल असे इस्रायलने स्पष्ट केले आहे. चार दिवसांच्या शस्त्रविरामाच्या काळात २४० पैकी साधारण ५० इस्रायली ओलिसांची सुटका केली जाणार आहे. त्यात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. याच काळात इस्रायली तुरुंगांतील १५० महिला आणि युवकांची सुटका केली जाणार आहे. शिवाय या काळात गाझातील जास्तीत जास्त भागांत वैद्यकीय, इंधन, अन्न या स्वरूपातील मदत पोहचविण्याची योजना आहे. याशिवाय हमासने अधिक ओलिसांच्या सुटकेची तयारी दर्शवल्यास, प्रत्येक १० ओलिसांच्या सुटकेसाठी एक दिवस शस्त्रविराम वाढवला जाईल, असे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलच्या तुरुंगातील ३०० पॅलेस्टिनी बंदिवानांची यादी बनवण्यात आली आहे. करारानुसार या सर्वाची सुटका व्हायची झाल्यास हमासला १०० इस्रायली ओलिसांची सुटका करावी लागेल.
वास्तविक इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू हे शस्त्रविरामासाठी तयार नव्हते, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या आणि इस्रायली ओलिसांच्या कुटुंबीयांच्या दबावामुळे तसेच कतार व इजिप्त या देशांच्या आर्जवी मध्यस्थीमुळे नेतान्याहू सरकार शस्त्रविरामाला राजी झाले. चार दिवसांनंतर हल्ले पुन्हा सुरू होतील, असे इस्रायलने जाहीर केले आहे. हमासला नेस्तनाबूत करणे हे प्रधान उद्दिष्ट असल्याचे नेतान्याहू सांगतात. पण हमासच्या म्होरक्यांचा ठावठिकाण इस्रायली सुरक्षा दलांना अद्याप लागलेला नाही. किती नेते गाझामध्ये दडून बसले आहेत, नि किती गाझाबाहेर निसटले आहेत याविषयी त्यांच्याकडे निश्चित माहिती नाही. त्यामुळे शस्त्रविरामाच्या निर्धारित काळानंतरही हमासच्या ताब्यात १९० ओलीस असतील. सुरुवातीस सोडल्या जाणाऱ्यांच्या तुकडीत अमेरिकी नागरिक आहेत. अर्थातच अमेरिकेने आपले वजन वापरून हे घडवून आणले आहे. पण बाकींच्या सुटकेआधीच इस्रायलने पुन्हा तीव्र हल्ले सुरू केले, तर या ओलिसांच्या जीवितांचे काय, या प्रश्नाचे उत्तर हमास आणि नेतान्याहू हे दोघेही देत नाहीत. इस्रायली तुरुंगातील ३०० पॅलेस्टिनी बंदिवानांपैकी जवळपास पन्नास जणच हमासचे सदस्य आहेत. बाकीच्यांच्या सुटकेच्या बाबतीत हमासने इच्छाशक्ती दाखवली नाही तर हा संघर्ष निराळे वळण घेऊ शकतो. चार दिवसांचा शस्त्रविराम ही निव्वळ एक तडजोड असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यानंतर ज्या बेबंदपणे इस्रायली हल्ले सुरू होतील, तितक्याच बेजबाबदारपणे हमासचे नेतेही वागण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. हे होऊ द्यायचे नसेल, तर अमेरिकेला इस्रायलवर आणि कतार, इजिप्त यांना हमासवर सातत्याने दडपण आणावे लागेल. हमास गाझातील पिचलेल्या पॅलेस्टिनी जनतेच्या प्रतिनिधित्वाचा दावा करत असले, तरी त्यांचे बहुतेक नेते ऐषोआरामी आणि निर्दय आहेत. त्यांना शहाणिवेचे चार शब्द ऐकवण्याची क्षमता पश्चिम किनारपट्टी स्थित पॅलेस्टिनी प्रशासनात नाही. ते प्रयत्न कतार आणि इजिप्त यांनाच करावे लागतील. अन्यथा या लघु शस्त्रविरामातून फार काहीच साधले जाणार नाही.
