सुंदरतेचा पोत असतो. बार्सिलोना-माद्रिद आणि लिस्बन ही शहरं तो दाखवून देतात. बार्सिलोना-माद्रिद सुंदरच. पण त्यांची भव्यता आपल्याला चार हात दूर ठेवते. पोर्तुगालच्या लिस्बनचा गोडवा वेगळा. लिस्बन मोकळं आहे. आपल्याला लगट करू देतं आणि तेही आपल्याशी सलगी दाखवतं. पहिली दोन आखीव-रेखीव. शिस्तशीर. टापटिपीची. ब्युटीपार्लरमधनं नखशिखांत सजून बाहेर पडलेल्या तरुणीसारखी. लिस्बन एकदम मोकळं-ढाकळं. चेहऱ्यावर केसांची बट रुळतीये, वाऱ्यावर केस उडतायत आणि चेहऱ्यावरचा प्रामाणिक वेंधळेपणा काही लपत नाही; असं. लिस्बनशी ओळख व्हायला वेळ लागत नाही आणि ती झाली की ते शहर हातात हात घेऊन अगदी गप्पा मारायला लागतं. प्रत्येक ठिकाणी ठसठशीतपणे दिसतात ते चौकोनी, निळ्या रंगांच्या विविध शेड्सच्या फरश्यांनी सजलेले फुटपाथ. काही ठिकाणी इमारतीच्या भिंतीही तशाच. दोन-तीन दिवसांत लक्षात येतं संपूर्ण शहरच काय पण सगळं पोर्तुगालच तसं आहे. रस्ते-फुटपाथ हे सगळीकडे असे रंगीबेरंगी टाइल्सचे. नुसते रचलेले नाहीत. त्यात एक लक्षवेधी आकृतिबंध. चौक, बस स्टॉपवरही तसंच. विचारलं तर कळतं इथल्या या टाइल्स अरबांबरोबर पोर्तुगालमध्ये आल्या आणि इथल्या किंग मॅन्युएलनं या सुंदर फरश्या लावून पहिल्यांदा एक फुटपाथ बनवला. तो सगळ्यांना आवडतोय हे लक्षात आल्यावर फुटपाथ, रस्त्यांतले थांबे वगैरेसाठी या टाइल्सच वापराव्यात असा कायदा केला. लिस्बनमध्ये टाइल्सच्या कलाकृतींचं म्युझियम आहे. इस्लामी अरबांच्या टाइल्स कॅथलिक पोर्तुगीजांनी आनंदानं स्वीकारल्या. लिस्बनच्या सौंदर्यात टाइल्सचा वाटा किती आहे हे पाहिल्याशिवाय कळणार नाही. या टाइल्सनं मनोरम केलेल्या रस्त्यांवरनं चालताना पदोपदी आपले पेव्हर ब्लॉक नामे निर्बुद्ध ठोकळे आठवतात. असो. याच राजाच्या एका वंशजानं लिस्बनमध्ये ठिकठिकाणी कारंजी उडवता यावीत म्हणून डोंगरावर मोठ्या पाण्याच्या टाक्या उभारल्यात. बंदरात जहाजांची गोदी आहे. आता गोदीतलं वातावरण किती कंटाळवाणं असतं हे आपल्याला माहीत असतं. पण लिस्बनला त्या गोदीतसुद्धा एक आर्ट म्युझियम आहे! दुसरी जिकडे-तिकडे दिसणारी गोष्ट म्हणजे कॉर्क आणि कॉर्कच्या वस्तू. यासाठी परिचित मराठी शब्द म्हणजे बूच. त्याची ओळख म्हणजे ‘टॉक’ असा आवाज करत जे उघडलं जातं आणि बाटलीतल्या फेसाळत्या द्रवाला मुक्ती देतं ते बूच. त्या कॉर्कच्या भुसभुशीत लाकडापासनं बनवलेल्या बॅगा, कोस्टर्स, पर्स, पाकिटं. असं काय काय सगळीकडे दिसतं. जगातल्या ‘बाटल्यांना’ लावल्या जाणाऱ्या (बसणाऱ्या नाही) बुचातली ९० टक्के बुचं ही एकट्या पोर्तुगालमधनं निर्यात होतात. ही माहिती ऐकल्यावर मन नावाची आनंदाची बाटली अभिमानानं फसफसून येते आणि आनंद प्याल्यात मावेनासा होतो. लिस्बनमध्ये आणखी एक प्रश्न पडतो. तो म्हणजे हुकूमशाही वृत्तीच्या सर्वच राज्यकर्त्यांना भव्य पूल, पुतळे, सर्वात उंच हे, सर्वात मोठं ते वगैरे बांधण्यात रस असतो का? कारण लिस्बनमध्ये इकडून तिकडून जाता येता दिसणारा अवाढव्य पूल. प्रचंड रुंद खाडी तो ओलांडतो. त्याचं आताचं नाव ‘२५ एप्रिल ब्रिज’. आताचं असं म्हणायचं कारण त्याचं खरं नाव सालाझार ब्रिज. सालाझार हा पोर्तुगालचा कुख्यात हुकूमशहा. त्यानं आपल्या गोव्यात केलेल्या अत्याचारांच्या कहाण्या अजूनही सांगितल्या जात असतात. हा पूल त्यानं स्वत:च बांधला आणि स्वत:चंच नाव दिलं त्याला. हीदेखील हुकूमशाही वृत्तीची गंमतच तशी. तर या सालाझारची राजवट १९७४ च्या २५ एप्रिलला उलथून पाडली गेली आणि लोकशाही प्रस्थापित झाली. सालाझार गेला आणि लोकशाही आली त्या दिवसाचं नाव आता त्या पुलाला दिलं गेलंय. लिस्बनमध्ये सगळे रस्ते वेगवेगळ्या ठिकाणांहून खाडीच्या किनाऱ्याकडे येतात. लांबच्या लांब, क्षितिजापर्यंत लांब भासणारा खाडीकिनारा आणि त्याला ९० अंशांच्या कोनातनं येऊन मिळणारे रस्ते. शाळेत शिस्तशीर वागणारी मुलं शाळा सुटली की उधळावीत तसं रस्ता संपून खाडीकिनाऱ्यावर पाऊल टाकलं की लिस्बनकरांचं वागणं बदलतं. एखादा ग्रुप तिथे गात बसलेला असतो. कोणी नाचत असतात. पाच-सहा स्टॉल्स दिसले. भला मोठा अननस डोळ्यादेखत कापून मधल्या पोकळीत ‘पिना कोलाडा’ हे लोकप्रिय कॉकटेल बनवून देणारे विक्रेते होते. ते मात्र भारतीय किंवा बांगलादेशी. त्यांचे आपल्या नजरेला नजर देणं टाळण्याचे केविलवाणे प्रयत्न अगदी जाणवतात. समोर वाहती खाडी. तिच्या अंगाखांद्यावर तरंगणाऱ्या विविध आकाराच्या बोटी. पाण्यावर अलगद पावलं टाकत आपल्यापर्यंत येणारं त्या बोटींवरचं संगीत. किनाऱ्यावर ओळीनं एकसारख्या दगडी इमारती. फिकट रंगात रंगवलेल्या. अथांग पाण्यावरनं परावर्तित होणारा प्रकाश आणि आकाशातला मंद सूर्य यामुळे वातावरणाची शब्दातीत अशी प्रकाशयोजना झालेली. हा आनंदोत्सव आठवड्यातल्या कामाच्या दिवशीच्या संध्याकाळचा. आपल्याकडे कामावरनं घरी जातानाचं अनेकांचं लटकतं प्राक्तन आठवून गहिवरूनच यावं. हे असंच वाटतं पलीकडच्या कॅशकाइश गावात. माणसाला जगण्यासाठी नोकरीधंदा काही करावा लागतो, विद्यार्थ्यांना रडतखडत का असेना शाळेत जावं लागतं, अभ्यास करावा लागतो आणि हे सगळं यथासांग झाल्यावर सुट्टी ही कल्पना आकारास येते, असा आपला मध्यममार्गी समज. तो हे गाव उलटून टाकतं. आम्ही पोहोचलो त्या गावात तोही असाच कामाचा दिवस. दुपारचे बारा वाजले असतील. गावातल्या हमरस्त्यावर रहिवासी सहकुटुंब सहपरिवार सायकलवरनं फिरतायत आणि साधारण पुण्यातल्या लक्ष्मी रोड इतक्या ‘भव्य’ रुंदीच्या रस्त्यावर फक्त सायकलीच चालवल्या जातायत. उजव्या हाताच्या समुद्रकिनारी वाळूत पहुडलेल्यांचं एक गाव तयार झालंय. त्यातले काही ‘तो’ आणि ‘ती’ वरचं ऊन जास्तीत जास्त शरीरात साठवता यावं या उदात्त हेतूनं आपल्या जास्तीत जास्त शरीराचं सूर्यफूल करून बसलेत. काहींच्या हाती पुस्तकं (पुस्तक वाचण्यासाठी इतक्या चांगल्या जागा, घरं असताना ही मंडळी बीचवर भर उन्हात पुस्तक का वाचतात हे गणित काही मला अजून कळलेलं नाही). त्यातले काही मध्येच उठतात आणि पाण्यात डुबकी मारून पुन्हा आपापल्या टॉवेल/ खुर्च्यांवर लोळायला परत येतात. आसपास भटकून आम्ही सायंकाळी परतलो तरी हे ‘वाळूचे किल्ले’ तसेच होते. घर-दार काही आहे की नाही असा प्रश्न आपल्यालाच पडतो. हे गाव सार्डिन माशांसाठी प्रसिद्ध आहे. आपल्याकडच्या बांगड्यासारखा प्रकार. हे मासे खरपूस भाजून देणारी अनेक हॉटेल्स. पांढऱ्या शुभ्र रंगावर आकाशी निळ्या रंगांची त्यावर सजावट. सगळा पोर्तुगालच पांढऱ्या आणि निळ्या रंगांच्या छटांत व्यक्त होतो. त्यामुळे सगळीकडेच एक उंची, क्लासीनेस आपसूकच आलेला. आणि यामुळे एखाद्या बंगल्यातली तांबडी बोगनवेलही इतकी उठून दिसते की हा रंग आपल्याकडे का नाही. असं वाटून जातं. वास्तविक तो आपल्याकडेही असतोच. पण राज ठाकरे म्हणाले तसं आपल्याकडे शहरांचा डान्स बार करून टाकणाऱ्या रंगदिव्यांच्या गदारोळ-दंगलीत ही सट्लिटी कशी काय रुचणार, हा प्रश्नच! या माफक, मार्दवी सौंदर्यामुळे असेल पण तिथल्या सिन्त्रासारख्या अवर्णनीय सुंदर डोंगरगावात लॉर्ड बायरन, परीकथा लिहिणारे हान्स अँडरसन असे कवी-लेखक महिनोनमहिने राहत. लिस्बनमध्ये असताना एकदा रात्री उशिरा हॉटेलवर परतत होतो. साडेअकरा वाजून गेलेले. पण बीचजवळच्या बाजारात संध्याकाळी असावी अशीच गर्दी. एका दुकानासमोर रांगा लागलेल्या. त्या दुकानात डॉक्टर वाटावेत असे पांढऱ्या शुभ्र कपड्यांतले कर्मचारी. कसले तरी ट्रे आणतायत आणि रांग पुढे पुढे सरकतीये, असं दृश्य. तिकडे जाऊन पाहिलं तर त्या दुकानातले टार्ट म्हणे प्रसिद्ध आहेत आणि ते घ्यायला दिवसभर अशीच रांग असते. टार्ट म्हणजे आपल्याकडे दिवाळीला पत्र्याच्या पणत्या मिळतात तशा आकाराचा पदार्थ. कडा आपल्या खारी बिस्किटासारख्या कुरकुरीत आणि आतमध्ये कस्टर्ड आणि अंडी याच्या मिश्रणातलं ऑरेंजी स्वादाचं सारण. या पदार्थाचं शाब्दिक वर्णन अशक्य! साधारण अर्धा डझन टार्ट रिचवल्यावरच गती मंद होते. पोर्तुगीजांनी गोव्यात मागे आपलं बरंच काही सोडलं. पण हा टार्ट काही गोयकारांस शिकवला नाही. असो. एव्हाना जाडसर सुखसाय शहरभर पसरलेली. योगायोग असा की ती पौर्णिमेची रात्र होती. भौगोलिक कारणांनी युरोप आपल्यापेक्षा चंद्राला जास्त जवळचा. त्यामुळे त्याचा आकार आणि प्रभा आपले डोळे दिपवते. ते घनदाट चांदणं आपल्याला शब्दश: थिजवतं आणि आपल्याला जाणीव होते. हा तर चंद्रमाधवीचा प्रदेश!