दिल्लीवाला

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा वाया गेला. सभागृहाचं कामकाज वाया जाणं हे काही नवं नाही. अनेकदा दोन्ही बाजूंच्या सदस्यांना कामकाज चालवण्याची फारशी इच्छा नसते. या वेळी तसं झालंय. महाराष्ट्रात पराभवानं लाज गेल्यामुळं विरोधकांना संसदेत सत्ताधाऱ्यांचे टोमणे ऐकायचे नाहीत आणि सत्ताधाऱ्यांना अदानीच्या मुद्द्यावरून स्वत:च्या पायावर दगड मारून घ्यायचा नाही. त्यामुळं अदानींचं नाव घेऊन सगळेच संसदेतून बाहेर पळताहेत असं दिसतंय. पहिल्या आठवड्यामध्ये एकही दिवस ना प्रश्नोत्तराचा तास झाला ना शून्य प्रहर. अवघ्या काही काही मिनिटांमध्ये सभागृह तहकूब होतंय. सभागृह सुरू झालं की आवाज ऐकू येतो तो म्हणजे अदानी-अदानी… हा शब्द ऐकला की, सत्ताधारी आणि पीठासीन अधिकारी दोघेही अस्वस्थ व्हायला लागतात. विरोधकांना बहुधा सत्ताधाऱ्यांना घाबरवणारा परवलीचा शब्द सापडला असावा. हा शब्द उच्चारला की संसद बंद. विरोधकांनाही स्वत:चं अपयश लपवण्यासाठी हा अचूक शब्द सापडला आहे. अदानी-अदानी म्हणत आक्रमक झाल्याचं दाखवायचं, सत्ताधारीही पळ काढतात. मग कामकाज दिवसभरासाठी स्थगित होतं. अवघ्या तासा-दोन तासांत संसदेच्या आवारात शुकशुकाट होतो. हिवाळ्यात तसंही अंधार खूप लवकर पडतो. संसदेत दुपारीच अंधार होतो. सगळे बाराच्या आत घरात. संविधानाच्या मुद्द्यावर विरोधकांनी चर्चेची मागणी केलीय. राज्यसभेने ती मान्य केली असली तरी ही चर्चा शेवटच्या आठवड्यात होईल, की पुढील आठवड्यात उरकली जाईल हे निश्चित झालेलं नाही. येत्या आठवड्यापासून कदाचित सरकार विधेयकं संमत करण्याचा सपाटा लावेल. ही विधेयकं संमत झाली की अधिवेशनाचं सूप वाजवायला मोकळे!

Election Commission integrity came under scanner after maharashtra assembly elections result 2024
अग्रलेख : योगायोग आयोग!
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
ulta chashma
उलटा चष्मा : प्रतिमहामहीम!
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!

गळ्यात घंटा कोण बांधणार?

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये भाषण जबरदस्त होतं. खरगेंचं म्हणणं होतं की, काँग्रेसचा पराभव काँग्रेसनंच केला. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर काँग्रेसवाले नाकर्ते आहेत, तुम्ही स्वत:ला सुधारा नाहीतर तुम्हाला भवितव्य नाही, असं खरंतर खरगेंना सांगायचं होतं. तसं उघडपणे बोलता येत नाही म्हणून त्यांनी आवरतं घेतलं इतकंच. पण खरगेंच्या भाषणातून वेगळाच गोंधळ निर्माण झालाय. गेल्या आठवड्यात खरगेच जाहीर भाषणात म्हणाले होते की, मतदान यंत्रांमध्ये फेरफार केला गेलाय, ही मतदान यंत्रं भाजपला जिंकून देत आहेत. त्याविरोधात मोहीम आखली पाहिजे. मतदान यंत्रांमुळं काँग्रेसचा पराभव झाला असेल तर ते काँग्रेसवाल्यांना दोष का देत आहेत, ते कळत नाही. खरगेंनी भाषणात मतदान यंत्रांचा विषयही काढला होता. पण, कार्यकारी समितीनं संमत केलेल्या ठरावात त्यांचा उल्लेख नाही. सगळा दोष केंद्रीय निवडणूक आयोगावर टाकलेला आहे. ठरावात निदान म्हणायचं तरी मतदान यंत्रांबाबत शंका आहे, त्यासंदर्भात काँग्रेस लोकांना वास्तव समजावून सांगेल. ठरावात संदिग्धता असल्यानं काँग्रेस केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात कसं लढणार हेही स्पष्ट नाही. असो. खरगेंनी काँग्रेस नेत्यांना बोल लावले असतील तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण अशा कोण-कोणत्या नेत्यांविरोधात कारवाई होणार हे तरी सांगायचं. काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी घेऊन नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता असं म्हणतात. पण, नाना दिल्लीत खरगेंना भेटून आले आणि म्हणाले, कसला राजीनामा? मी कधी दिला? राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे! या नानांनी असं घुमजाव केल्यामुळे नानांविरोधी गट कमालीचा नाराज झालाय. नानांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलं तर ते आपल्याकडं येईल असं या विरोधी गटाला वाटू लागलंय. पण, नाना आहेत राहुल गांधी आणि वेणुगोपाल यांच्या गटातील. नानांना बाजूला करणार कोण? अशी सगळी एकात एक धुसफुस काँग्रेसमध्ये सुरू आहे. काँग्रेस कधी बदलत नाही हे काँग्रेसवाल्यांनाही माहीत आहे. त्यामुळं बैठक झाली, सगळे आपापल्या घरी गेले. काही वायनाडला गेले इतकंच!

दादांचं श्रेय मामांना!

सहाव्यांदा उपमुख्यमंत्री बनणारे अजित पवार दिल्लीत बहुधा पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारांना इतक्या दिलखुलासपणे भेटले असतील. अजितदादांना दिल्लीत येणं फारसं आवडत नसे. ते यायचे ते गुप्त बैठकांसाठी. कधी भाजपच्या नेत्यांशी चर्चा करायला तर कधी काँग्रेसच्या मंडळींशी. काकांशी काडीमोड घेतल्यानंतर ते प्रामुख्यानं अमित शहांना भेटायला येत. अशा वेगवेगळ्या दौऱ्यांमध्ये त्यांनी अनौपचारिकपणे पत्रकारांशी गप्पा मारल्याही असतील. पण, या वेळी ते खास दिल्लीतील तमाम पत्रकारांना भेटण्यासाठी आले. दिल्लीत महायुतीची बैठक होती हे खरे पण, ही वेळ अजित पवारांसाठी निवांत गप्पा मारण्याची होती. अजितदादांना प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंनी आग्रह केला की, इतका प्रचंड विजय महायुतीने मिळवला आहे तर तुम्ही दिल्लीतील सर्वभाषिक पत्रकारांशी संवाद साधा. अजितदादाही कधी नव्हे ते तयार झाले. राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशीही आता संवाद साधला पाहिजे, त्यांच्याशीही नातं जुळवलं पाहिजे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं होतं. या भेटीत अजितदादा दिलखुलास बोलले. त्यांनाही अपेक्षित नसेल इतकं यश त्यांनी मिळवलं होतं. एक प्रकारे अजितदादांनी शिंदे गटावर मात केली आहे. कदाचित त्यांच्या चेहऱ्यावर या खास यशाचंही हसू असावं!… अजितदादांनी महायुतीच्या यशाचं सगळं श्रेय लाडकी बहीण योजनेला देऊन टाकलं. मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांनी ‘लाडली बहना’ योजनेतून काय कमाल केली हे मी पाहिलं. शिवराजसिंह यांना ‘मामा’ म्हणतात ना? भाजपलाही मध्य प्रदेश जिंकू असं वाटलं नव्हतं. पण, मामांच्या लाडक्या बहिणींनी जिंकून दिलं. मला वाटलं की मामांसारखं काही तरी केलं पाहिजे. मामांची योजना महाराष्ट्रातही कमाल करेल असं मला वाटत होतं. मी हिशोब लावला, योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद केली. लाडक्या बहिणींना सहा हजार रुपये मिळाले. एकेका कुटुंबात तीन-तीन लाडक्या बहिणी होत्या. त्या कुटुंबात दिवाळीला १८-२० हजार रुपये आले. सांगा त्यांची दिवाळी किती खुशीत गेली असेल?… अजितदादा असताना विषय काकांचाही निघणारच. काकांचं राजकीय भवितव्य काय असेल, असा प्रश्न येताच अजितदादांनी हात जोडले. मला काय माहीत, कशाला हा प्रश्न विचारता?… अजितदादा उपमुख्यमंत्री होतात पण, मुख्यमंत्रीपद हुलकावणी देतंय. पुढं काय होईल आत्ता कसं सांगणार, असं म्हणत अजितदादांनी प्रश्नाला बगल देऊन टाकली. अजितदादा दोन-तीन तास वेगवेगळ्या पत्रकारांशी गप्पा मारत होते. दिल्ली बहुधा अजितदादांना मानवू लागली आहे. महायुतीच्या बैठकीसाठी फडणवीस संध्याकाळी आले, शिंदे तर रात्री दहा वाजता दाखल झाले. अजित पवारच सकाळपासून दिल्लीत होते आणि महायुतीच्या तीनही नेत्यांमध्ये सर्वात आनंदी तेच होते. दुसऱ्याचा हिरमोड झाला होता तर तिसऱ्याच्या मनात धाकधूक होती. रात्रीचा दिवस करून तिघेही आल्या पावली निघून गेले.

असं झालं तरी कसं?

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदारांना महाविकास आघाडीचा पराभव झालाय हे कळतंय पण अजून वळत नाही असं दिसतंय. ‘आम्ही इतका सपाटून मार खाऊ असं वाटलं नव्हतं. राज्यातील परिस्थिती इतकी वाईट नव्हती. आम्हाला वाटलं होतं की, आम्ही ६०-७० जागा जिंकू. निवडणुकीत नेमकं काय झालं हे खोलात जाऊन बघावं लागेल,’ असं काँग्रेसचे एक खासदार सांगत होते. दुसरे खासदार भलतेच हताश दिसत होते. असं कसं झालं हेच कळत नाही. झालं ते झालं, आता काय करणार? बघू या पुढं काय होतंय, असं म्हणत ते निघून गेले. एका खासदाराचं म्हणणं होतं की, लोकसभा निवडणुकीपेक्षा चार-पाच टक्के मतदान वाढलं. ही मतं महायुतीकडं वळली असतील तर काँग्रेस कशी जिंकेल? चार-पाच टक्क्यांचा फरक खूप असतो… महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अपयशाचं खापर मतदान यंत्रांवर फोडलं असलं तरी, या खासदाराला हे मान्य नसावं. मतदान यंत्रं नसती तरीही महाविकास आघाडी हरलीच असती कारण मतं महायुतीकडं वळली होती, असं या खासदाराला सुचवायचं होतं. त्याचं म्हणणं अगदीच चुकीचं नसावं. काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणातही ते पराभूत होत आहेत याचे संकेत मिळाले होते. लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीला मारक ठरेल असंही या सर्वेक्षणातून दिसलं होतं. असं कसं झालं त्याचं उत्तर लाडक्या बहिणींना विचारा असं महायुतीचे नेते म्हणू लागले आहेत!