फलटणमधील महिला डॉक्टरचा मृत्यू आणि पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या विकासाचा वाद या दोन्ही प्रकरणांवरून काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावरून पंतप्रधान मोदींवर नेम धरला आहे. ही दोन्ही प्रकरणं राज्यात सध्या गाजत आहेत, पण ती इतक्या उशिरा दिल्लीच्या प्रसारमाध्यमांसमोर मांडली गेली की, त्याचा प्रभाव किती पडले हे सांगता येत नाही. पहिले प्रकरण राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे दाखवत असल्याचा आरोप काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केला. फडणवीसांच्या राज्याचं बिहारप्रमाणं जंगलराज होऊ लागलं आहे असं काँग्रेसला अप्रत्यक्षपणे सांगायचं आहे. फलटणमधील डॉक्टर महिलेने आत्महत्या करताना तिच्या तळहातावर लिहिलेले मजकूर फडणवीसांच्या निकटवर्तीयांकडे अंगुलीनिर्देश करतो असं काँग्रेसचं म्हणणं आहे. दुसऱ्या प्रकरणात पुण्यातील जैन बोर्डिंगच्या मालकीची जागा विकसित करण्यासाठी राजकीय हितसंबंधाचा वापर केला गेला. त्यामागे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असल्याचा आरोप काँग्रेसने केला. मोहोळ हे मोदींचे सहकारी मंत्री आहेत. मोदींना भ्रष्टाचार चालत नाही तर मोहोळांचा कथित भ्रष्टाचार कसा चालतो, असा सवाल काँग्रेसनं केला आहे. ही दोन्ही प्रकरणं महाराष्ट्राचा बिहार झाल्याचा आरोप करणारी आहेत. बिहारच्या निवडणुकीमुळं काँग्रेसच्या हायकमांडने राज्यातील पक्षाच्या नेत्यांना दिल्लीत या प्रकरणांना उचलून धरण्याचा आदेश दिला असावा. त्यामुळं गेल्या तीन दिवसांमध्ये दोन पत्रकार परिषदा घेऊन या दोन्ही प्रकरणांकडे दिल्लीतून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला असं दिसतंय.

छठपूजा हायजॅक

दर पाच वर्षांनी बिहारची निवडणूक आली की राजकीय पक्ष छठपूजा हायजॅक करतात, यावर्षीही झाली. यावेळच्या हायजॅकमधलं वेगळंपण असं की, दिल्लीत भाजपचं सरकार आहे. त्यामुळे आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये प्रदूषित यमुनेच्या घाटांवरून जोरदार वादावादी झाली. हा संघर्ष इतका टोकाला गेला की, भाजपच्या नेत्यांनी यमुनेचं पाणी पिऊन दाखवावं असं आव्हान आपच्या नेत्यांनी दिलं. एका भाजप नेत्यानं बाटलीतील गढूळ पाणी थोडं प्यायलंदेखील. मग, ‘आप’च्या नेत्याला चेव चढला तो म्हणाला की, सगळी बाटली पिऊन दाखवा. इथं भाजपच्या नेत्याची पंचाईत झाली, घोटभर पाणी पिणं आणि बाटलीभर पिणं वेगळं. तेही अत्यंत घाणेरडं यमुनेचं पाणी. भाजपचा नेता म्हणाला, माझी मर्जी, मी घोटभर पीन नाहीतर बाटलीभर… त्यात दिल्लीच्या नव्या नव्या मुख्यमंत्री बनलेल्या रेखा गुप्ता यांना ‘करून दाखवलं’, असा दावा करायचा असल्यानं यमुना आणि तिचे घाट कसे स्वच्छ आहेत याचा गुप्ताजींनी प्रचार-प्रसार केला. बोटीतून सैर केली. यमुनेच्या पाण्यात रसायनं टाकून त्यातील प्रदूषित फेस पाण्याखाली दाबून टाकला जातो, हा प्रकार ‘आप’च्याही कार्यकाळात केला जात होता, त्यामुळं छठपूजेच्या सप्ताहामध्ये घाटांच्या आसपास यमुना वरवर स्वच्छ दिसली तर नवल नव्हतंच. बिहारच्या निवडणुकीमुळं दिल्लीत छठपूजेचा उत्सव भव्यदिव्य साजरा करण्याचा भाजपचा इरादा होता. दिल्ली भाजपचे नेते, खासदार आणि भाजपचं सरकार असे सगळे कामाला लागले होते. या उत्सवामध्ये तेही बिहारची निवडणूक असताना पंतप्रधान मोदींना सहभागी करून घेतलं नाही तर छठपूजेचा उत्सव पूर्ण होणारच नव्हता. मोदी यमुनेच्या घाटावर येणार असतील आणि ते पाण्यात उतरून सूर्याला अर्घ्य देणार असतील तर पाणी स्वच्छ हवं. मग, दिल्ली सरकारने वासुदेव घाटावर कृत्रिम तलाव तयार केला. तो ‘आप’ने समाजमाध्यमांवर व्हायरल केला. कृत्रिम तलावात स्वच्छ पाण्याची व्यवस्था करून छठपूजेचा उत्सव साजरा करण्याचा गुप्ताजींचा मनसुबा होता. पण, हा प्लॅन ‘आप’ने उधळून लावला. कृत्रिम तलाव इतका वादात अडकला की, मोदीजी आलेच नाहीत. ते बिहारमध्ये गेले, तिथं त्यांनी छठपूजेवरून काँग्रेस आणि राहुल गांधींना लक्ष्य केलं. राहुल गांधींनी मोदींची छठपूजा म्हणजे नाटक असल्याचा आरोप केला. या विधानाचा नेहमीप्रमाणं विपर्यास करून भाजपने राहुल गांधींनी, छठपूजेची नाटक म्हणून निर्भर्त्सना केल्याचा प्रतिआरोप केला. राहुल गांधी म्हणाले होते की, एका बाजूला यमुना नदी आहे, ती घाण पाण्याने भरलेली आहे की, तिचं पाणी प्यायल्याने वा त्यात पाऊल टाकल्याने कोणीही आजारी पडेल. आणि दुसरीकडे, मोदींसाठी एक छोटासा तलाव. त्यात दूरवरून पाइपमधून पाणी येते. असा एक हिंदुस्थान आणि दुसरा मोदींचा हिंदुस्थान. जर मोदींना छठपूजा करण्यासाठी दिखावा (नाटक) करायचा असेल तर पाणीही येईल आणि व्हिडीओ कॅमेरेही येतील. मोदींसाठी स्वच्छ पाणी, फक्त १० यार्ड अंतरावर. हे भारताचे वास्तव आहे… या विधानामध्ये छठपूजेचा कुठंही अपमान केलेला नाही, पण सध्या वातावरण बिहारच्या निवडणुकीचं असल्यामुळं मोदींवरील टीका छठपूजेवरील आघात ठरवला गेला. दिल्लीत भाजपचं सरकार आलं, राजस्थान, महाराष्ट्रातही आलं. मध्य प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये तर होतंच. तिथल्या प्रत्येक भाजप मुख्यमंत्र्यांनी छठपूजा केली. आता हे सगळे मुख्यमंत्री एक एक करत बिहारमध्ये जाऊ लागले आहेत. रेखा गुप्ता आधीच पोहोचल्या, देवेंद्र फडणवीसही पोहोचले आहेत.

हिवाळी अधिवेशन २४ नोव्हेंबरला?

बिहारमध्ये नवं सरकार स्थापन झाल्यानंतर दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन होईल. आत्ता तरी २४ नोव्हेंबरपासून तीन आठवडे अधिवेशनाचा कालावधी असेल असं दिसतंय. अजून अधिकृतपणे तारखा जाहीर झालेल्या नाहीत. बिहारमध्ये ‘एनडीए’चं सरकार कायम राहिलं तर भाजपचा आक्रमकपणा बघण्याजोगा असेल. तिथं ‘महागठबंधन’चं सरकार आलं तर मात्र संसदेतील चित्र वेगळं असेल. बिहारमध्ये काहीही झालं तरी मतचोरी, एसआयआर हे प्रमुख मुद्दे काँग्रेसकडून मांडले जाऊ शकतात. भाजप बिहारकडून पश्चिम बंगालमध्ये वळेल. त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांवरून तृणमूल काँग्रेस आक्रमक झालेला दिसेल. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था, भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील. गेल्या वेळी काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत घोषणाबाजी करून सत्ताधाऱ्यांना जेरीला आणलं होतं. यावेळी राज्यसभेत नवे सभापती असतील. गेल्या वेळी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये झालेल्या नाट्याचे पडसाद कदाचित उमटू शकतील. जगदीप धनखड अजूनही ल्युटन्स दिल्लीत राहायला आलेले नाहीत. त्यांचा सार्वजनिक वावर सुरू झालेला नाही. नवे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यसभा सचिवालयाचं कामकाज कसं चालतं याची माहिती करून घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यसभेतील गटनेत्यांचीही बैठक त्यांनी घेतली होती. राधाकृष्णन राज्यसभेचं कामकाज कसं चालवतात हा चर्चेचा विषय असेल. धनखड सभागृहातच सदस्यांची ‘शाळा’ घेत असत, त्यांना ‘ज्ञानाचे डोस’ देत असत, राष्ट्रवादावर भाष्य करत असत. राधाकृष्णन हे पक्के संघविचारांचे असल्यामुळं सदस्यांचं ‘बौद्धिक’ घेणार की, संवादातून कारभार चालवणार हेही दिसेल.

फोल प्रयोगाचा नवा प्रयोग

दिल्लीचं आकाश काळं होण्याचे हे दिवस आहेत, प्रदूषणामुळं आभाळ दिसत नाही, धुरामुळे दूरचं दिसत नाही. सूर्यप्रकाश येत नाही. माणसं आजारी पडतात. सध्या हे सगळं होत आहे. भाजपच्या नव्या नव्या दिल्ली सरकारनं प्रदूषण कमी करायला क्लाउड सीडिंगचा (ढगांचे बीजन) प्रयोग केला. ढगांमध्ये पुरेशी आर्द्रता नव्हती, त्यामुळं योग्य ढगांची निर्मिती झाली नाही, पाऊस पडला नाही. त्यामुळं ३४ कोटी रुपये ढगात गेले असं म्हणतात. हा प्रयोग थोडा जरी यशस्वी झाला असता तरी त्यामुळे दिल्लीच्या प्रदूषणावर काही परिणाम झाला नसता हे कोणीही सांगू शकतं. प्रदूषण कमी करण्यासाठी किती वेळा हा प्रयोग करणार आणि किती कोटी खर्च करणार, हाही प्रश्न आहेच. पण, गुप्ताजींनी ऐकलेलं नाही. इतर राज्यांतही हा प्रयोग झाला होता, तिथं तो अपयशीच ठरला. महाराष्ट्रात १९७३-७४, ७६, ७९-८६ असे ११ वर्षं प्रयोग झाले. फारसं यश मिळालं नाही. कर्नाटक २०१७-१९, राजस्थान ऑगस्ट २०२५ मध्येही ढगांचे बीजन झाले होते. त्यातून काहीही हाती लागलं नाही. तरीही दिल्लीत प्रयोग केला गेला.