आत्तापर्यंत श्रीकांत शिंदे यांची ओळख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र एवढीच होती. त्यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ त्यांच्या वडिलांमुळं कसाबसा वाचला, नाही तर भाजपने तो कधीच गिळंकृत केला असता. शिंदेपुत्र दुसऱ्यांदा लोकसभेत निवडून आले आहेत. संसदेच्या सदस्यत्वाचा जितका शक्य तितका योग्य उपयोग करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. पण, त्यांनी लोकसभेचं सदस्यत्व गृहीत धरलं असावं. खरंतर त्यांना पक्षाने लोकसभेतील गटनेता केलेलं आहे. उपगटनेतेपद धैर्यशील मानेंना दिलं आहे. दोन्ही अपरिपक्व नेत्यांकडे पक्षाचं नेतृत्व दिलं असेल तर त्या पक्षाचं भवितव्य कसं असेल कोणाला माहीत? शिंदे गटात रवींद्र वायकर हेच गटनेते होऊ शकले असते, पण ते पहिल्यांदाच लोकसभेत निवडून आले आहेत. शिवाय, ते आहेत शिंदे गटात, पण त्यांचं मन रमतंय जुन्या शिवसेनेमध्ये. त्यामुळं श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पक्षाची धुरा सांभाळणं गरजेचं आहे. कुठल्याही सदस्यासाठी प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहर हे अत्यंत महत्त्वाचे असतात. या दोन तासांमध्ये लोकांचे प्रश्न थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचवले जातात. शुक्रवारी लोकसभेमध्ये प्रश्नोत्तरामध्ये आरोग्य मंत्रालयासंबंधी प्रश्न विचारले गेले. त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचाही प्रश्न होता. लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांनी, ‘प्रश्न क्रमांक १६४ खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे’, अशी नावाची घोषणा केली. पण, श्रीयुत श्रीकांत शिंदे सभागृहामध्ये नव्हते. केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा व राज्यमंत्री अनुप्रिया पटेल दोघेही खासदारांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. ते दोघेही शिंदेंना शोधत होते. पण, लोकसभाध्यक्षांसमोरील आसनांवरून कोणी उभं राहिलं नाही. मग, बिर्लांनी गुजरातमधील मेहसाणाचे भाजपचे खासदार हरीभाई पटेल यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली. तारांकित प्रश्न विचारणाऱ्या सदस्याला दोन पूरक प्रश्नही विचारता येतात. नेमके व थेट पूरक प्रश्न विचारून मंत्र्यांकडून स्पष्टीकरण मिळवणं, प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी मंत्र्यांना सभागृहात बाध्य करणं हेच तर खासदाराची कौशल्य असतं. ही संधी वाया घालवली तर सदस्य आपल्या खासदारकीबाबत किती गंभीर आहे हेच स्पष्ट होतं. श्रीकांत शिंदे यांना आणखी दोन प्रश्न विचारता आले असते! श्रीकांत शिंदेंच्या गैरहजेरीवर तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांनी आक्षेप घेतला. ते बिर्लांना म्हणाले की, सदस्य प्रश्न देतात, पण प्रत्यक्ष सभागृहात प्रश्न येतो तेव्हा ते हजर नसतात. अशा सदस्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे… बिर्लांनाही सौगतदादांचं म्हणणं पटलेलं दिसलं. ‘तुमची सूचना योग्य आहे. सदस्य गैरहजर राहणार असेल तर त्याने त्यामागील कारण सांगायला हवं’, असं बिर्ला म्हणाले.

२४०’ची कमाल…

विरोधी पक्ष सशक्त असेल तर काय होऊ शकतं याची प्रचीती गेल्या आठवड्यामध्ये पत्रकारांना आली. लोकसभा सचिवालयाने संसदेच्या आवारात उभा केलेल्या मोठ्या कंटेनरमध्ये वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना डांबून ठेवल्याचं प्रकरण खूप गाजलं. कंटेनरच्या पिंजऱ्यात अडकून पडावं लागल्यानं पत्रकारांनी निषेध केला. गेल्या दहा वर्षांत वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी केलेला हा पहिलाच निषेध असेल. प्रेस क्लब वगैरे पत्रकारांच्या संघटना वेगवेगळ्या घटनांचा निषेध करत असतात. पण, सत्ताधारी भाजप त्यांच्याकडं फार लक्ष देत नाही. या निषेधाचं वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनाही फारसं घेणदेणं नसतं. कारण अनेक पत्रकारांना भाजप हा देशाचा तारणकर्ता असल्याचा भास होत असतो. याच मंडळींना सत्ताधाऱ्यांनी संसदेच्या आवारात इंगा दाखवला. निषेधाचं खरं कारण हेच म्हणावं लागेल. आम्ही इतकी वर्षं भाजपच्या आवडीच्या बातम्या दिल्या आणि आता हेच आम्हाला पिंजऱ्यात कोंडून घालत आहेत. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानंच घात करावा अशी अवस्था झाली होती. मग, पत्रकारांना निषेध करण्याशिवाय पर्यायच उरला नाही! संसदेच्या सभागृहात जाताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकारांना पिंजऱ्यात कोंडून घातलेलं पाहिलं. त्यांनी गंभीर दखल घेत लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. आता विरोधी पक्षाची ताकद वाढल्यामुळं लोकसभाध्यक्षांना विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं गांभीर्याने घ्यावं लागलं. बिर्लांनी त्याच दिवशी संध्याकाळी पत्रकारांना बोलवून घेतलं आणि बराच वेळ चर्चा केली. त्यातून पत्रकारांचे काही प्रश्न मार्गी लागले. कायमस्वरूपी परवाना वगैरे काही प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली. गेल्या दशकभरात सत्ताधाऱ्यांनी पत्रकारांकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं, आता त्यांना पत्रकारांकडे लक्ष द्यावं लागतंय. ही सगळी ‘२४०’ची कमाल असल्याचं पत्रकार गमतीनं म्हणत होते! कंटेनरमध्ये जाऊन पत्रकारांची चौकशी करून राहुल गांधी निघून गेले. त्यानंतर लगेच त्यांचे निष्ठावान के. सी. वेणुगोपाल तिथं आले. एका पत्रकारानं त्यांचीच फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर ते म्हणाले, ‘गेली दहा वर्षं भाजपची तळी उचलत होतात, आता आम्हीच तुमच्या मदतीला आलोय!’. काँग्रेसचा उद्वेग समजण्याजोगा असला तरी पत्रकारांना टोमणे मारून काही हाती लागेल असं नाही.

मीच खरा शेतकरी

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखडांच्या महत्त्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत. त्यामुळं मागं एकदा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तुमचं हृदय डाव्या बाजूला असलं तर तुमचं मन उजवीकडं आहे, असा टोमणा मारला होता. धनखड खूप बोलतात असं काही खासदारांचं म्हणणं असतं. एकदा तर मोदींचं भाषण सुरू असताना त्यांनी स्वत:चं मत व्यक्त केलं होतं. त्यांच्यासमोर मोदींनाही थांबावं लागलं होतं. धनखड मूळचे शेतकरी. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आस्था. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात दोन्ही बाजूंनी तावातावानं मुद्दे मांडले जात असताना त्यांनी काँग्रेसचे खासदार आणि स्वयंघोषित विद्वान जयराम रमेश यांना, ‘तुम्हाला शेतीतलं काय कळतंय? तुम्ही कधी शेती केलीय काय?’, असं बोलून अपमान केला होता. काँग्रेसचे रणदीप सुरजेवालांनाही, ‘तुमच्यापेक्षा शेतीतलं मला जास्त कळतं. मीच खरा शेतकरी आहे’, असं म्हणत गप्प केलं होतं. सभागृहात धनखड विरोधी पक्षांच्या खासदारांवर डाफरत असले तरी, त्यांचे सर्वपक्षीय खासदारांशी सलोख्याचे संबंध आहेत. दररोज चार-पाच खासदारांशी ते आपल्या चेंबरमध्ये संवाद साधतात. आस्थेने विचारपूस करतात. धनखडांनी जयराम रमेश यांना शालजोडीतील मारले असले तरी, रमेश यांच्या घनिष्टतेवर हसत-हसत जया बच्चन यांनी भाष्य केलंच! ‘रमेश यांचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला जेवण जात नाही’, असं जया बच्चन म्हणाल्या. त्यावर, धनखड म्हणाले की, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी आज रमेश यांच्यासोबतच दुपारचं जेवण घेतलं… रमेश हे विरोधी पक्षनेते झाले असते तर त्यांनी सदस्यांना शिस्त लावली असती, अशा अर्थाचं विधान धनखड यांनी केलं होतं. तेव्हा मात्र खरगेंनी, ‘कोणा रमेशकडून मला शिकण्याची गरज नाही’, असं ठणकावलं होतं.

मामांचा करिष्मा

गेल्या आठवड्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. योगींनी अमित शहा आणि पंतप्रधान मोदींकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. योगींनी राजनाथसिंह यांना होत जोडून नमस्कार केला, पण मोदी-शहांना अव्हेरलं. योगींच्या या ‘आदरातिथ्या’ची देशभर प्रचंड चर्चा रंगली होती. योगी आणि मोदी-शहा यांच्यातील संबंध किती टोकाचे बिनसलेले असू शकतात याचा अंदाज या चित्रफितीवरून येऊ शकेल. राजकारणामध्ये कोण-कोणाचा मान राखतं याची चर्चा होत असते. योगींचा अहंकार त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. पण, काही राजकारणी इतके नम्र असतात की, त्यांच्यामध्ये अहंकाराचा लवलेशही नाही असं वाटू लागतं. केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे दुसऱ्या प्रकारातील राजकारणी आहेत. त्यांच्या जिवावर मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक भाजपनं जिंकली, पण त्यांना आता केंद्रात आणून बसवलं आहे. एकप्रकारे त्यांचं राजकारणच संपवण्याचा प्रयत्न केला गेला. योगींबाबत हाच प्रयोग केला जात आहे. असो. मुद्दा हा की, शिवराजसिंह इतके गोडबोले आहेत की, संसदेमध्ये छोट्या प्रश्नाचं उत्तर देतानाही, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली…’ हे वाक्य पोपटासारखं म्हटल्यानंतरच ते बोलायला सुरुवात करतात. शिवराजसिंहांना मामा म्हणतात. मामांच्या मृदू स्वभावामुळं त्यांच्याशी अनेक माणसं जोडली गेली आहेत. भाजपचे खासदार त्यांचा मान राखताना दिसतात. मामा सभागृहात आले की, खासदार आपणहून उभं राहतात, त्यांना आदरानं नमस्कार करतात. त्यांच्याशी आपणहून बोलतात. राज्यसभेत हमीभावाच्या मुद्द्यावरून सुरजेवालांनी मामांना घेरलं तेव्हा मनमोहन सरकारच्या धोरणांचा उल्लेख करून मामांनी बाजी पलटवली होती. त्यानंतर भाजपचे अनेक खासदार-मंत्री त्यांचं अभिनंदन करण्यासाठी धावले होते. मामा भोपाळमधून दिल्लीत आले तरी त्यांचा करिष्मा टिकून आहे.