दिल्लीवाला
ग्यानेश कुमार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाची सूत्रं हाती घेतल्यापासून आयोगाला पुन्हा विश्वासार्ह बनवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त या नात्याने ग्यानेश कुमार यांनी देशभरातील राज्य व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचं दोन दिवसांचं चर्चासत्र घेतलं होतं. या चर्चासत्रामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना वेळ द्या, त्यांच्या तक्रारींचं निरसन करण्याची सूचना दिली होती. त्यासंदर्भात ग्यानेश कुमार यांनी अहवालही मागितले होते. राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्लीत येऊन नियमितपणे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासही सांगण्यात आलं होतं. आता ग्यानेश कुमार यांनी पुढच्या टप्प्यात राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती व त्यांच्या पक्षांच्या नेत्यांशी निवडणूक प्रक्रियेतील शंका-कुशंका, आक्षेप यावर सविस्तर चर्चा केली. भाजपच्या नेत्यांनाही बोलावण्यात आलं होतं. भाजपचे पायउतार होणारे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या शिष्टमंडळानेही ग्यानेश कुमार यांच्याशी चर्चा केली होती. ‘माकप’चं शिष्टमंडळही भेटून गेलं. काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा करण्यासाठी आमंत्रण देण्यात आलेलं आहे. ही भेट काँग्रेसच्या नेत्यांनी पुढं ढकलली असली तरी, नजिकच्या काळात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह इतर वरिष्ठ नेते निवडणूक आयोगाच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे.

ऑपरेशन सिंदूर’चं ‘डोसिअर’ !

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल संरक्षणा दलांचं अभिनंदन करण्यासाठी भाजपने देशभर तिरंगा यात्रा सुरू केली आहे. ११ दिवसांची ही यात्रा २३ मे रोजी संपेल. भाजपच्या नेतृत्वाला वाटलं तर ही यात्रा पुढंही महिनाभर सुरू राहू शकते. तिरंगा यात्रा भाजपची असली तरी, पक्षाचं बॅनर कुठंही नाही. ही देशाची यात्रा असून पक्षीय राजकारणाला दूर ठेवण्यासाठी भाजपचा झेंडा कुठंही न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. ही यात्रा १३ मे पासून सुरू झाली, ती कदाचित आधीही सुरू झाली असती. ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत लष्कर आणि हवाई दलाची पाकिस्तानविरोधात संयुक्त कारवाई सुरू होती, तेव्हाच संरक्षण दलांना पाठिंबा देण्यासाठी यात्रा काढली जाणार होती. पण, तोपर्यंत दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाल्यामुळं या यात्रेचं रूपांतर संरक्षण दलाच्या अभिनंदनामध्ये झालं. या यात्रेमधून संरक्षण दलांचं यश अधोरेखित केलं जात आहे. त्याचबरोबर, मोदींच्या नेतृत्वाचंही यश असल्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य हेतू या यात्रेमागं आहे. भाजपचे नेते व प्रवक्ते यांच्याकडून लोकांपर्यंत कोणती माहिती कशी पोहोचवली पाहिजे याबद्दल स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घातलं होतं असं म्हणतात. शस्त्रसंधी झाल्यानंतर मोदींनी ‘७ लोककल्याण मार्ग’ या सरकारी निवासस्थानी भाजपच्या काही नेत्यांची व प्रवक्त्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये पंतप्रधान कार्यालयातील मोदींचे विश्वासू, एखाद-दोन केंद्रीय मंत्री, प्रवक्ते यांचा समावेश होता. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने पाकिस्तानविरोधात कोणती कारवाई केली, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी कोणते उपाय योजले गेले, यापुढं काय केलं जाणार आहे, याची माहिती देण्यात आली. मोदींनी भाजपच्या नेते व प्रवक्त्यांशी सविस्तर संवाद साधला होता. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत केंद्र सरकारच्या वतीने ‘डोसिअर’ (संपूर्ण माहितीचे टिपण) तयार करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ची नकाशांसह तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, सिंधू पाणीवाटप कराराअंतर्गत पाकिस्तानची कोंडी कशापद्धतीने केली जात आहे, याचाही तपशील या ‘डोसिअर’मध्ये दिलेला आहे. हे ‘डोसिअर’ प्रसारमाध्यमांपर्यंतही पोहोचवण्यात आलं आहे. भाजपचे नेते व प्रवक्त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत प्रसारमाध्यमांमध्ये वा जाहीरपणे बोलताना या ‘डोसिअर’मधील मुद्द्यांच्या आधारे केंद्र सरकारची बाजू मांडण्याची सूचना या बैठकीत केल्याचं सांगितलं जातं. ‘डोसिअर’मधील मुद्दे घेऊनच देशभर भाजपच्या वितीने तिरंगा यात्रा काढली जात आहे. या यात्रेमध्ये ‘एनडीए’तील घटक पक्षांना देखील सहभागी होण्याची विनंती करण्यात आल्यामुळं हे ‘डोसिअर’ कदाचित मित्र पक्षांनाही देण्यात आलं असावं. दिल्लीमध्ये २४ मे रोजी निती आयोगाची बैठक असून सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होतील. त्यामध्ये भाजप व ‘एनडीए’तील मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल. ‘एनडीए’तील सर्व मुख्यमंत्र्यांशी मोदी ऑपरेशन सिंदूर संदर्भात संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘एनडीए’च्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन देशभर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याचा उद्देश काय होता, त्यातून काय साध्य झालं, शस्त्रसंधी करण्यामागील घटना काय होत्या, ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच राहील म्हणजे नेमकं काय, अशा लोकांच्या मनातील शंकांचं निरसन केलं जाणार असल्याचं सांगितलं जातं.

काय सांगता? आम्हाला माहीतच नाही!

संरक्षण दलांच्या तीनही ‘डीजीएमओं’नी दोन वेळा एकत्रित पत्रकार परिषद घेतली. ‘डीजीएमओं’नी पत्रकार परिषद घेण्याची बहुधा पहिलीच वेळ असावी. तीनही ‘डीजीएमओ’ मिश्कील होते. पाकिस्तानातील ‘किराना हिल’नजिकच्या हवाई तळावर हल्ला केल्यानंतर अण्वस्त्र गळतीसंदर्भात प्रश्न विचारला गेला. त्यावर हवाई दलाचे ‘डीजीएओ’ एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले, आम्ही तर किराना हिलवर हल्ला केलाच नाही. पण, पाकिस्तानची अण्वस्त्रं तिथं आहेत, हे तर आम्हाला माहीतच नव्हतं. तुम्हीच आम्हाला ही माहिती देत आहात, असं म्हणत ते गालातल्या गालात हसले! पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे आणि हवाई तळांवर केलेल्या हल्ल्यांच्या अवघ्या एखाद-दोन मिनिटांच्या चित्रफिती दोन्ही पत्रकार परिषदेमध्ये दाखवल्या गेल्या. त्यावरही टिप्पणी करताना, आत्ता तुम्ही चित्रफीत पाहिली आहे, ती ‘ओपन सोर्स’मधून आलेली आहे. तुम्हालाही ही चित्रफीत पाहायला मिळाली तशीच आम्हालाही, असं म्हणत भारती पुन्हा मिश्कीलपणे हसले. पाकिस्तानातील हल्ल्याचं चित्रणं कोणी-कधी केलं हे खरंतर सगळ्यांना माहिती होतं. पण, भारतींची माहिती देण्याची पद्धत अनेकांना आपलंसं करून गेली. ‘राफेल’ लढाऊ विमान कोसळल्याच्या वृत्ताबद्दल भारतींनी अर्थातच काही सांगितलं नाही. ते एवढंच म्हणाले की, आपण आपलं लक्ष्य गाठलं का याचं उत्तर अधिक महत्त्वाचं आहे. शिवाय, आपले सर्व पायलट सुरक्षित आहेत!… या उत्तराचा कोणी कसा अर्थ लावेल माहीत नाही. भारतींनी रामचरित् मानसमधील काव्यपंक्ती म्हणून पत्रकार परिषदेचा नूर बदलून टाकला होता. त्याच पत्रकार परिषदेत ‘डीजीएमओ’ लेफ्ट. जनरल राजीव घई यांनी क्रिकेटपटू विराट कोहली आणि डेनिस लिली- जेफ थॉमसन यांचं उदाहरण देऊन जणू क्रिकेटच्या मैदानावर उभं असल्याचा भास निर्माण केला! घई क्रिकेटप्रेमी आहेत. त्यांचं शिक्षण ‘जेएनयू’मध्ये झाल्याचं काहींचं म्हणणं आहे. ‘जेएनयू’मध्ये असताना राजीव घई क्रिकेट खेळत असत. आता त्यांच्या डोक्यावरील केस विरळ झाले असले तरी ‘जेएनयू’च्या काळात त्यांचं व्यक्तिमत्त्व अनेकांना भुरळ घालणारं होतं. काहींच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे आक्रमक अतिजलद गोलंदाज डेनिस लिलीची झाक होती. राजीव घईंचं किक्रेटप्रेम पत्रकार परिषदेतही उफाळून आलेलं दिसलं. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताची तीन-चार स्तरीय संरक्षण प्रणाली कशी पुरून उरली हे सांगताना राजीव घई यांनी थॉमसन आणि लिली यांचं उदाहरणं दिलं होतं. भारताची संरक्षण प्रणाली इतकी मजबूत आहे की, कुठल्या ना कुठल्या स्तरात शत्रूला तडाखेबंद प्रत्युत्तर देऊन त्यांना नेस्तनाबूत केलं जाणारच असं घईचं म्हणणं होतं. त्यासाठी थॉमसन आणि लिली!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गांधीजींचा वारसा

कॅनडाच्या परराष्ट्रमंत्रीपदी भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॅनडामध्ये खासदार बनलेल्या अनिता पहिल्याच. अनिता यांचे आजोबा व्ही. ए. सुंदरम हे १९१५ पासून महात्मा गांधींचे जवळचे सहकारी होते. १९३१ मध्ये, सप्टेंबर-डिसेंबर १९३१ मध्ये लंडनमध्ये झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या पूर्वसंध्येला, गांधीजींनी सुंदरम यांना भारताच्या स्वातंत्र्याचा संदेश देण्यासाठी युरोपला पाठवलं होतं. बर्लिनजवळील पॉट्सडॅम इथं सुंदरम यांची आइन्स्टाईनशी भेट झाली होती. आइन्स्टाईन यांनी १७ सप्टेंबर १९३१ रोजी गांधीजींना पहिल्यांदा पत्र लिहिलं. त्यानंतर एका महिन्यानंतर लंडनमधून या पत्राचं उत्तर गांधीजींनी दिलं होतं. या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांमधील ही देवाणघेवाण विलक्षण म्हटली पाहिजे… सुंदरम हे वर्षानुवर्षे बनारस हिंदू विद्यापीठाशी जोडलेले होते. या विद्यापाठाची स्थापना करणाऱ्या मदन मोहन मालवीय यांचेही ते सहायक होते. हे पाहिलं तर अनिता आनंद यांना त्यांच्या आजोबांच्या माध्यमातून गांधीजींचा वारसा लाभलेला आहे. अनिता यांची परराष्ट्र मंत्रीपदी नियुक्ती झाल्या-झाल्या काँग्रेसचे खासदार व पक्षाच्या माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी ट्वीट करून ही माहिती दिली!