आयुष्य एन्जॉय कर.. फार विचार वाईटच.. यासारखे सल्ले मिळत असताना मैदानालाही दारे असतात, चांदणे दुरावते; पण जाणिवांचे नवे प्रदेश शोधावेतच..
स्लोअर शहाणेने २००० मध्ये वयाची पंचविशी पार केली, तेव्हा वाढदिवसाला स्वत:लाच एक पत्र लिहिले होते. या पंचविशीच्या टप्प्यापासून पुढे काय केले पाहिजे, असे चिंतन वगैरे मांडण्याचा त्या वयानुरूप केलेला स्लोअरचा हा प्रयत्न, किंबहुना बराचसा देखावा होता. त्यात अगदी त्याने इी Columbus of your soul’ वगैरे म्हटले होते. काय शोधायचे हे माहीत नसले की माणूस असे लिहितो, हे कळायला स्लोअरला नंतर बराच वेळ लागला. ‘कोलंबस काही तरी शोधायचे होते म्हणून नाही, तर प्रवास करता करता काही तरी गवसेल, या आशेवर बाहेर पडला,’ असे वाक्य त्या उमजेनंतर स्लोअरने ‘रोजदिनी’त नोंदवूनही ठेवले होते.
त्यानंतरचे स्लोअरचे प्रवास किंवा थांबणे शोधण्यासाठीचे नाही, तर सापडण्यासाठीचे झाले. त्यातूनच त्याने नव्या सहस्रकाची पंचविशी सुरू झाल्यावर हे सापडलेले वेचायचे ठरवले, वेचलेल्याचे प्रदर्शन मांडून त्यातून पुन्हा काही सापडते का, ते बघायचे ठरवले. हे आत्मगत, व्यक्तिगत असेच करायचा मनोदय असला, तरी प्रदर्शन मांडल्यावर ते इतरांना दिसणार होते. तसे ते इतरांना दिसायला लागल्यावर स्लोअरला मोह झाला, की त्याच्या या वेच्यातून, गवशी अभिलाषेतून इतरांना जे जे दिसले असेल, ते ते त्यांच्याकडून जाणून घ्यावे. शिवाय, हे प्रतिक्रियांची चटक लागलेल्या आजच्या काळालाही अगदी धरून होईल. पण, मागवायचे कसे? असे.. सहस्रकाची पंचविशी संपताना आपल्या आलेल्या पन्नाशीसाठी इतरांकडून पत्रे मागवून.
पण ही पत्रे लिहिणार कोण? स्लोअर विचारात पडला. ‘गोतावळा नकोच; त्याने नुसती गुंतवळ होते,’ असा विचार नुकताच काही वर्षांपूर्वी केलेला असल्याने, स्लोअरने मैत्री, नाती वगैरेचे बंध तर कधीच सैल करून टाकले होते. त्याला भले त्याने मुक्त वाटले असले, तरी आता आपल्याला उद्देशून लिहिलेली पत्रं मागवायला हक्काचे कुणीच नाही, हे लक्षात येऊन स्लोअर पेचात पडला. मग त्याला एक कल्पना सुचली. फार परिचित नसलेल्या काही जणांना एकच एक दीर्घ पत्र लिहायचे आणि त्याचे पत्रोत्तर मागवायचे. स्लोअर फार पूर्वी, म्हणजे शाळेत असताना वर्गमित्रांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट कार्ड पाठवायचा. प्रत्येक पोस्ट कार्डावर ‘दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा’ असे हाताने लिहायचा. हाताने लिहिलेल्या अक्षरांत आत्मीयता असते, असे त्याचे म्हणणे. दर दिवाळीत तो अशी ५० ‘आत्मीय’ पत्रे पाठवायचा. त्याच यादीची त्याने हे पत्र पाठविण्यासाठी उजळणी केली. बरेच जण त्या पत्त्यावर नसतील, असे गृहीत धरूनही किमान ९-१० तरी पत्रोत्तरे येतील, असा त्याचा होरा.
आपण ज्यांना पत्रे लिहिणार, त्यांना या पत्रात आपण मांडलेल्या प्रदर्शनाचे सार असेल. त्यावर आलेली पत्रोत्तरे हेच आपल्या पन्नाशीच्या वाढदिवसाचे पुढील बराच काळ पुरेल असे चिंतन, असेही स्लोअरने ठरवून टाकले. पण, ज्याला पत्र लिहायचे, त्याला काय संबोधावे, असा प्रश्न स्लोअरला पडलाच. बराच विचार करून त्याने ‘माननीय’, ‘महोदय’, ‘सनविवि’ वगैरे टाळून सरळ सरसकट ‘प्रिय सुहृदा’ असेच सर्व पत्रांचे संबोधन ठेवले आणि खाली मजकूर लिहिला..
‘तुला हे पत्र पाठवतो आहे, ते तुझ्या उत्तराच्या मिषाने. पण, मला आसक्ती आहे म्हणून तू ते द्यावेस अशी सक्ती नाही. वयाच्या पन्नाशीत शिरताना निर्मम, निरंहकार वगैरे असावे, असे लोक सांगतात. पण, माझी आसक्ती संपत नाही. तशी ती कोणत्याच मध्यमवर्गीयाची संपत नाही, जरी त्याने आयुष्याच्या उत्तरार्धात कितीही प्रवचने वगैरे ऐकली. त्यामुळे पन्नासाव्या वाढदिवसाला किमान मला पत्रोत्तर पाठवावे, एवढी विनंतीवजा अपेक्षा ठेवणे गैर नाही. शेवटी, मी मध्यमवर्गीयच. अर्थात, मी वयाची ५० वर्षे पूर्ण करणार, यात माझे काहीच मोठे कर्तृत्व नाही, ही जाणीव मला आहे. आता खरे तर आपण रोजच कणाकणाने वाढत असल्याने प्रत्येक दिवस हा वाढदिवसच. त्याचे काय कौतुक? पण, एकदा मी असे म्हटले, तर मला जाणीव करून देण्यात आली, की मध्यमवर्गीय काटकसरीच्या व्याख्येत रोज रोज वाढदिवसाच्या शुभेच्छा महाग पडू शकतात. त्यामुळे तो वर्षांतून एकदाच करणे इष्ट. फार लाड केले की मूल बिघडते, तसे रोजच वाढदिवस आहे असे म्हटल्याने माणूस रोज आनंदी राहून शेफारू शकतो. आणि मध्यमवर्गीयाने फार शेफारून चालत नाही. त्याला आनंदापेक्षा दु:खाची, किमान दु:खाच्या आठवणीची तरी सवय असणे आवश्यक असते. दु:ख टिकले, तर कमतरता लक्षात राहतात. कमतरता लक्षात राहिल्या, तर आकांक्षा वाढतात. मध्यमवर्ग हा ‘अॅस्पिरेशनल क्लास’, त्यामुळे आकांक्षा वाढणे चांगलेच. त्या मरेपर्यंत संपू नयेत आणि मध्यमवर्गाने आपला वर्ग सोडू नये, असे या वर्गातील भले लोक सांगतात. तर मुद्दा हा, की आकांक्षा वाढत वाढत जाऊन त्यांचा संकल्प सोडण्यासाठी वर्षांतून एकदाच वाढदिवस असणे चांगले. थोडक्यात, वाढदिवस हा वाढलेल्या आकांक्षांच्या आणखी वृद्धीसाठी सोडायच्या संकल्पासाठी नेमलेला दिवस असतो. वाढदिवसाची ही व्याख्या कळल्याने आणि मुळात मी मध्यमवर्गीय असल्याने मला रोजचा दिवस वाढदिवस असे म्हणून चालणार नाही, हे लक्षात आले. शिवाय, तसे म्हटले तर मला उगाच विचारवंत वगैरेही म्हणण्याचा धोका असल्याने, मी ते तसे म्हणायचे टाळतोच. मध्यमवर्गीयाला एक वेळ पेट्रोल, किराणा माल, भाजीही परवडेल, पण विचारवंत होणे परवडणार नाही. तर ते असो. तसे पाहिले तर दर वर्षी आपल्या जन्माची तारीख फिरून फिरून परत येते, ती खरे तर हे सांगायला, की शरीर म्हणून तुझे अस्तित्व आणखी एका वर्षांने वाढले – किंवा खरे तर कमी झाले. त्यामुळे अस्तित्व वर्षभराने वाढल्याचा करायचाच असेल सोहळा, तर तो शरीराच्या कौतुकासाठी करावा. अस्तित्व वर्षभराने कमी झाल्यासारखे वाटत असेल, तर आतापर्यंत काय केले, याचा कौल घ्यावा. तोच घेण्यासाठी हे पत्र. सुहृदा, अगदी मोकळेपणाने सांग, की या वाढदिवसाला काय संकल्प सोडू?’ पत्राच्या शेवटी ‘स्लोअर’ एवढीच स्वाक्षरी करून स्लोअर शहाणेने पत्र संपवले आणि दिले धाडून ५० पत्त्यांवर.
स्लोअरला वाटले होते, त्यापेक्षा कमीच, म्हणजे ३-४ च पत्रोत्तरे आली. मध्यमवर्गीय असल्याने त्याला साहजिकच वाटून गेले, की फेसबुक, इन्स्टाग्रामवर वगैरे टाकले असते, तर ‘वॉव’, ‘ऑसम’, ‘भारी’, ‘मस्त’ इत्यादी संदर्भहीन का होईना, शेकडो अल्पाक्षरी कमेंट, ‘लाइक’चे उंचावलेले हजारभर अंगठे आणि बदामाच्या बक्कळ खुणा मिळाल्या असत्या. पण आपल्या ते लक्षातच आले नाही. नव्या काळाच्या नियमाप्रमाणे प्रदर्शन तर मांडले, पुढे ‘.. आणि विक्री’ ही बाजारपेठीय शर्त विसरलो. तर ते असो! स्लोअरने बसल्या बसल्या करायचे मानेचे व्यायाम करून त्या झटक्यात तो विचारही झटकून टाकला. आलेली पत्रोत्तरे त्याने वाचायला घेतली. फार मोठी नव्हतीच. दोन-तीनच ओळी म्हणा ना. सुरुवात करताना स्लोअरसाठी संबोधनेही ‘स्लोअऱ्या’, ‘स्लोअरू’, ‘स्लो.श.’ अशी. एकाने लिहिले, ‘चिल कर, आयुष्य एन्जॉय कर. पन्नाशीला आता हाच संकल्प!’ दुसऱ्याचा सल्ला होता, ‘स्मार्ट वॉच वापरू नकोस हाच संकल्प; पावले मोजून उगाच पायदुखी!’ तिसऱ्याचे म्हणणे होते, ‘सावर स्वत:ला. सांभाळ मनाला. फार विचार वाईटच. काळजी घे. नकोच नवीन संकल्प.’
तीन पत्रांच्या वाचनातच स्लोअर शिणला आणि त्याने थेट त्याच्या हक्काच्या मित्राला, क्लेव्हरला फोन लावला. तीन-चारदा प्रयत्न करूनही क्लेव्हरने फोन उचलला नाही. स्लोअर विषादाने घराबाहेर पडला. त्याची पावले त्याला फुटबॉल मैदानावर घेऊन गेली. गवताची काडीही न उगवलेल्या कोरडय़ाठाक फुटबॉल मैदानावर आता पाणी साचवून साचवून गवत उगवले होते. पण, त्यावर पाय ठेवण्यासाठी आता परवानगी लागायला सुरुवात झाली होती. ‘मैदानालाही दारे असतात,’ अशी ओळ सुचण्याच्या बेतात असताना स्लोअर मैदानापाठच्या टेकडीमागे पश्चिमेकडे उगवणारे चांदणे तरी दिसते का, म्हणून नजर वळवू लागला, तर एका उंचच उंच इमारतीने त्या चांदण्यालाही कुंपण घातल्याचे त्याच्या लक्षात आले. वयाच्या पन्नाशीच्या उंबरठय़ावरचा स्लोअर शहाणे आता अमूर्तावरही मालकी सांगू शकत नव्हता!
ता.क. – मैदानावरून खालमानेने निघता निघता स्लोअरला वाटेत अचानक सोलोलुक्वी भेटला. त्याने स्लोअरला एकच वाक्य सांगितले, ‘जाणिवांचा वेगळा प्रदेश शोध, तोवर काहीच लिहू नकोस. हाच संकल्प.’
