सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाचे विद्यार्थी गेली २५ वर्षे विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिपातळीची नोंद ठेवत आहेत. गेल्या वर्षीच्या मिरवणुकीत अनेक ठिकाणी ही नोंद शंभर डेसिबलच्या पुढे गेली. ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० नुसार निवासी विभागातील दिवसाची मर्यादा ५५ डेसिबल आहे. डेसिबल हे प्रमाण लॉगरिदमिक असल्याने हा फरक किरकोळ नाही; शंभर डेसिबलची ध्वनिऊर्जा ५५ डेसिबलच्या सुमारे ३० हजार पट असते. असे बारकावे सामान्यांच्या लक्षात येत नाही आणि तज्ज्ञांची मुस्कटदाबी करायची कला समाजाने केव्हाच विकसित केलेली आहे.

उत्सवाच्या दिवसांसाठी जी सवलत दिली जाते, ती वेळेची आहे; आवाजाच्या मर्यादेची नाही. ध्वनिक्षेपकाचा वापर हा कोणत्याही धर्माचा अनिवार्य भाग नाही, हे मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. महेश बेडेकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य (२०१६) या निकालात स्पष्ट केले आहे. जानेवारी २०२५ च्या निकालातही न्यायालयाने नोंदवले, की ध्वनिक्षेपकाचा वापर हा अनुच्छेद २५ अथवा १९(१)(अ) खालील हक्क नाही. हे निकष कोणत्याही एका धर्मापुरते नाहीत; मशीद, चर्च आणि मंदिर या सर्वांना तेच नियम सारखे लागू होतात. आमचा आक्षेप डेसिबलवर आहे.

या आवाजाची किंमत नास्तिक तर चुकवतातच. पण मिरवणुकीत तासन्तास उभे राहणारे तरुण कार्यकर्ते, मार्गावरील रुग्णालयांतील रुग्ण, परीक्षेच्या तोंडावरची मुले आणि घरातील वृद्ध हेही चुकवत असतात, हे सगळे आपल्याच समाजातले घटक असतात. आणि गंमत म्हणजे डीजेची सवलत या सर्वांच्याच नावावर मागितली जाते, तेही त्यांना विश्वासात न घेता, नास्तिक तर लांबच राहिले. मुळात ज्यांना ज्यांना आवाजाचा परिणाम जाणवेल त्या त्या सर्वांना विश्वासात न घेणे ही एकप्रकारची मनमानी, बळजबरीच नाही का?

यावर बोलून वाईटपणा घ्यावा असे माझे मत आहे, कारण हे चित्र नवे नाही. जादूटोणाविरोधी कायद्याने ज्यांना संरक्षण मिळाले ते नास्तिक नव्हते; भोंदूगिरी आणि फसवणुकीला बळी पडलेली सामान्य धार्मिक कुटुंबेच होती. तो अध्यादेश डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अवघ्या काही दिवसांत निघाला. आगरकरांची हयातीत प्रेतयात्रा काढली गेली. ज्यांना त्या काळात धर्मद्रोही ठरवले गेले, त्यांनीच आज सर्वांना उपलब्ध असलेली संरक्षणे मिळवून दिली.

म्हणूनच प्रशासनाने दबावापुढे झुकू नये. मंडळांच्या मागे संघटित यंत्रणा आहे; ज्यांचे कान, झोप आणि आरोग्य पणाला लागते त्यांच्यामागे ती नाही. कायद्याची अंमलबजावणी हेच त्यांचे एकमेव संरक्षण आहे.

मयूर कुळकर्णी, कोअर कमिटी मेम्बर, ब्राइट्स सोसायटी, पुणे

विरोध उपद्रवकारक साजरीकरणाला

‘अमर्याद ‘आव्वाज’’ हे संपादकीय ( २९ ऑगस्ट) वाचले. सण उन्मादानेच साजरे करायचे ही विकृती अंगात इतकी भिनली आहे की, वृद्ध नागरिक, रुग्ण, विद्यार्थी, नवजात बालके यांना कर्कश ध्वनिप्रदूषणाने होणार्‍या त्रासाबाबत आमच्या संवेदना पार बोथट झाल्या आहेत. विद्यानंद बापट यांच्या मतांचा तर्कशुद्ध, प्रभावी प्रतिवाद करण्याची क्षमता नाही, या संबंधितांच्या हतबलतेतून ( नेहमीप्रमाणेच ) मनगटशाहीचा वापर करून बापट यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. वास्तविक सण साजरा करण्यास कुणाचाच विरोध नसतो. ( अगदी नास्तिकांचा वा हिंदुत्ववादी राजकारण विरोधकांचाही नसतो.) विरोध असतो तो, त्याच्या अत्यंत उपद्रवकारक साजरीकरणाला. पण हे वास्तव सोयीस्करपणे नजरेआड करून ‘फक्त हिंदूंच्या सणांना विरोध का ?’ असा दिशाभूल करणारा कांगावा केला जातो. आणि तो केला की, अन्य कुठल्याही तर्कशुद्ध युक्तिवादाची गरज न भासणारा समाज अलीकडच काळात आकारास आला आहे. सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांचा भक्कम पाठिंबा आणि प्रोत्साहन हे यामागचे प्रमुख कारण आहे. यामुळे सारी प्रशासन व्यवस्था हतबल ठरते. वास्तविक ‘नेता’ या शब्दाचा अर्थ विधायक व विवेकी मार्गाने चालण्यासाठी जो समाजाला आपल्या पाठीमागे यायला लावतो तो! पण अलीकडचा काळात जो स्वत: ‘गर्दी’ च्या पाठीमागे फरफटत जातो तोच नेता, असे समीकरण बनले आहे. ते जोपर्यंत बदलत नाही तो पर्यंत ‘अमर्याद आव्वाजा’चे प्राबल्य राहणार असे दिसते.

अनिल मुसळे, ठाणे ( पश्चिम )

दणदणाटाशिवाय उत्सवच नाही?

‘अमर्याद ‘आव्वाज’’ हे संपादकीय वाचले. गणेशोत्सवातील ध्वनिवर्धक आणि नंतर ढोल – ताशे यांच्या कर्कश आवाजाला विरोध करणारे पुण्याच्या नारायण पेठेतील रहिवासी विद्यानंद बापट सध्या समाज माध्यमातून चर्चेत आले आहेत. दणदणाटी उत्सवांतील ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वाच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील डी. जे., डॉल्बीचा दणदणाटाची कमाल पातळी ओलांडल्याविना उत्सव साजराच होत नाही. न्यायालयीन आदेशाची यंत्रणेकडून काय आणि कशी अंमलबजावणी होते हे सर्वश्रुत आहे. गतवर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मुंबईत १२०.२, तर पुण्यात १०५ डेसिबलपर्यंतच्या दणदणाटाची नोंद झाली आहे. संशोधनानुसार ७९ डेसिबलपर्यंतचा आवाज मानवी कानासाठी सामान्य आहे. तर भारताच्या केंद्रीय प्रदूषण मंडळाने त्याची मर्यादा ६५ डेसिबल इतकी निश्चित केली आहे. आजच्या आधुनिक – उत्सवांबाबत काही आक्षेप नोंदवले की रूढीं, परंपरा, धार्मिक अस्मितांचे मुद्दे अकारण प्रतिष्ठेचे करून तोंडे बंद केली जातात. वास्तविक सण, समारंभ, उत्सव साजरे करताना त्यांचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी.

बाळकृष्ण शिंदे, बिबवेवाडी, पुणे

निर्बंधमुक्त म्हणजे दणदणाट नाही

‘अमर्याद ‘आव्वाज’’ हा अग्रलेख (२९ ऑगस्ट) वाचला. पुण्यातील नारायण पेठेतील रहिवासी विद्यानंद बापट यांच्या प्रातिनिधिक तक्रारीला डी. जे. च्या आवाजातच (!) गणेशोत्सव मंडळांच्या आणि सरकारच्या कानी पोहोचवण्याची वेळ आली आहे. ध्वनिप्रदूषणाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी बापटांना साथ दिली, तर कदाचित या ध्वनिप्रदूषणाला आळा बसेल; अन्यथा नाही. निर्बंधमुक्त उत्सव म्हणजे नागरिकांना बहिरे करण्याचा परवाना नव्हे. मंडळांनीही स्वयंशिस्त पाळून आपल्या सामाजिक परिपक्वतेचे दर्शन घडवावे, एवढीच रास्त अपेक्षा. गणेशोत्सव हा केवळ उत्सवाचा नव्हे, तर चेतना-जागृतीचा प्रसंग ठरला, तरच त्याचे खरे सार्थक होईल.

राघवेंद्र मण्णूर, डोंबिवली

विपरित परिणाम करणारी वाद्ये नकोतच

‘अमर्याद ‘आव्वाज’’ हा अग्रलेख वाचला. हृदयाची धडधड वाढविणारी, गरोदर स्त्रिरया, वयस्कर लोक, लहान मुले यांच्यावर विपरित परिणाम करणारी सर्व वाद्ये ही बंद केलीच पाहिजेत. अन्यथा पोलिसांवरच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याबाबतचे गुन्हे थेट न्यायालयातच दाखल व्हायला हवेत. कारण अशा तक्रारी पोलीस दाखल करून घेतच नाहीत.

प्रकाश विचारे, नवे पनवेल</strong>

‘त्यांचे’ ध्वनिप्रदूषण जास्त, आपले कमीच 

‘अमर्याद ‘आव्वाज’’  संपादकीय वाचले. गणेशोत्सव आला की आवाज फाऊंडेशन आणि मराठी वृत्तपत्रे कमालीच्या उत्साहाने ध्वनी प्रदूषणाच्या दृष्टीने कामाला लागतात. मोहरमच्या वेळी दणादणा डी.जे. वाजत असताना ताबुतांच्या मिरवणुकांचे वेळी हे सारे कोणत्या बिळात लपलेले असतात कळत नाही, ‘आवाज फाऊंडेशन’ची ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजण्याची पद्धत ही सदोष आहे. सामान्यत: सध्याच्या परिस्थितीत, विविध कारणास्तव सर्वच ठिकाणी, आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा अधिकच असते. हा प्रयोग दस्तुरखुद्द मुंबई उच्च न्यायालयात केला गेला होता. न्यायालयात प्रत्यक्षात कोणतीही ॲक्टिव्हिटी चालू नसताना आवाजाची पातळी मोजली असता ती मर्यादेपेक्षा जास्त नोंदली गेली, याला कारण वातावरणात आवाजाची सतत होत असणारी स्पंदने होय. फाऊंडेशन डी. जे. वाजत असतानाच्या आवाजाच्या पातळीतून जर त्याच ठिकाणच्या सर्वसाधारण ध्वनी प्रदूषणाची पातळी वजा करून तेथील आवाजाच्या पातळीची मोजदाद करेल तर त्यांना जाणवेल की गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत होणारे ध्वनिप्रदूषण अत्यंत किरकोळ असते. मुख्यत्वे करून गणेशोत्सव मिरवणुकीत घरगुती गणपती सहसा डी. जे. चा वापर करतच नाही आणि दोन सार्वजनिक गणपतींच्या मिरवणुकीत अंतर बरेच मोठे असते, सबब ध्वनिप्रदूषणात फार मोठा फरक पडत असतो. उलट ताबूतांच्या मिरवणुका एकाला दुसर्‍या जोडूनच पुढे सरकत असतात आणि त्या प्रत्येकाच्या डी. जें चा दणदणाट एकापेक्षा एक सरस असतो. ॲड. एम. आर. सबनीस, अंधेरी (पूर्व) मुंबई