डॉ. राहुल मगर
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठ्यांवर अभूतपूर्व संकट कोसळले होते. मराठ्यांच्या राज्याची राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेली होती. संभाजीपुत्र शाहू, येसूबाई आणि इतर अनेक सदस्य मुघलांच्या कैदेत होते. औरंगजेब स्वत: दक्षिणेत जातीने हजर होता आणि मराठा राज्याचा संपूर्ण नायनाट करण्याचा निर्धार करून बसला होता. अशा परिस्थितीत मराठा राज्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता. परंतु मुघल सामथ्र्यापुढे मराठ्यांनी पराक्रम गाजवून केवळ आपले अस्तित्व टिकवले नाही, तर पुढे मुघल साम्राज्याच्या र्‍हासाचे मुख्य कारण म्हणून मराठे उभे राहिले.

या विजयाला विविध घटक कारणीभूत होते. मराठ्यांचे आणि सह्याद्रीचे नाते, मराठ्यांचा चिवटपणा, राज्य टिकविण्याची तीव्र इच्छाशक्ती यांसारखे अनेक घटक आपल्याला दिसतात, मात्र या सर्वांत महाराणी ताराबाई यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानावे लागेल. ताराबाईंची राजकीय दूरदृष्टी, नेतृत्वगुण, लष्करी धोरणे आणि संघर्षशील वृत्ती यांमुळे मराठा प्रतिकाराला नवीन दिशा मिळाली.

मेधा देशमुख भास्करन लिखित ‘क्वीन तारा : काली ऑफ द डेक्कन’ हे पुस्तक म्हणजे या असामान्य स्त्री नेतृत्वाचा गौरव करण्याचा प्रयत्न आहे. इतिहासातील तुलनेने दुर्लक्षित स्त्री व्यक्तिमत्त्वाला इतिहास अभ्यास क्षेत्राबाहेर आणण्याचे लेखिकेचे कार्य नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र कोणत्याही चरित्रात्मक किंवा ऐतिहासिक पुस्तकाचे मूल्यमापन करताना लेखकाचे उद्दिष्ट काय आहे आणि ते पूर्ण करण्यात लेखक कितपत यशस्वी झाला आहे, याचा विचार करणे गरजेचे असते. ही बाब लक्षात ठेऊन या पुस्तकाचे परीक्षण करणे महत्त्वाचे ठरेल.

मनोगतात लेखिका स्पष्ट शब्दांत सांगतात की हे पुस्तक ‘पाश्चात्त्य विद्वानांची मान्यता मिळविण्यासाठी स्वत:ला विकून मोकळ्या झालेल्या भारतीय अकादमिकांसाठी नसून नव्या पिढीसाठी आहे.’ हे विधान वाचकांचे लक्ष वेधून घेते यात शंका नाही, मात्र त्यामागील आधार पुस्तकात स्पष्टपणे मांडलेला दिसत नाही. हे विधान ताराबाईंशी संबंधित इतिहासलेखनासाठी आहे की कसे हे स्पष्ट होत नाही.

विशेष म्हणजे पुस्तकाची उभारणी ज्या साधनांवर आणि संशोधनपर साहित्यावर आधारलेली आहे, ते सर्व साहित्य अकादमिक स्वरूपाचेच आहे. त्यामुळे सुरुवातीलाच अकादमिक इतिहासलेखनाविषयी संशय निर्माण करणारी भूमिका काहीशी पूर्वग्रहदूषित वाटते. इतिहासलेखनात अभ्यासकांत मतभेद असू शकतात, मतमतांतरे असू शकतात आणि तशी ती असणे इतिहासाच्या जडणघडणीसाठी आवश्यकसुद्धा असते. मात्र इतिहासाच्या अभ्यासासाठी पुराव्यांच्या आधारे चर्चा करणे अपेक्षित आहे. लेखिकेने वरील वाक्याच्या संदर्भात अशी चर्चा केलेली आढळत नसल्याने हे विधान चिकित्सक भूमिकेपेक्षा भावनिक प्रतिक्रिया म्हणून पुढे येते.

ताराबाईंच्या बालपणाचे आणि त्यांचे वडील हंबीरराव मोहिते यांच्याशी असलेल्या नात्याचे चित्रण प्रभावीपणे केले आहे. बालपणातील अनुभव, घरातील वातावरण आणि लष्करी परंपरा यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर झालेला परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न पुस्तकात दिसतो. मात्र काही तपशिलांकडे दुर्लक्ष झाल्याचेही जाणवते. त्यांचे मूळ नाव सीताबाई होते याचा उल्लेख पुस्तकात दिसत नाही. चरित्रात्मक लेखनात अशा बारीक तपशिलांना महत्त्व असते, कारण सीताबाई ते ताराबाई हा प्रवास व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा मागोवा घेण्यास मदत करतो.

याहून महत्त्वाची बाब म्हणजे पुस्तकात लहानपणापासूनच ताराबाईंना जणू एक ‘महान’ व्यक्ती म्हणून सादर केले गेले आहे. त्या महान कशा झाल्या, कोणत्या अनुभवांनी त्यांना आकार दिला, त्यांच्या नेतृत्वगुणांची जडणघडण कशी झाली, याला तुलनेने कमी महत्त्व दिलेल्याचे दिसते. इतिहासातील नायक किंवा नायिका जन्मत: महान नसतात. सामान्य व्यक्ती ते महानत्व हा प्रवास त्यांच्या काळातील परिस्थिती, संकटे, निर्णय आणि अनुभव या टप्प्यांतूनच होतो. त्यामुळे सीताबाई ते ताराबाई हा प्रवास अधिक सखोलपणे उलगडून दाखविता आला असता.

पुस्तकाचे महत्त्वाचे योगदान आहे, ते ताराबाईंच्या व्यक्तिमत्त्व चित्रणात. लेखिकेने त्यांना धाडसी, संकटांना न घाबरणारी आणि नेतृत्वक्षम व्यक्ती म्हणून उभे केले आहे. त्याच वेळी मुघल सैन्याच्या युद्धघोषांमुळे त्यांना स्वप्ने पडतात, अशा प्रसंगांचाही समावेश केला आहे. त्यातून ताराबाईंच्या मानवी भावभावना आणि त्यांचा मानसिक संघर्ष याची झलक वाचकांना पाहायला मिळते. इतिहासातील महान व्यक्तींचे मानवी पैलू उलगडणे आवश्यक असते. या मुद्द्यावर पुस्तकाने समतोल साधलेला दिसतो. मात्र या समतोलाला मर्यादाही आहेत.

ताराबाईंच्या व्यक्तिमत्त्वातील भीती, संभ्रम, आत्मविश्वास आणि राजकीय परिपक्वता यांचा टप्प्याटप्प्याने झालेला विकास दाखविण्याऐवजी त्या जणू पराक्रमासाठीच जन्माला आल्या होत्या, असे चित्रण अनेक ठिकाणी झाले आहे. त्यामुळे त्यांच्या संघर्षाचे आणि यशाचे ऐतिहासिक महत्त्व कमी होण्याचा धोका संभवतो. संकटांवर मात करून घडलेली व्यक्ती अधिक प्रभावी वाटते. मुळातच ताराबाई आयुष्यभर संकटांवर मात करतच पुढे गेल्या, त्यामुळे त्याचा आढावा घेणे आवश्यक होते.

लेखिकेने चरित्र अधिक वाचनीय आणि रंजक करण्यासाठी अनेक प्रसंगांचा सविस्तर आढावा घेतला आहे. वाचकांना ताराबाईंच्या काळात नेण्यात लेखिकेला यश आले आहे. मात्र काही वेळा यामुळे कथन मुख्य विषयापासून दूर गेल्याचे दिसते. उदाहरणार्थ, झीनत-उन-निसाला केंद्रस्थानी ठेवून औरंगजेबाविषयी केलेली चर्चा स्वतंत्रपणे रोचक आणि वाचनीय असली तरी तिचा ताराबाईंच्या जीवनचरित्राशी असलेला संबंध स्पष्टपणे समोर येत नाही. यामुळे ताराबाईंच्या मुख्य चरित्रावरून वाचकांचे लक्ष भरकटण्याची शक्यता आहे.

अनेकदा एखादी घटना स्पष्ट करण्याऐवजी तिच्या आसपासच्या तपशिलांवर अधिक भर दिल्यामुळे चरित्राचीची गती मंदावते. इतिहासकथनातील तथ्यनिष्ठतेचा प्रश्नही काही ठिकाणी उपस्थित होतो. ताराबाईंच्या १६९१ मध्ये सुरू झालेल्या जिंजी प्रवासाचे वर्णन करताना काही प्रसंग मान्सूनपूर्व वातावरणाशी जोडलेले दिसतात. प्रत्यक्षात ताराबाईंचा हा प्रवास मार्च-एप्रिलमध्ये संपला होता. चरित्र अधिक जिवंत करण्यासाठी केलेले असे वर्णन वाचनीय असले तरी त्याच्या ऐतिहासिक अचूकतेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ शकतात. ऐतिहासिक कादंबरी किंवा लोकप्रिय इतिहास लिहिताना चरित्राभोवती वातावरणनिर्मिती महत्त्वाची असली तरी तथ्यनिष्ठतेचा तोल सांभाळणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे.

 पुस्तकाचा एक महत्त्वाचा आणि कौतुकास्पद भाग म्हणजे बंजारा व्यापारी समुदायाच्या भूमिकेवर दिलेला भर आणि त्याचे केलेले वर्णने आहे. सामान्यत: मराठा-मुघल संघर्षाच्या इतिहासात लष्करी मोहिमा, सरदार आणि युद्धे यांवर भर दिला जातो; परंतु युद्ध चालविण्यासाठी आवश्यक असलेली पुरवठा व्यवस्था, व्यापारी गट, वाहतूक साधने आणि धान्यपुरवठा यांचे महत्त्व अनेकदा दुर्लक्षित राहते.

या संदर्भात लेखिकेने वाचकांचे लक्ष वेधले आहे. अलाउद्दीन खिलजीच्या बाजार नियंत्रण धोरणापासून ते सामान्य धान्य व्यापारापर्यंत बंजारा समुदायाचे मध्ययुगातील महत्त्व लक्षात घेता लेखिकेने बंजारा व्यापारी गटाच्या मध्ययुगीन अर्थव्यवस्थेतील भूमिकेचे सुंदर चित्रण केले आहे. त्यामुळे सामान्य वाचकांना इतिहासातील बंजारांसारख्या आर्थिक आणि सामाजिक घटकांचे महत्त्व समजण्यास मदत होईल. तसेच निकोलाओ मनुची आणि नॉरिस यांसारख्या समकालीन युरोपीय लेखकांच्या नोंदींचा वापरही काळजीपूर्वक केला गेला आहे. त्यामुळे वाचकांना भारतीय साधनांबरोबरच परकीय साधनपरंपरेची ओळख होईल.

ताराबाईंनी मुघलांविरुद्ध लढताना अवलंबिलेल्या सैनिकी धोरणांचे वर्णनसुद्धा विशेष प्रभावी झाले आहे. किल्ल्यांचा सामरिक वापर, छापामार कारवाया आणि मराठा सरदारांनी मुघलांना केलेल्या प्रतिकाराची व्याप्ती यांचे चित्रण वाचकांना त्या काळातील वास्तव समजून घेण्यास मदत करते.

 पुस्तकातील या सकारात्मक बाबी अधोरेखित केल्या तरी काही पात्रांचे चित्रण करताना त्यांना मानवी स्वरूपात दाखविण्याऐवजी आदर्श स्वरूपात मांडण्याकडे अधिक कल दिसतो. उदाहरणार्थ, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजारामांच्या राज्यारोहणाच्या संदर्भात येसूबाईंचे चित्रण अत्यंत आदर्शवादी स्वरूपाचे वाटते. त्याचप्रमाणे संपूर्ण पुस्तकात ताराबाई सत्तेपेक्षा नातेसंबंधांना अधिक महत्त्व देणार्‍या व्यक्ती म्हणून दिसतात. प्रत्यक्ष इतिहास अधिक गुंतागुंतीचा आहे. शाहू सुटून आल्यानंतर ताराबाईंनी स्पष्टपणे अशी भूमिका घेतली की, नवीन राज्य राजारामांनी कमावले असून त्यावर शाहूंचा अधिकार राहत नाही. येथे नातेसंबंधांपेक्षा सत्तेला प्राधान्य दिलेले दिसते. यावरून सत्ता आणि नाती यांचे संबंध किती गुंतागुंतीचे असतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

दुर्दैवाने मराठा इतिहास भावनिक पातळीवर समजून घेण्याची प्रथा असल्याने या गुंतागुंतींकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. इतिहासातील व्यक्ती या नेहमीच पूर्णपणे योग्य किंवा अयोग्य नसतात. त्यांच्या निर्णयांवर राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक घटकांचा प्रभाव असतो. ताराबाईंच्या संदर्भात या गुंतागुंतीचे चित्रण अधिक प्रभावीपणे करता आले असते. पुस्तकाची सर्वात मोठी मर्यादा मात्र ताराबाईंच्या आयुष्याच्या उत्तरार्धाकडे झालेले दुर्लक्ष ही आहे. राजारामांच्या मृत्यूनंतरच त्यांचे स्वतंत्र राजकीय कर्तृत्व अधिक स्पष्टपणे समोर येते. लेखिकेने औरंगजेबाच्या मृत्यूने संघर्षाचा शेवट केल्यासारखे चित्र उभे केले आहे.

प्रत्यक्षात तेथूनच संघर्ष अधिक गुंतागुंतीचा होतो. शाहूंशी झालेला संघर्ष, राजसबाईंबरोबरचे सत्तासंघर्ष, पुढे पेशव्यांशी आलेले संबंध आणि संघर्ष, तसेच १७६१ पर्यंत सक्रिय राहिलेले त्यांचे राजकीय आयुष्य हे त्यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे. जयसिंगराव पवार ज्याला ‘राजवाडा क्रांती’ म्हणतात त्या घटनांनंतर ताराबाई राजकीय पटलावरून का दूर गेल्या, त्या घडामोडींचा त्यांच्या राजकारणावर काय परिणाम झाला, याची चर्चा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अधिक वास्तव चित्र उभे करू शकले असते. त्याचप्रमाणे शाहूंच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांच्या सत्तेला आव्हान देत ताराबाईंनी छत्रपती संस्थेचे महत्त्व पुनस्र्थापित करण्याचा प्रयत्न केला.

१७५१ मध्ये नानासाहेबांना ११ कलमी करार करण्यास भाग पाडणे आणि ‘साहेबांची मर्जी असेल ते प्रमाण. दुराग्रह नाहीत,’ असे नानासाहेबांना म्हणण्यास प्रवृत्त करणे, हे त्यांच्या राजकीय कौशल्याचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. या घटनांमधून ताराबाई केवळ औरंगजेबाविरुद्ध लढणार्‍या योद्धा नव्हत्या, तर मराठा राज्यातील छत्रपतीचे अधिकार आणि सार्वभौमत्व यांच्या प्रश्नांवर भीड न बाळगता हस्तक्षेप करणार्‍या राजकीय नायिका होत्या. दुर्दैवाने पुस्तकात या कालखंडाकडे लक्ष दिले गेलेले नाही.

 ‘क्वीन तारा : काली ऑफ द डेक्कन’ हे पुस्तक ताराबाईंच्या कार्याचा गौरव करणारे, वाचनीय आणि सामान्य वाचकांना आकर्षित करणारे आहे यात शंका नाही. त्यांच्या भावविश्वाचे आणि धैर्याचे चित्रण अनेक ठिकाणी प्रभावी झाले आहे. बंजारा समुदायाची भूमिका, लष्करी धोरणांचे वर्णन आणि समकालीन साधनांचा वापर ही पुस्तकाची विशेष बलस्थाने आहेत. मात्र इतिहासातील प्रभावशाली व्यक्तीचे चरित्रपर लिखाण हे केवळ प्रेरणादायी कथा राहत नाही. ते पुरावे, संदर्भ, सत्ता आणि मानवी हितसंबंधांची गुंतागुंत आणि चिकित्सक दृष्टी यांवर उभे असते.

समाज अशा पुस्तकांना अनेकदा इतिहासाचे सत्य रूप मानतो. त्यामुळे इतिहासकार आणि चरित्रलेखक यांच्यावर विशेष जबाबदारी आहे. या दृष्टीने पाहता, हे पुस्तक ताराबाईंच्या कर्तृत्वाची ओळख करून देते; परंतु त्यांच्या संपूर्ण राजकीय आयुष्याचे आणि व्यक्तिमत्त्वातील गुंतागुंतीचे चित्र उभे करण्यात ते काही प्रमाणात अपयशी ठरते. तरीही ताराबाईंसारख्या तुलनेने दुर्लक्षित ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाला नव्या पिढीसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या पुस्तकाने निश्चितच केले आहे.

क्वीन तारा : काली ऑफ द डेक्कन

लेखिका – मेधा देशमुख भास्करन

प्रकाशक – पेंग्विन रॅन्डम हाऊस

पृष्ठे – २८९, किंमत – ४९९ रु.

rahulmagar512@gmail.com