‘भावना आणि वेदना’ हा ‘चेतासंस्थेची शल्यकथा’ या सदरातील लेख (२४ ऑक्टोबर) वाचला. हेन्री बीचर या डॉक्टरने दुसऱ्या महायुद्धात अत्यंत गंभीर जखमी झालेल्या अमेरिकन सैनिकांबाबत केलेल्या महत्त्वाच्या निरीक्षणाची हकीकत या लेखात सांगितली आहे. मायदेशी पाठवले जाणार हा आनंद, त्यांना मरणप्राय वेदना विसरण्यास कारणीभूत ठरला होता, असे ते निरीक्षण. हे त्यांचे निरीक्षण वेदनानिवारणशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. पण याकडे आणखी वेगळय़ा दृष्टिकोनातून पाहता येईल.                

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये १५ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका लेखात नमूद केले होते, ‘सैनिक बॉम्ब आणि बुलेट्सच्या वर्षांवात सर्वाधिक आनंदी असतात, असा एक समज आहे. पण त्यांच्या हृदयात डोकावून पाहा, ते शांतता काळातच अधिक आनंदी दिसतील.’

यातून अतिराष्ट्रवादी नेत्यांनी आणि त्याच मानसिकतेच्या जनतेने बोध घ्यायचा तो हा की, आंतरराष्ट्रीय संघर्षांचे, मतभेदाचे प्रश्न सैनिकी बळावर सोडविण्याच्या तथाकथित वीरवृत्तीला किंवा त्याआधारे सत्तास्थान बळकट करण्याच्या मोहाला बळी पडणे योग्य नाही. संघर्ष शक्यतो चातुर्याने आणि मुत्सद्देगिरीनेच सोडविण्याचा प्रयत्न करण्यातच प्रत्येक देशाचे आणि सैन्याचे हित असते. सैन्यबळाच्या वापराची धमकी किंवा त्याचा प्रत्यक्ष वापर हा सर्वात शेवटचा पर्याय असावा.

अनिल मुसळे, ठाणे

भारतातही लोकशाहीचा केवळ सांगाडाच

‘हुकूमशाहीची हद्द!’ (२४ ऑक्टोबर) या अग्रलेखात एकतर्फी मांडणी झाली आहे, असे वाटते. साम्यवादी राजवट म्हणजे हुकूमशाही आणि लोकशाही राजवट म्हणजे मुबलक स्वातंत्र्य, असे वर्गीकरण केल्याचे दिसते. जगाला जेवढा धोका प्रदूषणाचा आहे त्यापेक्षा अधिक धोका राजकीय प्रदूषणाचा आहे.

रेगन, थॅचर यांनी तथाकथित मुक्त आर्थिक धोरणाची पायाभरणी करून आक्रमक भांडवलशाहीला राजमार्ग खुला केला. चार दशकांत भांडवली आक्रमकतेचे रूपांतर विकृतीत झाले. परिणामी देशोदेशी उपटसुंभ हुकूमशहा उदयास आले व सत्तेत स्थिरावले. आपण पराकोटीची आर्थिक विषमता अनुभवत आहोत. जगातील १० टक्के श्रीमंतांकडे सुमारे ७० टक्के संपत्तीचा संचय झाला आहे, तर तळातील ५० टक्के गरिबांकडे २३ टक्क्यांपेक्षाही कमी संपत्ती आहे.

चीनने आश्चर्यकारक आर्थिक प्रगती करताना विक्रमी उत्पादन आणि निर्यात केली. अचंबित करणारे सैन्यसामर्थ्य उभारले. लेखात सर्वात जुन्या (अमेरिका) आणि सर्वात मोठय़ा (भारत) लोकशाही राष्ट्रांतील सद्य:स्थितीचा परामर्श आवश्यक होता. जगातील विविध युद्धांच्या मागे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अमेरिका होती. अगदी सध्याच्या रशिया-युक्रेन युद्धामागेही! भारतात तर लोकशाहीचा सांगाडा उरला आहे. क्षी जिनिपग यांच्या हुकूमशाही वृत्तीवर टीका समजू शकतो, पुतिनसारख्यांचा निषेधही योग्य, पण लोकशाहीआड दडलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेच्या मारेकऱ्यांचे, बेगडी राष्ट्रप्रेमींचे आणि धर्माधांचे बुरखे फाडण्याची वेळ आली आहे.

अ‍ॅड. वसंत नलावडे, सातारा

विस्ताराबाबत हुकूमशहांची भूक अजगरासारखी

‘हुकूमशाहीची हद्द!’ हा अग्रलेख (२४ ऑक्टोबर) वाचला. जगातील सारे हुकूमशहा अतिमहत्त्वाकांक्षी, सत्तालोलुप आणि विस्तारवादी असतात. यास पुतिन आणि क्षी जिनिपग अपवाद नाहीत. विस्ताराबाबत हुकूमशहांची भूक अजगरासारखी प्रचंड असल्याने, काही काळापूर्वी पुतिन यांनी क्रायमिया आरामात पचवला अन् आता ते युक्रेनच्या मागे हात धुऊन लागले आहेत. चीनच्या जिनिपग यांनी हाँगकाँग गिळंकृत केले आणि आता त्यांची नजर तैवानवर खिळली आहे.

सारे जग लाल (साम्यवादी) करणे हे हुकूमशहांचे मुख्य स्वप्न असते. त्याला अमेरिका प्रखर विरोध करत असल्याने जगभरातील सर्व लोकशाहीवादी राष्ट्रे हुकूमशहांना शत्रू वाटतात. म्हणूनच एकदा का तैवान ताब्यात आला, की जिनिपग भारताचेही लचके तोडण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. म्हणूनच भारताला सदैव सावध राहावे लागणार आहे.

बेंजामिन केदारकर, नंदाखाल, विरार

आपणही त्याच मार्गावर नाही ना?

‘हुकूमशाहीची हद्द!’ हे संपादकीय (२४ ऑक्टोबर) वाचताना भारतही काही प्रमाणात रशिया आणि चीनच्या पावलावर पाऊल तर ठेवत नाही ना, असा प्रश्न पडला. काही वर्षांपूर्वी रशियातही अगदी सुनियोजितरित्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा महिमा गाण्यास सुरुवात झाली होती. पुतिन हेच रशियाचे तारणहार आहेत, त्यांच्याशिवाय कुणीही देशाचा उद्धार करू शकणार नाही, हे जनतेच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला होता. याचा परिणामही अपेक्षेप्रमाणेच झाला.

पुतिन यांनी सत्तेवरची ‘पकड’ घट्ट करण्यास सुरुवात केली. रशियन राज्य घटनेत मनाप्रमाणे बदल केले. त्यांच्या वाटेत अडथळा ठरू शकतील, अशा व्यक्तींची हकालपट्टी करून ‘स्वत:ची माणसे’ बसवली. चीनचे क्षी जिनिपग यांनीही तेच करून ‘जिनिपग म्हणजेच चीन’ अशी मानसिकता घडविण्यात यश मिळविले आहे. रशियात पुतिन यांनी धर्माची मदत घेतली होती, चीनमध्ये जिनिपग ‘राष्ट्रप्रेमा’चे दाखले देत आहेत. 

भारतातही धार्मिकतेचे आणि राष्ट्रप्रेमाचे स्तोम माजवून स्वार्थसिद्धीचे प्रयत्न सुरू आहेत. धर्म आणि राष्ट्राचा अभिमान असणे ठीक, पण जर या धर्मनिष्ठेचा आणि राष्ट्रप्रेमाचा गैरफायदा कोणी स्वार्थसिद्धीसाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी करत असेल, तर मात्र ते आक्षेपार्ह आहे.  पण आपल्या देशाचे दुर्दैव हेच की यावर बोट ठेवणाऱ्यांना ‘राष्ट्रद्रोही’ ठरविण्याचे कार्य सुनियोजितरित्या सुरू आहे.

विनोद द. मुळे, इंदूर

खासगी उद्योगांना प्रोत्साहन गरजेचे

‘दहा लाख सरकारी पदभरतीसाठी मेळावे सुरू!’ ही बातमी (लोकसत्ता- २३ ऑक्टोबर) वाचली. या प्रक्रियेमुळे भारताची बेकारी कमी होण्यास मदत होईल. ‘सरकारी विभागांची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढली आहे,’ या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यात तथ्य असेल, तर त्याचा परिणाम ‘मेक इन इंडिया’वर होऊ शकतो. सरकारी लालफितीचा विळखा अनेक देशी विदेशी उद्योग-धंदे व नवउद्योग मुकाटय़ाने सहन करत आहेत. त्यात काही सकारात्मक बदल झाल्याचे जाणवत नाही. विदेशी कारखानदार भारतीय ‘बाबूं’ची मानसिकता जाणतात म्हणून त्यांचे पाय कोरोनानंतरही भारताकडे वळले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्या लालफितीतून बाहेर पडण्याकरिता दोनच मार्ग- एक वजन ठेवण्याचा  नाहीतर अनिश्चित विलंबाची सवय करून घेण्याचा! बेरोजगारांची संख्या कमी करण्यासाठी खासगी उद्योगधंद्यांचीही मुहूर्तमेढ मोठय़ा प्रमाणावर रोवणे गरजेचे आहे. ‘स्किल इंडिया’ची खरी कसोटी तर या खासगी उद्योगधंद्यात लागेल.

प्रवीण आंबेसकर, ठाणे

कोणी कितीही अट्टहासकेला तरी..

‘अट्टहास हाच शब्द अचूक असून अट्टाहास चुकूनही लिहू, बोलू नका’ अशी यास्मिन शेख यांनी केलेली ‘विनंती’ (भाषासूत्र: २४ऑक्टोबर)  वाचली. ती सध्याच्या भाषाविषयक अनास्थेच्या काळात अरण्यरूदन ठरेल असे वाटले. कारण अट्टहास काय किंवा अट्टाहास काय, जो तो आपल्या वकुबानुसार बोलतो आणि लिहितो. त्यामुळे कोणी कितीही अट्टहास केला तरी ‘पालथ्या घडय़ावर पाणी’च पडणार! भाषेच्या प्रत्यक्ष वापरकर्त्यांची भाषाविषयक आस्थाच ओसरत चालल्यामुळे त्यांना भाषेविषयी ‘नाही आसू, नाही माया’ अशी विदारक परिस्थिती आहे. मोल्सवर्थ यांच्या शब्दकोशात ‘अट्टाहास’ असेच लिपीलेखन असून त्याचा एक अर्थ ‘लेबोरियस एफर्ट्स’ असा नोंदवला आहे. अनेकजण ‘आकाश’ला अकाश, अंगण ‘आंगण’, आडोसा ‘अडोसा’ म्हणतात आणि तसेच लिहितातही. मला विवेचनाचा प्रतिवाद करायचा नसून केवळ प्रचलीत वस्तुस्थिती विशद करायची आहे.

प्रा. विजय काचरे, कोथरुड (पुणे)

भटक्या श्वानांचा बंदोबस्त अत्यावश्यक

‘श्वान नियंत्रणाचा मार्ग कोणता’ हा ‘अन्वयार्थ’ वाचून नागपूर मनपाचा निर्णय पुणेकर श्वानप्रेमींसाठीही अमलात आणता येईल का, हा विचार मनात आला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात भटके श्वान खूपच वाढले आहेत. रस्त्याने जाताना धावत येऊन हातातील पिशवी हुंगणे, एकमेकांवर भुंकत असताना अचानक पादचाऱ्यांवर धावून जाणे, असे प्रकार घडतात. उपनगरांच्या अंतर्गत रस्त्यांवरून दुचाकीने जाताना श्वानांच्या भीतीने जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.

निर्बीजीकरण करून पुन्हा रस्त्यांवर सोडून देणे हा उपद्रव कमी करण्यासाठीचा कायमचा उपाय वाटत नाही. त्यापेक्षा नागरी वस्ती कमी असलेल्या ठिकाणी, शहरातील श्वानांचे पुनर्वसन करण्याचा विचार करावा. श्वान दत्तक योजनाही राबवावी. स्थानिक प्रशासनाने श्वानप्रेमींना आवरणे आणि भटक्या श्वानांचा कायमचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. 

श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी (पुणे)