नीति आयोगाची सातवी बैठक म्हणजे पंतप्रधान मोदींचे रटाळ प्रवचन असणार याची खात्री तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला तेव्हाच (लोकसत्ता- ७ ऑगस्ट) स्पष्ट झाले होते. त्यापाठोपाठ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही बैठकीला दांडी मारली. महाविद्यालयात ‘बेरके’ विद्यार्थी व्याख्यात्यांची नेमकी मापे काढून त्यांच्या तासाला अनुपस्थित राहतात, त्यातलाच हा प्रकार. मोदीसरांना हल्ली कोणीच गांभीर्याने घेत नाही. विरोधक तर विरोधक, पण जिथे त्यांचा पक्ष सत्तेत आहे तिथले मुख्यमंत्रीही त्यांना फारसे महत्त्व देत नाहीत. आपले मित्र आपण का सांभाळू शकत नाही, आपले नेमके कुठे चुकते, याचा विचार मोदींनी करायला हवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते आधी महाराष्ट्रात शिवसेनेच्या मैत्रीला मुकले आणि आता बिहारमध्ये जनता दलाने (संयुक्त) सुद्धा भाजपशी असलेली मैत्री तोडली आहे. नीति आयोगाच्या बैठकीला नेहमीचे उपद्व्यापी विद्यार्थी मात्र आवर्जून उपस्थित होते. त्यांना फक्त हजेरी भरायची असते आणि मोदीसरांना अडचणीचे ठरणारे प्रश्न विचारून कोंडीत पकडायचे असते. एरवी सर असे सहजासहजी आमनेसामने सापडत नाहीत. त्यामुळे पश्चिम बंगाल, केरळ, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी ही संधी अचूक साधली. त्यांनी मोदींना ‘तुम्ही तुमचे निर्णय आमच्यावर लादू नका’ असे ठणकावले. मात्र हे सारे पडले मोदीसरांच्या ब्लॅक लिस्टमधले, साहजिकच सर त्यांची दखलही घेत नाहीत. या वेळी एक नवीन विद्यार्थी मोदीसरांच्या या वर्गात पहिल्यांदाच आला आणि थेट पहिल्या रांगेत जाऊन बसला. त्यामुळे छायाचित्राच्या वेळी सरांनी त्याला एकदम शेवटच्या रांगेत उभे केले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers mail loksatta readers opinion loksatta readers letter zws
First published on: 10-08-2022 at 05:30 IST