‘शिवसेना पक्षनावासह चिन्हही गोठवले’ ही बातमी (लोकसत्ता- ९ ऑक्टोबर) वाचून वाटले की, अखेर महाशक्तीने आपला डाव साधलाच. बाळासाहेबांचेच नाव घेत, बाळासाहेबांनी रक्ताचे पाणी करून उभा केलेला पक्ष संपवला. मराठीजनांची दुहीची परंपरा कायम ठेवल्याबद्दल शिंदे यांचे अभिनंदन! निवडणूक आयोगाने आपली तत्परता दाखवली. देशातील सर्व ‘स्वायत्त’ संस्था महाशक्तीने आपल्या दावणीला बांधल्या आहेत. आता हे दोन गट आपापसात भांडत राहणार आणि सत्तेचा खवा महाशक्तीचा बोका मटकावणार. मराठी माणूस नेहमीप्रमाणे आपापसात लढून संपणार. हे नियोजन अडीच वर्षे चालू होते हे स्वत: चंद्रकांत पाटील सांगतात आणि शिंदेचा प्रवक्ता ते नाकारतो, मग आता खरे कोण बोलत आहे?

पण त्याहीपेक्षा प्रश्न असा की, हे सर्व करून शिंदे गटाला काय मिळाले? ना पूर्ण सत्ता मिळाली, ना जनतेचे प्रेम. ‘गद्दार’ शिक्का तेवढा डोक्यावर बसला. ना मला ना तुला घाल कुत्र्याला अशी गत होऊन बसली आहे. भाजप शिंदे गटाबरोबर कायम जमवून घेईल का, हा साधा विचार एकनाथ शिंदे यांना करता आला नसेल? जो पक्ष तीस वर्षांची युती तोडू शकतो तो पक्ष आपल्याबरोबर किती काळ राहील इतका साधा तर्कही या लोकांनी शिवसेनेतून फुटताना केला नसेल? पण गेल्या काही दिवसांत खरी शिवसेना कोणाची हा वाद निर्माण केला गेला, महाशक्तीने पूर्ण शक्तिनिशी दोघांना झुंजवत ठेवले आणि आपला सूड घेतला. आता दसरा मेळाव्यानंतर वितुष्ट फारच वाढले आहे. आता कोणीच परत फिरू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे, जे जे महाशक्तीला हवे होते तसेच घडत आहे. उगीच नव्हते मुख्यमंत्रीपद शिंदे यांना. शिंदेच्या दसरा मेळाव्याचा खर्च कोणी केला? इथे ५५ लाख आणि एक कोटी रुपयांच्या खर्चासाठी मोठमोठी मंडळी तुरुंगात आहेत, तिथे या मेळाव्यासाठी, पन्नास आमदारांना सुरत, गुवाहाटी, गोवा फिरवण्यासाठी खर्च कोणी केला? यामागे कोण हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. सगळे व्यवस्थित ‘प्लॅनिंग’प्रमाणे घडले आहे.

रवींद्र बापट, बोरिवली (मुंबई)

पोटनिवडणुकीने उडालेली घबराट 

सत्तासंघर्षांत निवडणूक आयोगाने शिवसेना धनुष्यबाण हे नाव आणि चिन्ह गोठवले असले तरी, शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या कार्यकाळामध्ये पाच चिन्हे बदलली आहेत. तरीही हिंदूहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा आवाज कायम राहिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा नुकताच शिवतीर्थावरून मेळावा शिवसैनिकांनी स्वत: शिवतीर्थावर जाऊन अनुभवला आणि जगानेही पाहिला आहे. शिंदे गटाने महाशक्तीच्या साहाय्याने कितीही खो घातला, तरी दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुमच्यात िहमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा, असे जाहीर आव्हान दिले आहे. नुसत्या एका अंधेरी पूर्व इथल्या पोटनिवडणुकीने उडालेली घबराट शनिवारच्या घडामोडींमधून स्पष्ट झाली असून एका बाजूला महाराष्ट्राचा आत्मसन्मान, निष्ठा, अस्मिता, तर दुसरीकडे  महाशक्तीच्या जोरावर आपण काही करू शकतो हा माज यांचा सामना सुरू झाला आहे.

विजय कद, लोअर परळ (मुंबई)

प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या भाजपच्या रणनीतीत..

‘शिवसेना पक्षनावासह चिन्हही गोठवले’ हे वृत्त व त्यासंदर्भातील इतर बातम्या  (लोकसत्ता : ९ ऑक्टोबर) वाचल्या. एकंदरीत हे सर्व प्रकरण पाहता ईडी, सीबीआयनंतर निवडणूक आयोगही त्यांच्याच मार्गावर चालला आहे हे स्पष्ट होते. ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव व ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह निवडणूक आयोगाला गोठवायचे होते तर गेले तीन महिने कालहरण का केले? अलीकडच्या काळातील सीबीआय, ईडी व निवडणूक आयोग यांचे पक्षपाती निर्णय व कारवाया पाहता सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा या स्वायत्त संस्थांवरील विश्वास कायम राहणे कठीण आहे. शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह गोठवून केंद्रीय निवडणूक आयोगाने एक प्रकारे अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एक प्रकारे भाजपला मदत केली आहे, असे मला वाटते. जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही असा लौकिक असलेला भारत हळूहळू एकाधिकारशाहीकडे तर वाटचाल करत नाही ना? भारतातील प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या भाजपच्या रणनीतीमध्ये निवडणूक आयोग सामील तर झाला नाही ना? ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जर निवडणूक आयोगाने गोठवले आहे, तर या पक्षाच्या नावावर व चिन्हावर निवडून आलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेतील आमदारांचा व लोकसभेतील खासदारांचा प्रक्ष कोणता? ‘शिवसेना वाचवण्यासाठी’ सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेल्यांना त्यांच्या डोळय़ादेखत शिवसेना कधी संपली हे कळलेदेखील नाही!

टिळक उमाजी खाडे, नागोठणे (ता. रोहा, जि. रायगड)

हीच का मराठी पक्षाची सेक्युलर महाआघाडी?

‘सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करणार का? – देवेंद्र फडवणीस यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल’ ही बातमी (लोकसत्ता : ९ ऑक्टो.) वाचली. सावरकर यांचे कणखर विचार महाराष्ट्रातील कोणत्याच पक्षाच्या कक्षेत बसण्यायोग्य नव्हते. त्यांनी महाराष्ट्राला दिलेल्या शब्दरूपी देणगीचा विचार करता पक्षाभिनिवेश न बाळगता महाराष्ट्रीय म्हणून मराठी भाषकांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करणे आवश्यक आहे. दिल्ली हायकमांडच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रीय व मराठी नेते याबद्दल कोणतीही भूमिका घेणे केवळ अशक्यच! परंतु संपूर्णपणे महाराष्ट्रातील मातीत रुजून वाढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या मराठी पक्षाने एक मराठी म्हणून मूग गिळून गप्प बसणे योग्य आहे का? सावरकरांनी अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये देशासाठी सश्रम काळय़ा पाण्याची शिक्षा भोगली होती याचा विसर पडणे.. यालाच सेक्युलर महाआघाडी म्हणावे काय? 

प्रवीण आंबेसकर, ठाणे

महाराष्ट्राची वाट लगा दी मा.मु.’!

महाराष्ट्राचे मा.मु. (माजी मुख्यमंत्री) आणि आ.उ.मु. (आजी उपमुख्यमंत्री) देवेन्द्र फडणवीस यांनी भाजप चाणक्य अमित शहा यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील मराठी माणसांची संघटना तूर्तास तरी संपवण्याचे ऐतिहासिक कार्य पार पाडले, याबद्दल त्यांचे करावे तेवढे अभिनंदन थोडेच आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचे आणि त्यांना साथ देणारे आ.मु. (आजी मुख्यमंत्री) आणि बंडखोर चाळिसांचे नेते एकनाथ शिंदे यांचे नाव सुवर्ण अक्षरांत नोंदवले जाईल, यात शंका नाही. शिवसेनेची या पोटनिवडणुकीपुरती का होईना, पण नावनिशाणीही आता उरलेली नाही. यासाठी किती डोकी आणि खोकी कामी आली त्याचा हिशोब आ.मु. आणि मा.मु. यांनाच ठाऊक! एक व्यवस्थित चालणारे सरकार पाडण्याचा (एकनाथजींचे शब्द वापरायचे तर) ‘कार्यक्रम करण्यासाठी’ अंधारात किती भेटीगाठी झाल्या, चार्टर प्लेन, गुवाहाटीचे ऐषोआरामी आणि निसर्गरम्य बंड पुढे हे अगत्य कमी पडले म्हणून गोव्याच्या हॉटेलात चाळीस जणांचे अगत्य करण्यात आले. भ्रष्टाचाराला वाचा फोडायला सदैव उत्सुक असणाऱ्या किरीटजींनी या चाळीस जणांना ‘किरीट कुंडले’ बहाल करून खास सरंक्षण दिले..  अशा रीतीने हे एकनाथ देवेंद्राचे ‘ईडी सरकार’ गादीवर आले. आल्या आल्या गुजरातकडे जाणाऱ्या ‘बुलेट ट्रेन’साठी कामांची गाडी सुसाट सुटली आणि गुजरातच्या निवडणुकीत भाजपला यश मिळावे म्हणून वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातेत हलवण्यात आला. महाराष्ट्र एक्स्प्रेसला डबल इंजिन असूनही तिची अवस्था ‘वंदे भारत’ ट्रेनसारखी झाली. जागेवरून हलेचना! यापूर्वी आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र अहमदाबाद- गुजरातला नेण्यात आलेच होते, त्यातच ही नवी भर! खरे तर महाराष्ट्र आणि गुजरात परत एकत्र करण्याचा (एकनाथजींचे शब्द वापरायचे तर) ‘कार्यक्रम’च बाकी उरलेला आहे. एकदा का संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला काळिमा फासला की यांचे गंगेत घोडे न्हाले!

एवढे करून देवेन्द्रांची (म्हणजे पर्यायाने भाजपची) ‘नैतिकता’ म्हणजे काय विचारता! त्यांनी उद्धव ठाकरे यांना आता ‘तुम्ही सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करणार का,’ असा प्रश्न विचारून धोबीपछाड घातलेली आहे. सावरकर हे विज्ञाननिष्ठ होते. ते गाईला फक्त ‘उपयुक्त पशू’ मानत होते. देवेन्द्रांनी महाराष्ट्रात गोवधबंदीचा कायदा आणला. हे सावरकरांना थोडेच पटले असते? आता विज्ञाननिष्ठ सावरकरांचा असा अपमान केला म्हणून देवेन्द्रजींनी पहिल्यांदा स्वत:चाच निषेध केला पाहिजे. भाजप िहसक विचार मांडणाऱ्यांनासुद्धा ‘संत’ आणि ‘साध्वी’ मानतो. महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे. आपण ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव यांना संत मानतो. देवेन्द्रांनी आपल्या पहिल्या शपथविधीला असेच कुठले कुठले बुवा, महाराज गोळा केले होते. तेव्हा ऊठसूट कुणालाही ‘संत’ म्हटल्याबद्दल देवेन्द्रांनी महाराष्ट्रातल्या तमाम संतांची जाहीर माफी मागितली पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र देवेन्द्रांनी फरपटत फरपटत नेऊन थेट गोळवलकर गुरुजींच्या दावणीला बांधलेला आहे. एकंदरीत, ‘महाराष्ट्राची वाट लगा दी, मा.मु.!’

मुकुंद टाकसाळे, पुणे

मोक्कानव्हे; ‘मकोका’, ‘एमकोकावा महाकोकाठीक!

‘लोन अ‍ॅप प्रकरणात पुणे पोलिसांची मोक्का कारवाई’ अशा मथळय़ाच्या बातमीतील (लोकसत्ता : ८ ऑक्टो) ‘मोक्का’ हा शब्द बरोबर नाही. मूळ कायद्याचे इंग्रजी नाव  Maharashtra Control of Organised Crimes Act असे आहे. त्याचे इंग्रजी लघुरूप  MCOCA असे होते, पण मराठीकरण करताना ‘मोक्का’ ( MOCCA) असे चुकीचे केले जाते. मराठीकरण करायचेच असल्यास ‘मकोका’, ‘एमकोका’ किंवा ‘महाकोका’ असे करावे. अशाच प्रकारच्या गुजरातच्या कायद्याला त्यांच्याकडे ‘गुजकोका’ म्हणण्याचा प्रघात आहे.

– अरविंद वैद्य, सोलापूर(समाप्त)