बारावीच्या गुणांना महत्त्व देऊन नीट आणि बारावीचे संयुक्त मूल्यांकन करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, ५० टक्के बारावी आणि ५० टक्के ‘नीट’ असा फॉम्र्युला विचारात घेतल्यास विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाला न्याय मिळेल. केवळ एका दिवसाच्या परीक्षेवर विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून राहणार नाही आणि कोचिंग क्लासवरील अवलंबित्वही काही प्रमाणात कमी होईल. आज अनेक विद्यार्थी शाळेपेक्षा क्लासमध्ये अधिक शिकत आहेत, त्यामुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची गुणवत्ता दुय्यम ठरत आहे. शिक्षणाचा केंद्रबिंदू ज्ञान नसून रँक होणे, ही धोक्याची घंटा आहे. पेपरफुटीसारख्या प्रकरणांत कठोर व जलद शिक्षा, विशेष न्यायालये, डिजिटल सुरक्षा, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि दोषींवर सार्वजनिक जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.

पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधनही महत्त्वाचे आहे. देशाला संशोधक, शिक्षक, शास्त्रज्ञ, उद्योजक, कृषितज्ज्ञ, तंत्रज्ञ आणि कलाकार अशा सर्व क्षेत्रांतील गुणवंतांची गरज आहे. किमान पात्रतेच्या निकषांबाबतही पुनर्विचार होणे आवश्यक आहे. जर बारावीतील मूलभूत गुणवत्तेला योग्य महत्त्व दिले, तर ‘नीट’मध्ये केवळ कोचिंग आधारित वेगवान तयारी करणार्यांपेक्षा सातत्याने अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळेल. बारावीच्या गुणांच्या आधारे पात्रता ठरवल्यास अधिकाधिक विद्यार्थी पात्र होऊ शकतील आणि त्यातून अधिक न्याय्य मेरिट प्रणाली तयार होईल. शिक्षण हे सेवा क्षेत्र राहिले पाहिजे; त्याची पूर्णपणे बाजारपेठ झाली तर सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची स्वप्ने महागडी होऊन बसतील. शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आता टाळून चालणार नाहीत. –  प्राचार्य विठ्ठल गायकवाड, ढोले पाटील कॉलेज (पुणे)

अशाने केवळ श्रीमंतांची मुले शिकतील

‘शिकवणी’चा धंदा आवरा…’ हा अग्रलेख (१९ मे) वाचला. कोचिंग क्लासच्या वर्गात विद्यार्थी अगदी दाटीवाटीने कोंबल्यासारखे बसलेले असतात. अधिकाधिक गुणांचे आमिष दाखवून प्रचंड प्रमाणात फी उकळली जाते. अनेक पालकांची बचत यातच संपून जाते. मग आर्थिक क्षमता नसल्यामुळे मुलांना घरापासून दूर शिक्षणासाठी पाठवावे लागते. एवढी प्रचंड फी घेऊनही काही कोचिंग क्लासेसची भूक भागत नसावी, त्यामुळे आता पेपर फोडून पैसे कमावण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारल्याचेच या प्रकरणातून दिसते. हे असेच चालत राहिले तर श्रीमंतांची मुले पैसा भरून शिकत राहणार आणि गरीब मुले प्रामाणिकपणे अभ्यास करूनही परत परत परीक्षा देत मागे राहणार. -दिलीप सुतार, महालक्ष्मी (मुंबई)

बायोमेट्रिक हजेरी अपरिहार्य करा

‘शिकवणी’चा धंदा आवरा…’ हा अग्रलेख राज्य सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. यापूर्वी शिकवणीवाल्यांचे उद्योग महाराष्ट्राने पाहिले आहेत. दहावी-बारावीतील गुणवंतांचा आपल्या क्लासच्या जाहिरातीत फोटो छापून दिशाभूल व फसवणुकीचे उद्योग झाले होते. मात्र त्यावर काहीही कारवाई झालेली नव्हती. आता ‘टाय-अप’, ‘इंटिग्रेटेड’चा नवा धंदा झाला आहे. या पद्धतीत वर्षभरात एकही वर्ग न होता वा वर्गात उपस्थित न राहता महाविद्यालयात मुलांची बेकायदा हजेरी लावली जाते. त्यामुळे ११ वी व १२ वीचे महाविद्यालय भरताना व सुटताना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी. शिक्षण विभागाने टाय-अप, इंटिग्रेटेडवर कारवाई करावी. अन्यथा, पेपरफुटीची कीड फोफावत राहील. -राजलक्ष्मी प्रसाद, मुलुंड (मुंबई)

शिकवण्या नव्हे, हे तर कारखाने!

‘शिकवणी’चा धंदा आवरा…’ हा अग्रलेख वाचला. मुद्दे सगळ्यांनाच परिचित, पण सगळ्यांकडून दुर्लक्षित आहेत. पेशाचा धंदा झाला आहे. त्यामुळे फक्त मार्कांचाच, संधीचा विचार केला जातो. यात शिकण्याची प्रक्रिया मागेच राहते आणि यासाठी काम करणार्यांची साखळीच तयार होते. या साखळीत विद्यार्थी, पालक आणि नाव, जाहिरात, कमाईसाठी वाट्टेल ते करणार्या शिकवण्यांचे सर्वेसर्वा अशा कड्या असतात. शिकवण्यांचे चालक-मालक कारखाने उघडून बसले आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांनी अंतर्मुख होऊन स्वत:लाच प्रश्न विचारण्याची गरज आहे. -डॉ. श्रीकांत कामतकर, सोलापूर

प्रामाणिक विद्यार्थी भरडला जातो

‘शिकवणी’चा धंदा आवरा…’  (१९ मे) हा अग्रलेख वाचला. वैद्यकीय क्षेत्राकडील विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. पालकांना आपल्या पाल्याने जास्तीत जास्त गुण मिळवून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवावा असे वाटते. शिकवणी वर्गाच्या संचालकांना आपला विद्यार्थी पहिला यावा व पुढील वर्षी भरपूर प्रवेश व्हावेत असे वाटत असते. यासाठी पालक आणि शिकवणी संचालक काहीही करण्यास तयार असतात. याचीची प्रचीती नीट पेपरफुटी प्रकरणात आली. यामध्ये सामान्य विद्याथ्र्याचा विचारच केला जात नाही. दोन वर्षे रात्र जागून, आपल्या इच्छा मारून, कोणतेही कार्यक्रम, समारंभ यामध्ये सहभागी न होता, कसेतरी पोटाला आधार म्हणून डबा खाऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न बघत ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांचा विचार कोणी करणार आहे की नाही? काहीच दोष नसताना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार्या विद्यार्थांच्या मनावर काय परिणाम होत असतील, याचा विचार आपण करणार की नाही? सरकारने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि यापुढे दक्षता बाळगावी. -नितेश बावनकर, पवनी (जि. भंडारा)

तीन वर्षांतील कामगिरीचे मूल्यमापन हवे

‘शिकवणी’चा धंदा आवरा…’  (१९ मे) हा अग्रलेख वाचला. केंद्रीय प्रवेश परीक्षा प्रक्रियेतील घोटाळे टाळण्यासाठी एक पद्धत अवलंबता येईल; एकाच परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्याऐवजी तीन वर्षांतील विविध परीक्षांचा संदर्भ घ्यावा. दहावी बोर्ड परीक्षेचे एकूण गुण, त्यातील संबंधित विषयांचे गुण, बारावी बोर्ड परीक्षेचे एकूण गुण, त्यातील काही संबंधित विषयांचे गुण व नीट परीक्षेचे गुण यांचे मूल्यमापन करून प्रवेश यादी तयार केली गेली तर खर्या सातत्याने गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून त्यांना त्यांचा हक्क मिळेल. एकाच परीक्षेत काहीतरी घोटाळा करून प्रवेश मिळवू इच्छिणार्यांना चाप लागेल. –  श्रीराम पाटील, उरून ईश्वरपूर (सांगली)

भविष्य घडवण्यासाठी अन्यही क्षेत्रे आहेत

‘हमखास यशाची खात्री’ यासारख्या जाहिरातींमुळे आपल्या पाल्याची क्षमता न ओळखताच अनेक पालक आपल्या मुलांना ‘जेईई’ आणि ‘नीट’ या प्रवेश परीक्षांच्या शर्यतीत उतरवतात. वर्षाची दीड- दोन लाख रुपये शिकवणीची फी भरली जाते, का तर ही दोनच क्षेत्रे प्रचंड पैसा मिळवून देतात या गैरसमजामुळे. विद्याथ्र्याची आवड, कल न पाहता शिकवणी वर्गाच्या या आभासी जाहिरातींना बळी पडणे पालक आणि मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अतिशय नुकसानकारक ठरते. देशाचे भवितव्यही यातून धोक्यात येत आहे. हे टाळण्यासाठी शिकवणी वर्गांच्या धंद्याला आवर घालणे गरजेचे आहे. -सई खैरे, नाशिक

विद्यार्थ्यांना ग्राहक समजू नका

‘नीट’, ‘जेईई’, ‘यूपीएससी’ अशा परीक्षांच्या नावाखाली निर्माण झालेली स्पर्धा आता केवळ शैक्षणिक राहिलेली नाही, तर तिचे आर्थिक आणि मानसिक परिणामही समाज भोगत आहे. मोठमोठ्या कोचिंग संस्थांच्या जाहिराती पाहिल्या की हे अधिक स्पष्ट होते. टॉपर आमचाच, ऑल इंडिया रँक, १०० टक्के निकाल अशा घोषणांमधून विद्यार्थ्यांपेक्षा ब्रँडचाच प्रचार अधिक दिसतो. काही संस्थांनी तर शिक्षणाभोवती अक्षरश: कॉर्पोरेट संस्कृती उभी केली आहे. यातून पालकांवर मानसिक दबाव येतो आणि विद्यार्थी सतत स्वत:ला सिद्ध करण्याच्या ओझ्याखाली जगू लागतो. याला आपल्या शाळा आणि महाविद्यालयेही कारणीभूत आहेत. वर्गात विद्यार्थ्यांकडे फारसे लक्ष दिले जात नाही, पाठांतरावरच भर दिला जातो. गुण आणि रँक यांच्या स्पर्धेत जिज्ञासा, वाचनाची आवड आणि स्वतंत्र विचार मागे पडत आहेत. नैराश्य, ताणतणावांनी विद्यार्थ्यांना ग्रासले आहे. विद्यार्थ्यांना फक्त परीक्षांसाठी नव्हे, तर आयुष्यासाठी तयार करणारी व्यवस्था उभी राहिली पाहिजे. विद्यार्थी हा ग्राहक होत चालला आहे आणि हीच खरी चिंतेची बाब आहे. -बालाजी डोके, गागलेगाव, बिलोली (नांदेड)