‘सेफकीप’ ही कादंबरी कशाबद्दल आहे याचं आपल्याला काही एक निश्चित उत्तर मिळू शकतं; पण ते ती वाचून पूर्ण झाल्यानंतर मागे वळून पाहाताना. जेव्हा आपण कादंबरी वाचत असतो, तेव्हा आपल्याला याचा स्पष्ट अंदाज येत नाही, किंबहुना तो येऊ नये, हा लेखिकेच्या योजनेचाच एक भाग आहे. डच लेखिका याएल वॅन डर वाउडन लिखित या कादंबरीमध्ये आपल्याला अनेक साहित्यप्रकारांचं मिश्रण दिसतं, तिचा फोकस वेगवेगळ्या घटकांवर आलटून पालटून जाताना दिसतो, तोही अगदी सहजपणे. कधीकधी आपण समोर पाहात असताना नजरेच्या कोपऱ्यात काहीतरी वेगळीच हालचाल जाणवते, तशा काही जागा ‘सेफकीप’मध्ये आहेत. वाचत असताना या जागा आपल्याला तेवढ्यापुरत्या किंचित अस्वस्थ करतात. जे उघड जाणवतंय त्यापलीकडे इथे काहीतरी चाललंय जे आपल्या लक्षात येत नाहीये, अशी चुटपुट लागते. मनात तेवढ्यापुरत्या शंका तयार होतात, पण त्या टिकत नाहीत. लवकरच आपण त्या विसरून पुन्हा एकदा कथानकाच्या मुख्य प्रवाहात सामील होतो.

चांगल्या कथा, कादंबऱ्या, चित्रपट हे कधीच निर्वातात घडत नाहीत. ही कथानकं कुठे, कधी घडतायत याला नेहमीच महत्त्व असतं, आणि अनेकदा ती तशी घडण्यामागेही तो विशिष्ट स्थळकाळ हेच कारणही असू शकतं. ‘सेफकीप’ घडते ती नेदरलँड्समधल्या एका छोट्या गावात, १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला. दुसरं महायुद्ध संपून गेल्याला आता काही काळ उलटलाय; पण युद्धाच्या खाणाखुणा अजून शिल्लक आहेत. समाजवास्तवाचा तो एक न पुसला जाणारा भाग बनला आहे. त्यानंतर व्यवहार पूर्ववत होत गेले आहेत, पण सारी घडी अजून नीटशी बसलेली नाही. काळानं केलेल्या जखमा पूर्णपणे भरून आलेल्या नाहीत. अर्थात समाजाच्या सर्वच घटकांवर या नजीकच्या इतिहासाचा सारखा प्रभाव पडलाय असं नाही. काहींवर तो इतरांपेक्षा खूप अधिक पडलेला आहे.

loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
loksatta readers response
लोकमानस : तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी वास्तव पाहावे
loksatta editorial on india china relations
अग्रलेख : मुहूर्ताची मँडरिन मिठाई!

हेही वाचा :भूगोलाचा इतिहास: वसुंधरेच्या कायापालटाची कहाणी

‘सेफकीप’मध्ये तीन पात्रं प्रमुख आहेत. इझबेल, एव्हा आणि इझबेल राहाते ते प्रशस्त घर. हे घर खूपच महत्त्वाचं आहे- ते केवळ वातावरणनिर्मिती, किंवा प्रसंगांना नाट्यपूर्ण पार्श्वभूमी म्हणून असलेला वापर अशा वरवरच्या अर्थानं नाही. हे घर या कथेचा केंद्रबिंदू असल्यासारखं आहे. या घरावर इझबेलच्या आईची छाया पडलेली आहे. आता आई नसली तरी तिची शिस्त, तिची मतं, तिची खोली, क्रॉकरीसारख्या बारीकसारीक वस्तूही इझबेलला तिची आठवण करून देतात. आईच्या शेवटच्या आजारात तिच्याबरोबर राहिलेल्या इझबेलचा हे घर हाच आसरा आहे. पण असं असूनही घरावर तिचा हक्क नाही. ती त्याची काळजी घेते, पण तिचा मोठा भाऊ लुई जेव्हा लग्न करेल, तेव्हा घर त्याच्याकडे जाणार आहे. त्यानंतर आपलं काय होणार, ही असुरक्षितताही इझबेलच्या विश्वाला व्यापून राहिलेली आहे. या सगळ्या अस्वस्थतेतून तिचा स्वभाव कोता झालाय. ती कोणाला आपल्या जवळ येऊ देत नाही. घर आणि त्यातल्या वस्तू यांवर शक्य तितका ताबा ठेवण्याचा प्रयत्न करते. यात बदल होतो, तो एव्हाच्या येण्याने.

एव्हा ही लुईच्या असंख्य मैत्रिणींमधली सध्याची मैत्रीण, आणि प्रथमदर्शनीच इझबेल आणि तिचा धाकटा गे भाऊ हेन्ड्रिक या दोघांनाही ती विशेष आवडत नाही. अर्थात लुई आणि तिचं प्रकरण फार टिकेलसं कोणालाच वाटत नसतं, आणि ती राहात असते दूर शहरात, लुईच्या फ्लॅटवर, त्यामुळे ती कशीही असली, तरी फार बिघडणार नसतं. तरीही एकदा लुईला कामानिमित्त परदेशी जावं लागतं आणि एव्हा इझबेलच्या घराच्या आश्रयाला येते. एवढच नाही, तर लुईचा दाखला देऊन ती आईच्या खोलीचा ताबा घेते. आधीच काळजीत पडलेल्या इझबेलला काय करावं ते सुचेनासं होतं. आणि मग घरातल्या वस्तू एकेक करून हरवायला लागतात…

इझबेल आणि एव्हा यांच्यातलं नातं, हा ‘सेफकीप’च्या पूर्ण कथानकाला सांधणारा धागा आहे. आणि हे नातं बदलत राहातं. जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की कादंबरी कोणत्या दिशेला जाणार हे आपल्या लक्षात आलंय, त्या क्षणाला काहीतरी बदलतं आणि कथा वेगळी दिशा घेते. हे बदलही बहुतेक प्रसंगी या दोघींमधल्या नात्याशी संबंधित आहेत. हे नातं जसजसं बदलतं, तसतसे दोघींच्या व्यक्तिमत्त्वांमधले तपशीलही अधिक स्पष्ट होत जातात. या दोन्ही व्यक्तिरेखांना कादंबरीच्या सुरुवातीपासून शेवटाकडे जाणारा एक आलेख आहे, आणि या प्रवासात या दोघींमध्येही आमूलाग्र बदल होतो. महत्त्वाचं हे की, हा बदल मुद्दाम केल्यासारखा वाटत नाही. जे घडत जातं त्याला स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याप्रमाणे तो येतो.

हेही वाचा : अन्वयार्थ : हा अट्टहास कशासाठी?

पहिल्या काही पानांमध्ये आपल्याला असं वाटू शकतं की ही रहस्य कादंबरी असावी. पण त्याचं कारण कादंबरीत घडणाऱ्या कशापेक्षाही अधिक आपल्या वाचनानुभवात आहे. मोठ्या प्रशस्त घरात एकटी राहणारी मालकीण, तिथे अपरिचित पाहुणीचं होणारं आगमन, आणि घरातल्या वस्तू एकेक करून हरवायला सुरुवात होणं हे ओळखीचे ट्रिगर्स आहेत. त्यांचा कथानकात समावेश आपल्याला काही सुचवून जातो, आणि प्रत्यक्षात घडामोडी पारंपरिक पद्धतीच्या रहस्यनिर्मितीसाठी फार पोषक नसल्या तरीही आपल्याला कसला तरी संशय येऊ लागतो. हा संशय लेखिकेलाही काही प्रमाणात अपेक्षित असावा, पण तिची शैली त्याला खतपाणी घालत नाही. आणि तरीही या कादंबरीत रहस्य जरूर आहे. ते ओळखीचं, वा ट्रिगर्सनी आपली ज्या प्रकारची अपेक्षा तयार होते, तसं मात्र नाही. नजरबंदी कशी करायला हवी याचं ही कादंबरी फार चांगलं उदाहरण मानता येईल. रहस्य कथानकांबाबत वापरला जाणारा ‘हायडिंग इन प्लेन साइट’ असा एक शब्दप्रयोग आहे. याचा अर्थ असा की, त्यातल्या रहस्याच्या उलगड्यासाठी आवश्यक ती सारी सामग्री लेखक सहजपणे आपल्यासमोर मांडतो, पण ती अशा कौशल्याने, की ती पुढे काय पद्धतीने वापरली जाणार याचा वाचकाला पत्ताही लागू नये. याएलनेही हा सारा पट वाचकापुढे मांडताना तशी खबरदारी घेतलेली आहे.

‘सेफकीप’ची मांडणी ही सेटअप, कॉन्फ्लिक्ट आणि रेझोल्युशन या ओळखीच्या तीन अंकांत विभागणं सहज शक्य आहे, आणि त्यातला सर्वात कमी पडणारा अंक कोणता असेल, तर तो मधला. पहिला भाग आपल्याला मांडणीत अडकवतो, जे घडणार त्याची पूर्ण पार्श्वभूमी तयार करतो, पात्रपरिचय पूर्ण करतो, तर तिसरा अंक आधी जे घडलं त्याच्याकडे पाहण्याचा सारा दृष्टिकोनच एका सफाईदार झटक्यानिशी बदलून टाकतो. मधल्या अंकात मात्र फार काही घडत नाही. प्रसंगांच्या दृष्टीनेही नाही, आणि नाट्यपूर्णतेच्या दृष्टीनेही नाही. या भागात इझबेल आणि एव्हा यांच्यावरच आपण बराच काळ खिळून राहतो. एव्हा ही व्यक्तिरेखा म्हणून लक्षणीय आहे, आणि तिच्याकडे वाचकाचं लक्ष वेधून घेण्याची क्षमता आहे. इझबेल मात्र तितकी इन्टरेस्टिंग नाही. त्यामुळे या दोघींमध्ये तयार होणारे ताणतणाव वाचकाला अमुक एका मर्यादेपलीकडे गुंतवू शकत नाहीत. तो त्यांच्यातलं नातं समजू शकतो, पण काही काळाने हा भाग गरजेपेक्षा अधिक संथ वाटू शकतो. मी सुचवेन की इथे थोडी कळ काढणं आणि नेटानं पुढे जाणं आवश्यक आहे. या अंकात घडणाऱ्या गोष्टी गतिमान नसल्या, तरीही जे पुढे घडेल त्याच्या पूर्ण भावनिक परिणामासाठी त्यांचं असणं आवश्यक आहेत.

हेही वाचा :लोकमानस : मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रकल्पांचा लाभ मिळत नाही

कादंबरीचं शीर्षक आपण वेगवेगळ्या तऱ्हांनी वाचू शकतो. त्याचा अर्थ आपण कथानकाच्या आणि आशयाच्या कोणत्या टप्प्यावर पोहोचलो आहोत याच्याशी जोडलेला आहे. कथानकात पुढे जाताना कादंबरीचा आवाका आपल्यासाठी जसा विस्तारतो, तसाच या शीर्षकाचा अर्थही आपल्यापुढे एक वेगळं, विदारक रूप धारण करतो. प्रत्यक्ष आणि प्रतीकात्मक अशा त्याच्या अंगभूत छटा आपल्या लक्षात येतात.

मला ‘सेफकीप’चा विशेष हा वाटतो की, ही संपूर्ण कादंबरी हिमनगाचं टोक असल्यासारखी आहे. ती अतिशय मोजक्या घटकांमधून, कमीत कमी व्यक्तिरेखांमधून तयार होते. ती घडत असताना आपल्याला ती दोन व्यक्तींमधून उभ्या राहणाऱ्या संघर्षाची कथा वाटू शकते आणि तशी ती आहेदेखील. मात्र तिचा प्रत्यक्ष आवाका ज्या सामाजिक आणि राजकीय चित्राकडे निर्देश करतो, ते प्रचंड आहे. ते काय आहे आणि त्याचा विस्तार केवढा हे आपल्या लक्षात येतं तेव्हा या कादंबरीची भेदकता आपल्यापर्यंत पोचते. मग ती केवळ एका घराची, किंवा त्यात अडकलेल्या दोन माणसांची कथा उरत नाही, तर तिला एक वैश्विक संदर्भ तयार होतो. एका प्रचंड मोठ्या चित्राचा केवळ एक कोपरा दाखवून लेखिका आपल्या डोळ्यांसमोर हे संपूर्ण चित्र काय आहे हे सूचित करते. एकदा आपण या चित्रापर्यंत पोहोचलो, की आधीचा सारा प्रवास आवश्यकच होता, हे वेगळं सांगण्याची गरजच उरत नाही.

ganesh.matkari@gmail.com

‘द सेफकीप’

लेखिका : याएल वॅन डर वाउडन

प्रकाशक : पेन्ग्विन बुक्स लि.

पृष्ठे : २७२ ; किंमत : ७९९ रु.

Story img Loader