अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही गोष्ट आहे २४ मार्च १९५६ ची. विशाखापट्टणममध्ये त्यांना काही लोक भेटायला आले. खेडय़ांमध्ये वीज असावी का यावर त्यांचे मत त्या मंडळींना जाणून घ्यायचे होते. त्यांना वाटले गांधीवाद, साधी राहणी अशा पार्श्वभूमीमुळे विनोबा ही कल्पना नाकारतील.

तथापि क्षणाचाही विलंब न लावता विनोबा म्हणाले, ‘वीजच काय, पण गावांना अणुऊर्जेचा लाभ मिळावा असे मला वाटते. मात्र विजेचा लाभ नेमका कुणाला मिळणार याकडे मी अधिक लक्ष देईन. खेडय़ात वीज तिथल्या सर्वाधिक गरीब माणसांपर्यंत पोचणार असेल तर मी तिचे स्वागतच करेन.’

ते पुढे म्हणाले, ‘अणुऊर्जा आली तर सरकार ती आधी उद्योगांसाठी वापरणार. म्हणजेच तिचा लाभ शहरांना होणार. त्यानंतर ती खेडय़ात आली तर धनवान गावकरी तिचा लाभ घेणार. पैसे नसल्याने गरीब लोकांना गरज असूनही वीज मिळणार नाही.’

सौर ऊर्जेप्रमाणेच अणुऊर्जा प्रत्येक गावात पोहोचावी, असे विनोबांचे मत होते. ही ऊर्जा गरज असणाऱ्या गरिबांना प्रथम मिळावी यावर त्यांचा कटाक्ष होता. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे निर्माण झालेली ऊर्जा, ज्यांच्या डोक्यावर साधे छप्परही नाही त्यांच्या विकासासाठी वापरली जावी, असे त्यांना वाटे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा लाभ घेतलाच जाऊ नये असा त्यांचा दुराग्रह नव्हता.

अध्ययनाचे देखील एक सूत्र त्यांनी तयार केले होते. धार्मिक ज्ञानासाठी ऋग्वेदासारखा जुना ग्रंथ वाचावा आणि नवा ग्रंथ वाचायचा तर तो विज्ञानविषयक असावा, असे ते म्हणत. उद्योग आणि प्रगती यासाठी ते नेहमीच अनुकूल होते. तथापि त्याचा लाभ गरिबांना सर्वप्रथम आणि थेट मिळावा असा त्यांचा आग्रह होता. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया होती की दिल्लीत सूर्य उगवला यावर गावकऱ्यांनी उगाच विश्वास का ठेवावा? त्यांनाही सूर्य दिसू देत.

आपले चिंतन विनोबा पारंपरिक भाषेत मांडत. शेतीमधून भरपूर उत्पादन घेतले पाहिजे हे सांगताना ‘अन्नं बहु कुर्वीत । तद्व्रतम्।’ या उपनिषदाच्या आदेशाचा ते उल्लेख करत.

विकासाचा आणि प्रगतीचा पहिला हक्कदार कोण तर समाजातील उपेक्षित, गरीब माणूस. गांधीजींचा शेवटचा माणूस. या अनुषंगाने ते महाभारतातील यक्षप्रश्नाचा दाखला देत. युधिष्ठिर यक्षाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. प्रसन्न होऊन यक्ष त्याला एका भावाचे जीवन वर म्हणून देतो. क्षणाचाही विलंब न लावता धर्मराज सहदेवाचे आयुष्य मागतो.

खरे तर कुंतिपुत्राप्रमाणे माद्रीचाही पुत्र जिवंत असावा ही धर्माची भूमिका होती. तथापि विनोबांनी यात अंत्योदयाचे तत्त्व पाहिले. मी जिवंत आहे आता अन्य पराक्रमी भावंडांपेक्षा सहदेव ‘शेवट’चा म्हणून तो जिवंत हवा.

प्रगती व्हावी आणि तिचा लाभ गरिबांना प्रथम व्हावा हे विनोबांचे साधे तत्त्व होते. ज्ञानोबांनी विश्व ब्रह्म करण्यासाठी गुप्त ज्ञान लोकभाषेत आणले. विनोबांनीही आपला गीतार्थ मांडताना जनसामान्यच नजरेसमोर ठेवले. आयुष्याच्या उत्तरार्धात भूदान यज्ञाच्या रूपाने पुन्हा गीतार्थ सांगितला तेव्हाही हाच वर्ग त्यांच्या डोळय़ांसमोर होता.

चराचर सृष्टी साम्यरूपात पाहायची तर भौतिक आणि आत्मिक विकासाला पर्याय नाही, ही गोष्ट विनोबा चांगलीच ओळखून होते.

jayjagat24 @gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta samyog acharya vinoba bhave contribution to indian society zws
First published on: 22-07-2022 at 04:41 IST