विनोबांचे समग्र जीवन शांती आणि क्रांती अशा दोन टप्प्यांमध्ये पाहता येते. गांधीजींच्या सहवासात त्यांनी साम्ययोगाचे अंतर्मुख होऊन दर्शन घेतले. ते होते शांतिपर्व. त्यांच्यानंतर समाजाभिमुख होत साम्ययोगाची साधना केली. भूदान यज्ञ हे त्या साधनेचे प्रकट रूप होते. ते क्रांतिपर्व होते. क्रांतीची ही उभय रूपे मिळून विचारक्रांती म्हणजेच अिहसक क्रांती जन्माला येते. विनोबांच्या शब्दांत सांगायचे तर ही संक्रांतीची पद्धत झाली. संक्रांती म्हणजे संपूर्ण क्रांती अथवा सम्यक् क्रांती.

भूदान यज्ञाच्या निमित्ताने या विचारक्रांतीचे अनोखे दर्शन जगाला झाले. या सम्यक् क्रांतीने पुढे वेगळे वळण घेतले आणि आपल्याला तिचा विसर पडला. आपली कार्य करण्याची पद्धत पुढच्या पिढीसाठी अडचण होऊ नये यासाठी त्यांनी क्षेत्रसंन्यासही घेतला. अर्थात त्यांचा क्षेत्रसंन्यास हे काही एकमेव कारण नव्हते. तथापि विनोबा निवृत्तीच्या वाटेवर चालत होते. त्यांचे कार्य पुढे जाण्याऐवजी वेगळय़ा वाटेने गेले.आज त्या क्रांतिपर्वाच्या आठवणी तेवढय़ा आहेत. भूदान यज्ञ नावाच्या यज्ञाच्या अनुषंगाने पुढे आलेल्या कथा एखाद्या महाकाव्यातील उपाख्यानांप्रमाणे आहेत. उपाख्याने मूळ काव्यापेक्षा सरस असतात. भूदान यज्ञातील मनोज्ञ कथा तसा प्रत्यय देतात.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?

एका गावात सुतारकाम करणाऱ्या माणसाने मोठय़ा कष्टाने मिळवलेली सर्व म्हणजे १२ एकर जमीन भूदान यज्ञात दिली. विनोबांनी त्या गृहस्थांना विचारले, या पुढे उपजीविका कशावर चालेल? यावर तो दाता म्हणाला, ‘माझा धंदा चांगला चालला आहे. मी जमीन कसू शकत नाही. ते काम मी इतरांकडून करवून घेतो आणि मग मला पिकाचा हिस्सा मिळतो. तुमचे बोलणे ऐकले आणि समजले की हे माझे वागणे बरोबर नाही. म्हणून सर्व जमीन दान म्हणून दिली.’ उत्तर प्रदेशातील मंगरोठ या गावातील सर्व जमिनीचे दान झाले. ते पहिले ग्रामदान होते.

अगदी छोटय़ा शेतकऱ्यापासून बडय़ा जमीनदारापर्यंत सर्वानी या यज्ञात आहुती दिली. समाजातील प्रेमभावना वाढीस लागावी आणि घेणाऱ्या हातांना देण्याचीही सवय लागावी हा विनोबांचा प्रयत्न होता. त्याला मिळालेले यश स्तिमित करणारे होते. विनोबा एखाद्या गावात आले की ते गेल्यावर गावकरी म्हणत, ‘आमच्या गावात गांधीबाबा आला. आम्हाला जमीन देऊन गेला. खूप दिवसांनी आला म्हणून त्याची दाढी वाढली होती.’ एका अभ्यासकाची ही आठवण आहे.

विनोबांची अशा प्रसंगांवरची प्रतिक्रिया पाहिली तर साम्ययोगाचे समग्र रहस्य हाती येते. ते म्हणत, मी तर गरिबांकडूनही दान घेतो. एक एकरवाल्याला गुंठाभर जमीन देण्याची इच्छा झाली आणि मी ते दान स्वीकारले. असे दान करण्याची इच्छा होणे यालाच मी विचारांची अिहसक क्रांती म्हणतो. जिथे विचारक्रांती होते तिथे जीवन प्रगतीकडे जाते. सद्विचार जागृत होतात.

देण्याने दैवी संपत्ती निर्माण होते. त्याच्या समोर आसुरी संपत्ती टिकत नाही. आसुरी संपत्ती ममत्वभावावर आधारित आहे आणि दैवी संपत्ती समत्वावर आधारित आहे. मी दान घेतो तिथून मी हृदयमंथनाची, हृदयपरिवर्तनाची, चित्तशुद्धीची, मातृवात्सल्याची, मैत्रीची आणि गरिबांप्रति प्रेमाची आशा धरतो. जिथे दुसऱ्यांच्या चिंतेची भावना जागृत होते तिथे समत्व बुद्धी प्रकट होते.

अतुल सुलाखे
jayjagat24 @gmail.com