अतुल सुलाखे

विनोबांवरील टीकेमध्ये प्रामुख्याने तीन मुद्दे आढळतात. फसलेले भूदान, आणीबाणीमधील त्यांची वादग्रस्त भूमिका आणि गांधी विचारांना निष्प्रभ करण्याची त्यांची धोरणे. इथे आणीबाणीच्या मुद्दय़ाला जाणीवपूर्वक बाजूला ठेवायचे आहे. त्यामुळे विनोबांवरील टीकेची धार कमी होत नाही.

विनोबांच्या गीता चिंतनाचा व्यापक प्रयोग म्हणजे भूदान. विनोबांचा गीतार्थ मान्य असणाऱ्यांनाही हा व्यापक प्रयोग फारसा पटला नव्हता. विनोबांचे अनुयायी आणि त्यांचे टीकाकार यांच्यामध्ये याबाबतीतील आश्चर्यकारक सहमती दिसते. मुळात जमिनीसारखा प्रश्न भावनिक आवाहन करून सुटणार नाही, अशी टीकाकारांची भूमिका होती. एवढेच नव्हे तर भूदानातून जी जमीन मिळाली ती अपुरी होती आणि या आंदोलनाचे अपयश अधोरेखित करणारी होती.

भारतातील पाच कोटी भूमिहीनांना एक ते अर्धा एकर जमीन मालकीहक्काने मिळवून देणे, हे भूदानाचे ध्येय होते. ग्रामस्थ तयार असतील तर व्यक्तिगत मालकीचे विसर्जन करून सर्व साधनसंपत्ती गावाच्या मालकीची करणे हे दुसरे उद्दिष्ट होते. मूल्यपरिवर्तन करून नवा ‘साम्ययोगी समाज’ निर्माण करणे हे तिसरे ध्येय होते.

विनोबांना पहिल्याच टप्प्यावर साफ अपयश आले. उद्दिष्ट पाच कोटी एकर जमिनीचे होते. कागदोपत्री ४० लाख एकर जमीन मिळाली. प्रत्यक्षात १२ लाख एकर जमिनीचे वाटप झाले. विनोबांना प्रिय असणाऱ्या गणिताच्या भाषेत सांगायचे तर मिळालेली जमीन आणि वितरित झालेली जमीन यांचे प्रमाण अनुक्रमे ८ आणि ०.२ टक्के होते. ग्रामदानेचेही अपयश असेच आहे. भूदानाला आणि ग्रामदानाला बिहारमध्ये सर्वाधिक यश मिळाले. तथापि त्याच बिहारमधील शोषक जमीनदारी व्यवस्था आजही कायम आहे. या अपयशाचे कारण म्हणजे बिहारने केलेले भूदान प्राय: असत्यावर आधारित होते.

विनोबांनी जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी गांधीजींचा सत्याग्रहाचा मार्ग नाकारला. भारतीय स्वातंत्र्याचा लढा गांधीजींच्या कार्यपद्धतीमुळे प्रभावी आणि अनोखा ठरला. विनोबांनी ही पद्धत जवळपास नाकारली आणि विवेकबुद्धीला आवाहन करणारा मार्ग स्वीकारला. हयात असते तर गांधीजींनी भारत सरकारविरुद्धही सत्याग्रहाचे तंत्र वापरले असते. अहिंसात्मक सत्याग्रह नाकारून विनोबांनी सर्वोदयाचा आत्माच बाजूला ठेवला. गांधीजींचा प्रथम सत्याग्रही संपूर्ण बदलला.

आयुष्याच्या अखेरची १३ वर्षे क्षेत्र संन्यास घेऊन ते एक प्रकारे निष्क्रिय भूमिकेमध्ये गेले. काही करायचेच नव्हते तर विनोबांनी आणीबाणीमध्ये राजकीय भ्रष्टाचाराची पाठराखण का केली हा नेमका प्रश्न त्यांच्या टीकाकारांनी समोर आणला. नरहर कुरुंदकर यांच्या शब्दात सांगायचे तर ‘भूदान आंदोलनात लोकांचा विनोबांविषयीचा आदर दुथडी भरून वाहात होता. तथापि आणीबाणीच्या काळात, स्वातंत्र्यासाठी या माणसाने सामान्य पामराइतके तरी धैर्य दाखवले होते का, अशी शंका लोकांनी घेतली.’ टीकाकार टीका करणार, लोकमत वाहवत जाणार, परंतु वास्तव काय होते ते सांगण्याची जबाबदारी सर्वोदयी परिवाराची होती. त्यांनी एकतर ती नाकारली आणि पार पाडली तेव्हा फार उशीर झाला होता. एक पिढी विनोबांविषयीच्या गैरसमजात वाया गेली.

jayjagat24 @gmail.com