‘पूजनीय’ सचिव महोदय, आपल्याकडून आलेली कारणे दाखवा नोटीस मिळाली. वाचून सखेद आश्चर्य वाटले. सरकारने मला भारत संचार निगमच्या संचालक पदावर नियुक्त केले असले तरी मूलत: मी एक धार्मिक प्रवृत्तीचा माणूस आहे. इतर कुठल्याही कर्तव्यापेक्षा धर्मजागरण श्रेष्ठ अशी माझी धारणा आहे. त्यामुळे धार्मिक विधीच्या कार्यात अधिनस्थ कर्मचार्यांना सामील करून मी आचारसंहितेचा भंग केला हे म्हणणेच मुळात गैरलागू ठरते. धर्म मोठा की सरकार या प्रश्नाचे उत्तर मी कायम धर्म असेच देत आलो आहे. होय, मी प्रयागराजला पवित्र स्नानासाठी जाण्यापूर्वी २० कामांसाठी ५० कर्मचार्यांची ड्युटी लावली. टॉवेल, साबण, कंगवा, तेलाची बाटली, सुकामेवा, फळे, दाढीचे सामान, पेस्ट, शॅम्पू हे साहित्य आणायला लावले. याचे एकमेव कारण म्हणजे मी निगमला एक कंपनी नाही तर मठच समजतो व त्यात कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचार्याला अनुयायी.
मी स्वत: साधूच्या वेशात तिथे स्नानासाठी उतरणार होतो. एकदा का असा वेश परिधान केला की मी पूर्णपणे धर्ममय होऊन जातो. माझ्या सभोवताल असणार्या अनुयायांनी (कर्मचारी नाही) माझी सेवा करण्यात काहीही गैर नाही असे मला वाटते. अनुयायांना प्रश्न पडत नसतात. त्यामुळे तेव्हा माझ्यासोबत असणार्यांनाही ते पडणार नाही असा माझा विश्वास होता व त्याला अनुसरूनच मी हे आदेश काढले. धर्माचे पारायण करताना निगमच्या व्यवसायाकडे लक्ष देणे हेसुद्धा माझ्या मनात होते. सर्वांना सामील करून घेत आखलेल्या या दौर्यामुळे प्रयागराजकडे डोळे लावून बसलेल्या देशभरातील कोट्यवधी भाविकांच्या मनात बीएसएनएलविषयी आस्था निर्माण झाली असती व त्याचा थेट फायदा निगमच्या सीमकार्डच्या विक्रीवर झाला असता. यातून होणार्या कोट्यवधीच्या अतिरिक्त महसुलाला आपण मुकलो आहोत हे कृपया ध्यानात घ्यावे.
सध्या निगमची धार्मिक प्रकृती तोळामासा म्हणावा अशीच. अशावेळी देशभरात वेगाने पसरत चाललेल्या धार्मिक वातावरणाचा फायदा घेत निगमचे उत्पन्न वाढवण्यात काहीही गैर नाही असे माझे ठाम मत आहे. माझ्या या उपक्रमात सामील झालेल्या कर्मचार्यांमध्ये आपसूकच धार्मिक भावना वाढीला लागली असती व त्याचाच आधार घेत ते या पवित्र संगमावर येणार्या लाखो भक्तांपर्यंत पोहचून निगमच्या संचारसेवेचा प्रचार आणि प्रसार करू शकले असते. त्यांचे बघून देशभरातील इतर ठिकाणच्या कर्मचार्यांनासुद्धा प्रेरणा मिळाली असती. धर्म आणि व्यवसाय यांची सांगड घालणे चूक हे मला मान्य, पण सध्याच्या आधुनिक काळात ते पूर्णपणे गैर नाही असे मला वाटते. सरकारच्या अनेक योजना याचे उत्तम उदाहरण म्हणून बघता येतील. एकीकडे याच पद्धतीने आपला देश धर्ममय होत चाललेला असताना खात्याने केवळ मला लक्ष्य करण्यासाठी हा वाद उकरून काढणे गैर वाटते.
आता शेवटचा मुद्दा. मला नोटीस देताना ज्या प्रशासकीय आचारसंहितेचा आधार घेण्यात आला ती काँग्रेस व विशेषत: नेहरूंच्या काळात लागू झाली. ही संहिता धार्मिक मूल्ये जोपासणार्या कर्मचार्यांवर अन्याय करणारी असून त्यात तातडीने बदल करावा अशी माझी मागणी आहे. कर्तव्यावर असतानासुद्धा धार्मिक स्वातंत्र्य जपण्याची मुभा असावी असा बदल या संहितेत करून घेणे इष्ट. ज्या मंत्रिमहोदयांनी चौकशीचे आदेश दिले तेही काँग्रेसच्या विचारसरणीचे होते हेही या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे. त्यामुळे हे प्रकरण तात्काळ बंद करावे ही अपेक्षा. दूरसंचारच्या सचिवांना हे उत्तर पाठवून झाल्यावर विवेक बन्सल निर्धास्त होत पुन्हा धर्मपारायणात मग्न झाले.

