‘‘महोदय, मंत्रीमहोदयांच्या दुष्काळ पाहणी दौर्‍याच्या काळात आयोजित बैठकीत सुकामेवा ठेवला म्हणून बजावण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस नुकतीच मिळाली. त्यावर जिल्हा मुख्यालयाचा ‘नाझर’ या नात्याने मी खालीलप्रमाणे स्पष्टीकरण देत आहे. मुळात अशा शासकीय बैठकांमध्ये सुकामेवा, चहा-बिस्कीट ठेवण्यात यावे असे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रकच आहे. (पाहा- साप्रवि-१९/९४) राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असतानासुद्धा हा खाद्यप्रकार का ठेवला असा ठपका या नोटिशीत ठेवण्यात आला. तो तार्किकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचा आहे, असे मी नम्रपणे नमूद करतो.

दुष्काळी स्थितीची जाणीव इतरांप्रमाणे मलाही आहे. त्यामुळे बैठकीत कोणता खाद्यप्रकार ठेवावा यावर मी खूप विचार केला व मगच सुकामेव्याची निवड केली. यात असलेले बदाम, अक्रोड, खजूर व पिस्ता हे वाळवंटी प्रदेशात पिकवले जातात. तिथे पाण्याची तीव्र टंचाई व कायम दुष्काळसदृश वातावरण असते. यात समाविष्ट असलेला काजू हा देशाच्या किनारपट्टी भागात होतो. तेथे भरपूर पाऊस पडत असला तरी हा प्रदेश गरीब शेतकर्‍यांचाच म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सुकामेवा दुष्काळाच्या जास्त जवळ जाणारा असे माझे मत झाले.

दुष्काळामुळे ऊर्जा गमावलेल्या शेतकर्‍यांना ती परत मिळवून द्यायची असेल तर त्यांचे सांत्वन करणारे मंत्री ऊर्जावान असायला हवेत. हा मेवा खाऊनच शरीरात चांगली ऊर्जा निर्माण होते. अशक्त माणसाला सशक्त करता येते. या मुद्द्यावरून टीकेची झोड उठवणार्‍या माध्यमांना हे ठाऊक नाही असे माझे मत आहे.

सुकामेव्याऐवजी नाश्ता म्हणून मिसळ, पोहे, इडली, बटाटा वडा हे खाद्यपदार्थ ठेवले असते तर त्याचे कंत्राट एखाद्या महिला बचत गटाला द्यावे लागले असते किंवा हॉटेलातून मागवावे लागले असते. यावर मेव्यापेक्षा जास्त खर्च झाला असता. शिवाय याच माध्यमांनी दौर्‍यावर जाण्यापूर्वी बघा कसे ताव मारत आहेत अशी टीका केलीच असती. त्या तुलनेत एका बशीत सामावणारा व बैठक घेता घेता तोंडात चार दोन दाणे टाकून पोटाला आधार देणारा मेवा मला तरी योग्य वाटला. दुष्काळ आहे म्हणून भाकरी ठेचा ठेवण्याचा विचार मनात आला पण त्याच्याही तयारीवर जास्त खर्च आला असता. कारण सरकारी देयके फुगवून सादर करण्याची पद्धत पुरवठादारांमध्ये प्रचलित आहे.

दुष्काळी स्थितीत मान्यवरांच्या आहारामध्ये बडेजाव नको म्हणून सुकामेव्याची निवड योग्य होती यावर मी ठाम आहे. शिवाय दुष्काळी परिस्थितीची पाहणी करायची असली की बांधावर खूप फिरावे लागते म्हणून मंत्र्यांच्या ताफ्यातील मान्यवर पाहणीपूर्व बैठकांमध्ये भरपेट खातात असा माझा अनुभव आहे. त्यामुळे सुकामेवा ठेवून मी शासकीय खर्चाची बचत केली. माध्यमातील काही नतद्रष्टांनी या मेव्याची तुलना सतराव्या शतकातील फ्रान्सच्या राणीने केलेल्या ‘पाव मिळत नसतील तर केक खा’ या वक्तव्याशी केली. याचेही मला खूप वाईट वाटले. तेव्हा आता ही नोटीस मागे घ्यावी ही विनंती.’’ हे स्पष्टीकरण जिल्हाधिकार्‍यांना मिळाले, वाचून तेही विचारात पडले.