‘प्रिय एकनाथराव, तुम्ही परवा पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ‘शस्त्रक्रिया करायला वाघाचे काळीज लागते’ असे जे वक्तव्य केले त्यामुळे आमच्या व्याघ्रकुळात प्रचंड नाराजी पसरली आहे. तुमच्या राजकीय महत्त्वाकांक्षेशी आम्हाला काहीच देणे-घेणे नाही. इतरांचे पक्ष फोडण्याच्या कृतीवरही आमचा आक्षेप नाही. तुम्हाला जे राजकारण करायचे असेल ते खुशाल करा पण आम्हाला त्यात कशाला ओढता? तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. आम्ही कोणतीही शिकार (तुमच्या भाषेत शस्त्रक्रिया) चोरून-लपून करत नाही.
भूक लागली की पर्यटक बघत आहेत का? चित्रीकरण करताहेत का याचा विचार न करता आम्ही वार्याच्या वेगाने सावजाला गाठतो. फुटीर खासदारांना या हॉटेलमधून फिरव, कधी जयपूर नाही तर दिल्लीला ने, सुरत-गुवाहाटीच्या वार्या गुप्तपणे कर. असल्या प्रकारात आम्हाला अजिबात रस नाही. आम्ही जंगलाचे राजे आहोत व राजासारखेच जगतो. भूक नसेल तेव्हा आम्ही सावजाकडे ढुंकूनही बघत नाही. अगदी आमच्या बाजूला जरी ते उभे असले तरी.
निवडणुकीत तुमच्या पक्षाकडून जे खासदार निवडून आले, त्याने तुमची भूक भागली नाही म्हणून तुम्ही ही फोडाफोडी केली असेल, तर त्यासाठी आमचा संदर्भ देणे हा अन्याय आहे. तुमच्याकडे भौतिक साधनांची रेलचेल आहे, पैसा आहे, सत्ता असल्यामुळे गाठीशी विविध यंत्रणा आहेत. त्या बळावर तुम्ही काहीही करू शकता. आमच्याकडे मजबूत शारीरिक क्षमता, दात व डरकाळी या तीनच गोष्टी आहेत व त्या पूर्णपणे नैसर्गिक आहेत. भौतिक सुखाच्या मागे आम्ही कधी धावलो नाही व धावणार नाही. त्यामुळे आमच्या मनात लालसेला थारा नाही. आम्ही सावजाला कधीही लालूच दाखवून शिकारीच्या जाळ्यात ओढले नाही.
राजकीय अपरिहार्यता म्हणून तुम्हाला ते करावे लागत असेल तर तो तुमचा प्रश्न, त्यात आमच्या नावाचा वापर करण्याचा कुठलाही अधिकार तुम्हाला नाही. आमच्या प्रतिष्ठेचा इतिहास खूप मोठा व जाज्वल्य आहे. याची जाण तुमच्यासारख्या नेत्याने तरी ठेवावी अशी आमच्या कुळाची अपेक्षा आहे. मानवजातीला शौर्याचे प्रदर्शन करण्यासाठी वेगवेगळी प्रतीके शोधावी लागतात हे खरे असले तरी आमचाच उद्धार (उद्धव नाही) का हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे.
आमच्यातला प्रत्येकजण राजा आहे. त्याच्या त्याच्या अधिवासात. कोणतीही केंद्रीय सत्ता नाही, त्यामुळे त्या सत्तेला खूश करण्याचा प्रश्नच कधी उद्भवला नाही. तुमच्यासाठी केंद्राला खूश करणे गरजेचे असेल तर आम्हाला काहीही घेणे-देणे नाही. अधिवास बळकावण्यावरून आमच्यात झुंजी जरूर होतात पण आम्ही कधीही त्यासाठी मानवजातीची उदाहरणे देऊन वेळ वाया घालवत नाही. तुम्ही कधी आमचे काळीज बघितले आहे का? त्यात या भूतलावरील सर्वांसाठी अपार प्रेम व भूतदया भरलेली आहे.
फसवणूक, दगाबाजीला त्यात स्थान नाही. त्यामुळे सत्तेच्या बळावर केलेल्या असल्या ‘फुसक्या’ पराक्रमाला आमच्या काळजाशी जोडू नये व आमच्या स्वभाववैशिष्ट्यांची मोडतोड करून मानवजातीत उगाच गैरसमज निर्माण करू नये. सत्तेच्या बळावर धाडस दाखवले म्हणून कुण्या माणसाचा वाघ होत नाही हे सत्य कायम लक्षात असू द्यावे.’ शिकार केलेल्या सावजाच्या रक्ताने लिहिलेले हे पत्र वाचून शिंदे अस्वस्थ झाले. ही बातमी उद्धव ठाकरेंना कळल्यावर त्यांनी मातोश्रीमध्ये टांगलेल्या वाघाच्या तसबिरीसमोर जात मनमुराद हसून घेतले.
