‘अरे, आणखी काय काय करायला लावणार आम्हाला? शिक्षक काय पक्षाचे कार्यकर्ते वाटतात का यांना? असतील ते साऱ्यांसाठी विश्वगुरू, पण इकडे आमच्या खिशाला कात्री लागते त्याचे काय? आम्हीही वर्षभर शिकवतो ते विद्यार्थी उत्तीर्ण व्हावे म्हणूनच ना! मग हे पुस्तक वाचूनच ते उत्तीर्ण होतील असे यांना वाटतेच कसे? शिकवण्याची आवड होती म्हणून ही नोकरी धरली तेव्हा सर्वात आधी करावे लागले ते हागणदारीमुक्त गावाचे काम मग सरकारी रकाने भरण्याची सवयच पाडून घ्यावी लागली. या शाळेत ना चपराशी ना साहाय्यक. शेवटी माध्यान्ह भोजनातली खिचडी कशी शिजवायची तेही पत्नीकडून शिकून घ्यावे लागले. आता हा पुस्तक व चित्रकलेच्या खर्चाचा भार पालक समितीने उचलावा म्हणून त्यांच्याकडे गेलो तर तिथेही या मुद्दय़ावरून गुरुसमर्थक व विरोधकांमध्ये जुंपलेली. शेवटी काही समर्थकांना दादापुता करत थोडेफार पैसे जमवले तर तो चर्चेच्या थेट प्रक्षेपणासाठी नेमलेला कंत्राटदार जास्तीचे पैसे मागतो. सांगा आता करायचे ते काय?’ कक्षात जमलेल्या शिक्षकांपुढे एका दमात बोलून मुख्याध्यापक थांबले. घोटभर पाणी पिऊन ते म्हणाले. ‘सांगा आता विद्यार्थी काय म्हणतात ते? तयार आहेत ना सारे?’ मग एक शिक्षक हळूच बोलू लागला. ‘काही विद्यार्थी म्हणतात ही सर्जिकल स्ट्राइक काय भानगड आहे ते आधी सांगा. सर, चार वर्षांपूर्वी हा शब्द ऐकल्याचे आठवते.
कुणाला विचारायचे म्हटले तर अज्ञान दिसेल तेव्हा तुम्हीच काय ते स्पष्ट करून सांगा’ हे ऐकताच मुख्याध्यापकांना गांगरल्यासारखे झाले. त्यातून ते सावरण्याआधीच दुसरा म्हणाला- ‘हा विषय समजावून सांगण्यापेक्षा ढगातून जाणारे विमान काढा असे विद्यार्थ्यांना सांगितले तर चालेल की’ उत्तर ऐकताच मुख्याध्यापकांना हायसे वाटले. मग तिसरा उद्गारला. ‘काही मुली म्हणतात पहिल्यांदा घेतलेले सिलिंडर तसेच रिकामे पडले आहे. घरचा स्वयंपाक चुलीवरच होतो. चित्रात तेही दाखवले तर चालेल का’ हे ऐकताच मुख्याध्यापक ओरडले. ‘चित्रात चूल किंवा धूर दिसला तर नोकरी गेलीच समजा. जेव्हा पहिल्यांदा सिलिंडर घरी आले तेव्हाचेच चित्र डोळय़ांसमोर आणून चित्र काढायला सांगा’ मग चौथा शिक्षक बोलला ‘विश्वगुरूंच्या जनसेवेच्या योजना खूप आहेत. त्या एका चित्रात कशा आणायच्या असे काही विद्यार्थी विचारत आहेत’ त्यावर ते म्हणाले ‘अरे, कोणतीही एक योजना डोक्यात ठेवून चित्र काढा म्हणा. ती एक कोणती हेही मला विचारत बसू नका’ मग पाचवा म्हणाला. ‘सर, त्यापेक्षा भारताचा नकाशा काढायला लावून त्यात सारे योग करत आहेत असे चित्र काढायला सांगितले तर?’ हे ऐकून ते खवळलेच. ‘अरे भारताचे काय घेऊन बसलात. जगाचा नकाशा काढायला सांगा. विश्वगुरू जागतिक नेते आहेत हे विसरता कसे तुम्ही? आणि एक शेवटचे सांगतो. ज्यांना विषयच समजले नसतील त्यांनी केवळ विश्वगुरूंचे चित्र काढले तरी हरकत नाही. कोणत्याही स्थितीत कागद कोरा राहायला नको. नाही तर आणाल आफत’ क्षणकाळ पसरलेल्या शांततेचा भंग करत मुख्याध्यापक म्हणाले ‘आज घरी जायच्या आधी प्रत्येकी पाचशे रुपये माझ्याकडे जमा करा. खर्च वाढलाय आता!’