‘जमलेल्या तमाम मराठवाडाकरांनो, राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांनो, दानवे पराभूत झाले तर डोक्यावरची टोपी काढेन अशी प्रतिज्ञा समारंभपूर्वक पूर्ण करण्यासाठी सर्वांचे लाडके नेते अब्दुल सत्तार आज काहीही न बोलण्याच्या अटीवर हजर झाले आहेत. नुकतेच त्यांनी शिवसेनेसोबतच्या प्रासंगिक करारावर चपखल भाष्य केले. निवडणुकांना अजून वेळ असल्याने त्यावर अधिक बोलणे नको म्हणून त्यांची अट आम्ही मान्य केली व ते या ‘टोपीकाढ’ कार्यक्रमाला आले. यानिमित्ताने त्यांच्या ‘कार्य’कर्तृत्वाचा आढावा मी घेणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकीय हवामानाचे अचूक अंदाज बांधण्यात माहीर असलेल्या या नेत्याची तत्परता काय वर्णावी! लोकांचा कल आपल्या बाजूने झुकवण्यापेक्षा ते त्यांना स्वतंत्रपणे विचार करू देतात. एकदा त्यांचा कल निश्चित झाला की त्या पद्धतीने राजकारणात पावले टाकतात. मतदारांना एवढे स्वातंत्र्य देणारा नेता राज्यात नाही. (टाळ्या) मतपेढी कुणाकडे झुकली हे बघून कोणत्या पक्षात जायचे हे ठरवायला फारच मोठी हिंमत लागते. ती सत्तारांकडे आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने मराठवाडाभूषण ठरतात. त्यांनी केलेली प्रासंगिक करार ही कोटी उच्च दर्जाची म्हणावी अशीच. तात्पुरता करार अडीच ते पाच वर्षे राहू शकतो हे जनतेच्या पहिल्यांदाच लक्षात आले. एसटी महामंडळाने त्यांच्या या बुद्धिमत्तेचा फायदा करून घेतला तर हे मंडळसुद्धा नफ्यात येईल.

हेही वाचा >>> चिप-चरित्र: धाडसी निर्णयाची फलश्रुती

अनेकांना वाटते की सत्तार पटकन राजकीय रंग बदलतात. हे साफ खोटे अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो. सत्तेच्या माध्यमातून सामान्यांचा (स्वत:चा नाही) विकास हेच त्यांचे ध्येय या बदलामागे आहे. आधी ते अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसमध्ये होते. लोक या पक्षाला कंटाळल्याचे दिसताच त्यांनी देवेंद्रभाऊंच्या जनादेश यात्रारथात बसण्याचा प्रयत्न केला. तो अपयशी ठरल्यावर ते तडक मातोश्रीवर गेले. तिथे घुसमट जाणवताच ते शिंदेच्या खऱ्या सेनेत दाखल झाले. आता सिल्लोडमधली ४५ हजारांची मतपेढी आघाडीकडे झुकल्याचे दिसताच त्यांनी खासदार कल्याण काळेंना जवळ केले. या प्रवासाकडे पक्षबदल म्हणून पाहू नका. सामान्य जनतेच्या मतांचा एवढा विचार करणारा नेता या प्रदेशाला लाभला हे आपले भाग्यच. लोकांच्या हितासाठी भूमिका बदलताना त्यांना अनेकदा त्रास झेलावा लागला. पासवाननंतर तुम्हीच अशी शेरेबाजी ऐकावी लागली. पण कधीही त्यांनी ही अवहेलना चेहऱ्यावर दिसू दिली नाही. जनकल्याण जलदगतीने व्हावे म्हणून त्यांनी कृषी खाते निवडले. आजही त्यांचा जीव शेतीच्या बांधावर रमतो. दौऱ्यावर असताना ते मोक्याच्या जमिनी बघत त्या लागवडीखाली (मालकी नाही) कशा आणता येतील याचाच विचार करत असतात. जनउत्थानाचे कार्य करताना कधी हुल्लडबाजी झालीच तर ते चिडतात, गावरान भाषेत लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या मनात काही नसते. कर्तृत्वाने राज्याचे लक्ष वेधणाऱ्या या नेत्यास मी आता प्रतिज्ञा पूर्ण करण्याची विनंती करतो.’ नंतर टाळ्यांच्या गजरात सत्तार उभे राहतात. डोक्यावरची टोपी व्यासपीठाच्या मध्यभागी ठेवून प्रेक्षकांसमोर नतमस्तक होतात. त्याचक्षणी पडदा पडतो.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta satire article on minister abdul sattar statement to take off his hat if raosaheb danve defeat in jalna lok sabha election zws