‘अलीकडच्या दहा वर्षांत परिवारातील ३७ वी संघटना म्हणून वेगाने नावारूपाला आलेल्या भारतीय ज्ञानमार्गी संस्थेतर्फे उपस्थितांचे स्वागत. आज आपण मध्य प्रदेशचे उच्चशिक्षण मंत्री इंदरसिंह परमार यांचा सत्कार करणार आहोत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी बरकतुल्ला विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात भारताच्या शोधपरंपरांचा गौरवपूर्ण उल्लेख करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. विद्वत्ताप्रचुर भाषणात ते म्हणाले की अमेरिकेचा शोध कोलंबसने नाही तर भारतीय खलाशांनी लावला. तोही इसवीसनपूर्व आठव्या शतकात. तेव्हाच तेथील सॅन दियागो शहरात खलाशांनी मंदिरे उभारली. चीनमधील बीजिंग शहराची उभारणी भारतीय वास्तुशास्त्रज्ञांनी केली. तिथे असलेला बाळबाहूचा पुतळा याची साक्ष पटवतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सत्य सर्वप्रथम ऋग्वेदातून समोर आले. भारतभूमीचा शोध वास्को द गामाने नाही तर चंदन नावाच्या भारतीय व्यापाऱ्याने लावला.
हेही वाचा >>> उलटा चष्मा : घरफोडीला लगाम!
आज ऑलिम्पिकचा बोलबाला सर्वत्र असला तरी भारतातील खेळसंस्कृती फारच प्राचीन आहे. या स्पर्धेच्या कितीतरी शतके आधी आपल्याकडे स्टेडियम्स होती. त्यांची ही विधाने आजवर शिकवल्या गेलेल्या इतिहासाला पूर्णपणे बाद ठरवणारी व भारत प्राचीन काळापासून कसा विश्वगुरू होता हे स्पष्ट करणारी आहेत. परमार हे आपल्याच संस्थेच्या तालमीत तयार झालेले. जागतिक प्रमाणवेळ इंदोरमध्ये निश्चित झाली हे जगासमोर आणणारे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवसुद्धा याच संस्थेचे विद्यार्थी. ब्रूनो, गॅलिलिओ यांचाही इतिहास पुसून काढणाऱ्या परमारांचा आज आपण गौरव करणार आहोत. त्यांनी उपस्थितांना वैचारिक मेजवानी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो.’ मग परमार बोलू लागतात… ‘त्या दिवशी भाषणाला जरा कमीच वेळ मिळाला. तिथे राहून गेलेले शोधामागील सत्य आज मी सांगणार आहे. (प्रचंड टाळ्या). प्लास्टिक सर्जरी व पुष्पक विमानाच्या शोधाचा प्रसार करण्यात आपण कमालीचे यशस्वी ठरलो. दूरचित्रवाणीचा शोध पाश्चात्त्यांनी लावला हे साफ खोटे. आंधळ्या धृतराष्ट्राला महाभारतातील प्रत्येक घडामोड सांगणारे संजय तेव्हा टीव्ही बघूनच निवेदन करत. रामायणातील अग्निअस्त्रे, पर्जन्यअस्त्रे ही शस्त्रे म्हणजे आजची मिसाईल्स. ती आपण तेव्हाच शोधून काढलेली. वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले साधू, संत तेव्हा अंतर्मनाने एकमेकांशी संवाद साधत. त्यामुळे दूरध्वनीचा शोधसुद्धा आपलाच. केवळ शून्यच नाही तर संपूर्ण गणिताचा शोध आपण लावला याचे ढीगभर पुरावे आहेतच. प्राचीन काळापासून आकाशवाणी आपल्याकडे अस्तित्वात होती. त्यामुळे नभोवाणीचा शोधही आपलाच. तेव्हा ‘आता उठा, जागे व्हा व भारतीय शोध व ज्ञान परंपरेचा प्रसार करा.’ तेवढ्यात सभागृहाच्या बाहेर नारेबाजी सुरू होते. नेमके काय सुरू आहे हे कळल्यावर संस्थेचे प्रमुख उभे राहून बोलू लागतात. ‘परदेशी निधीवर पोसले जाणारे काही बोटांवर मोजण्याएवढे ‘कथित’ विज्ञानवादी बाहेर कोलंबस, वास्कोची छायाचित्रे घेऊन घोषणा देत आहेत. त्यांच्याकडे लक्ष न देता आता आपण परमारांचा सत्कार करू या’ हे ऐकताच एका तालात टाळ्या वाजू लागतात.