काय आनंदराव तुम्ही? अहो, अमरावतीवरचा दावा सोडण्याची भरपाई म्हणून किमान राज्यसभा तरी मागायची ना! त्या राजभवन नामक सोनेरी पिंजऱ्यात बसायची काय हौस? ही तडजोड स्वीकारण्याआधी आपण राज्यपालपदाच्या निकषात बसतो का याचा विचार करायचा ना! अहो, तिथे पट्टीचे परिवारवाले लागतात. रोखठोक बोलणारे, प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भाषा करणारे नाही चालत. समजा तुम्हाला नेमलेच व भविष्यात झालात तुम्ही सत्यपाल मलिक तर काय? हा लाखमोलाचा प्रश्न लक्षात कसा आला नाही तुमच्या? तुम्ही जाहीर अल्टीमेटम देऊन मलिकांच्या दिशेने जाण्याची झलक दाखवून दिलीच ना! आजवर मंत्रीपदाची अपेक्षा जाहीरपणे व्यक्त करणारे अनेकजण बघितले पण हे पद हवे अन्यथा बघून घेईन असा इशारा देणारे पहिले तुम्हीच. याचा अर्थ अजून तुम्ही वृद्ध झालेला नाहीत. अहो, या पदासाठी तंदुरुस्त वृद्ध हवा असतो. तुम्ही दिसता तरुण. मदतनिसाशिवाय वावरता. सोनेरी वृद्धाश्रमासाठी तुम्ही पात्रच नाहीत. इतका सक्रिय माणूस या पदावर नियंत्रण ठेवून असणाऱ्यांना परवडणारा नाहीच. अलीकडे या भवनात बाहुले हवे असतात. चावीवर नियंत्रित होणारे. तुम्ही मूळचे बंडखोर वृत्तीचे. राग येऊन चावीच काढून घेतलीत तर? वरच्यांच्या असल्या प्रश्नांचा विचार तुम्ही करायला हवा. हेही वाचा >>> अन्वयार्थ : प्रवास कसला? फरपट अवघी! ‘पद दिले नाही तर नवनीत राणांच्या प्रमाणपत्राचे प्रकरण बाहेर काढीन’ असा इशारा देऊन त्रास देण्याची खुमखुमी शिल्लक आहे, हे दाखवून दिलेत. या पदासाठी तुम्ही पात्र असल्याचे हे एकमेव लक्षण पण त्यासाठी विरोधकांची सत्ता असलेली राज्ये तरी शिल्लक हवी ना! अलीकडेच अशी खुमखुमी असलेल्यांना योग्य जागी पाठवले गेले. त्यामुळे आता रिक्त पद नसताना हे लक्षण दाखवून उपयोग काय? तुमचे सहकार क्षेत्रातले ज्ञान अफाट तर तुमच्यावर अंकुश ठेवणाऱ्यांकडे हेच खाते. आता इतका ज्ञानी माणूस हाताखाली कोण खपवून घेईल? राजकारणात तपशिलांचा विचार करावा लागतो आनंदराव. हे पद ‘सांगकाम्या’ स्वरूपाचे. मान आहे पण काम नाही. तुम्ही कार्यक्षम, कशाला उगीच त्रागा करून घेता? त्यांनी शब्द दिला व तो पाळला नाही हे तुमचे म्हणणे योग्य पण राजकारणात न पाळण्यालाच महत्त्व आले अलीकडे. राणा जिंकल्या असत्या तर कदाचित दखल घेतली गेली असती या शब्दाची पण त्याही घरी बसल्या. मग तुम्हाला भवनात पाठवण्याचे कष्ट का बरे ते घेतील? तुम्ही अमरावतीच्या सीटवर टाकलेला रुमाल उचलायलाच नको होता. उचलला तर मागणी तरी मोठी करायला हवी होती. ही गोष्ट वाचा. एक गवंडी असतो. त्याला तंबाखू खायची इच्छा होते. तो त्याच्याकडे असतो पण चुना नसतो. या विवंचनेत असताना त्याला एक देऊळ दिसते. तिथे जाऊन तो चुन्याच्या डबीचे साकडे घालतो. देवही हसत भलामोठा डबा त्याच्यासमोर ठेवतो. काय मागावे याचेही भान असावे लागते. तुम्ही ते सोडले, त्यामुळे आता आदळआपट करण्यापेक्षा एकदा मातोश्रीकडे प्रेमाने बघा की!