‘अतिशय प्रतिकूल स्थितीतही येथे मोठ्या संख्येत जमलेल्या माझ्या शिवसैनिकांनो, तुमच्या कष्टांमुळे निवडून आलेले खासदार संजय जाधव यांनी पक्षद्रोह करूनसुद्धा तुमचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही हे बघून मी सद्गदित झालो आहे. कालच मी उद्धवजींना भेटलो. ‘मी सोडून जाणार नाही’ असे प्रतिज्ञापत्र, बाळासाहेबांच्या तसबिरीसमोर शपथ व हाताला बांधलेल्या शिवबंधनावर विश्वास बसल्यानंतर त्यांनी ‘पुढचे उमेदवार तुम्हीच’ असा शब्द दिला. तो तुम्हाला सांगण्यासाठी आज मी इथे उभा आहे. आता या मतदारसंघातून कधीही कुणी गद्दार होणार नाही याची काळजी आपण सर्व घेऊ.’ एवढे जोशपूर्ण बोलूनही कुणीच टाळ्या वाजवल्या नाहीत हे बघून भावी उमेदवार अस्वस्थ होत खाली बसले.
तेवढ्यात समोर बसलेला एक ज्येष्ठ शिवसैनिक अचानक व्यासपीठावर येत ध्वनिक्षेपकाचा ताबा घेता झाला. ‘भावी उमेदवार साहेब, गद्दारांना शिव्या देत उमेदवारीचा शब्द मिळवणारे तुम्ही सहावे. येथून जो निवडून आला तो पक्ष सोडून पळाला. यामुळे ‘जगात जर्मनी व देशात परभणी’ ही म्हण देशभर पोहोचली. आता मात्र आम्ही म्हणजे खासदार निवडून आणणार्या कार्यकर्त्यांनी जरा पवित्रा बदललाय. निवडून आल्यावर मी निश्चितपणे पक्ष सोडेन असे तुम्ही आता जाहीर करा. (प्रचंड टाळ्या) हे ऐकल्यावर आम्ही अजिबात दु:खी वा विचलित होणार नाही.
निवडून आलेला खासदार नंतर पळो की पक्षात राहो, आम्ही शिवसैनिकांनी मात्र प्रत्येक वेळी शिवसेनेला निवडून देण्यासाठीच हातात शिवबंधन बांधलेले. त्यामुळे तुमचेही काम आम्ही नेटाने करू. त्यात कुठलीही कसर सोडणार नाही. आमची मागणी फक्त एकच. तुम्ही सोडून जाऊ हे आताच सांगून टाका. कारण आम्हाला मतदारसंघात गेल्या ३० वर्षांपासून निर्माण झालेली ‘पक्षद्रोहा’ची परंपरा भविष्यात अजिबात खंडित करायची नाही. (जोरदार टाळ्या) आम्ही तुमच्याकडून आधीच हे का वदवून घेतोय असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल. त्याचेही उत्तर देतो. पक्ष सोडणारा प्रत्येक खासदार कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, विकासाला निधी मिळत नाही, कार्यकर्ते नाराज झालेत असे म्हणत पक्षफुटीची पावती आमच्या नावावर फाडतो. आम्हाला राग येतो तो याचा.
आमची कामे होत नसती, आम्ही नाराज असतो तर प्रत्येक वेळी आम्ही पक्षाच्या नव्या चेहर्याला निवडून दिले असते का? खोके तुम्ही घ्यायचे, स्वार्थ तुम्ही साधायचा व बिल मात्र आमच्या नावावर. आता यापुढे हे अजिबात चालणार नाही. तुम्ही सोडून जातो हे जाहीर केल्यावरही आमच्या निवडणुकीतील मेहनतीत तसूभरही फरक पडणार नाही. पुढच्या निवडणुकीला आणखी तीन वर्षे आहेत. या काळात आम्ही आमच्या मनाची पुरेपूर तयारी करून घेऊ. आम्हाला फुटीर खासदारच निवडून आणायचा अशी. त्यामुळे आता होत असलेली चिडचिड तेव्हा होणार नाही.
आमच्या संतापाला तुम्हाला सामोरे जावे लागणार नाही. म्हणून सांगतो आता घोषणा करणेच तुमच्या फायद्याचे. (उमेदवार अस्वस्थ) आम्हाला आता या मतदारसंघात कितीही खासदारांनी पक्षद्रोह केला तरी कार्यकर्ते निवडून आणतात शिवसेनेच्याच उमेदवाराला अशी नवी परंपरा निर्माण करायची. तेव्हा विचार करा. आता नाही तर पुढच्या मेळाव्यात घोषणा करा पण आम्हाला हवी तशीच.’ हे ऐकून भावी उमेदवार मेळावा सोडून थेट ‘मातोश्री’वर दाखल झाले. उद्धवजींची भेट घेऊन त्यांनी सारा वृत्तांत कथन केला. हे ऐकून ते केवळ हसले. दुसर्याच दिवशी ते परभणीकडे रवाना झाले. आता प्रत्येक मतदारसंघात असे कडवे शिवसैनिक तयार करणे गरजेचे असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले.
