मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यपूर्वकाळात ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’ची विधिवत स्थापना करून मार्क्सवादाला भारतीय पर्याय देण्याचा प्रयत्न केला होता. त्यास मूठभर बुद्धिजीवींच्या पलीकडे जनसामान्यांचे पाठबळ न मिळाल्याने, शिवाय भारतीय जनमत क्रांतीपेक्षा परिवर्तनशील मानसिकतेचे असल्याची जाणीव होऊन बुद्धिप्रामाण्यवादी रॉयिस्टांनी व्यक्तिस्वातंत्र्याचे समर्थन करणारा नवमानवतावाद अंगीकारला होता. ही घटना १९४८ची. १९७८मध्ये या नवविचारास चार दशके पूर्ण झाली होती. त्यानिमित्त पूर्वविचारांचे सिंहावलोकन करणारे चिंतन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘गोमांतक साहित्य सेवक मंडळ, पणजी (गोवा)’ संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी समारंभाचे अध्यक्ष म्हणून केलेल्या भाषणात केले होते.

नवमानवतावादी विचार दृष्टिकोनातून साहित्यबंधाचा धांडोळा घेत या भाषणात तर्कतीर्थांनी विशद केले होते की, ‘‘नवमानवतावाद हा प्रगल्भदशेस आलेल्या वर्तमान वैज्ञानिक विचारपद्धतीवर आधारलेला आहे. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने या नवमानवतावादास ‘विकासवादी मानवतावाद’ अशी संज्ञा जीवविज्ञानाचे मोठे पंडित ज्युलियन हक्सले यांनी दिली आहे. विकासवादाप्रमाणे या सबंध विश्वाच्या विकासाच्या ज्या श्रेणी विज्ञानाच्या दृष्टिपथात आल्या आहेत, त्यात निरिंद्रिय म्हणजे अजीव श्रेणी (निर्जीव) आणि सेंद्रिय सजीव श्रेणी, या मुख्य दोन श्रेणी आहेत. सजीवसृष्टीच्या श्रेणीचा उच्च बिंदू व शिरोमणी मानवप्राण्याची श्रेणी आहे. मानवामध्ये स्वातंत्र्य हा धर्म विशेष रूपाने झाला आहे. रुसोने म्हटल्याप्रमाणे, हा स्वातंत्र्य घेऊन जन्मला. माणसाच्या भावना, इच्छा आणि विवेकबुद्धी यांच्यात हे स्वातंत्र्य प्रकट झाले आहे. त्याचे या सृष्टीतील जीवन हे त्याच्या स्वातंत्र्याच्या विकासावर अधिष्ठित आहे. त्याला स्वातंत्र्याची देणगी जन्मत: प्राप्त झाली आहे. त्याच्या भावना, इच्छा आणि विवेकबुद्धी यांची त्याला निरंतर साथ असते.

त्याच्या स्वातंत्र्याच्या दोन बाजू आहेत. (१) बंधनांचा नाश, (२) जीवनाच्या गरजांची पूर्तता करत राहणे. बंधने अगणित आहेत. त्यांच्या नाशाची आणि जीवनपूर्तीची साधने अगणित आहेत. म्हणून मनुष्य हा स्वभावत:च निरंतर अस्वस्थ प्राणी झाला आहे. भगवान बुद्धाचा आणि आधुनिक विज्ञानाचा मूलभूत सिद्धांत असे सांगतो की, हे सगळे अंतर्बाह्य विश्व सतत क्षणोक्षणी बदलत असते. उत्पत्ती-नाशाची परंपरा अबाधित चालते, कोठेही थांबत नाही. म्हणून सतत सावधपणे नवनिर्मितीचा व्यवसाय चालविलाच पाहिजे.

मनुष्य हा सामाजिक प्राणी असल्यामुळे तो झगडा करण्यास आणि विजय मिळविण्यास समर्थ होतो. त्याचे व्यक्तिमत्त्व आणि सामाजिकता हे परस्परविरोधी व परस्परपूरक द्वंद्व आहे. निसर्गाची सेंद्रिय विकासप्रक्रिया माणसापाशी थांबली आहे आणि विकासाची ही निसर्गातील प्रक्रिया पुढे नेण्याचे कार्य माणसाकडे सोपविले आहे. माणसाच्या अजाण, असंज्ञ अंतर्मनात ही विकासाची जबाबदारी रुजलेली असली, तरी ती जाणकार संज्ञायुक्त मनात जाणिवेच्या रूपाने व्यक्त झाली म्हणजे प्रत्यक्ष सांस्कृतिक विकास अधिक वेगाने सुरू होतो. बाहेरच्या जगाला आणि मानसिक जगाला आकार देण्याचे कार्य म्हणजे विकासकार्य. मानवी सर्जनशीलतेचे दर्शन त्या त्या निर्माण केलेल्या संस्कृतीत दिसते. मानवतेचा पूजक फ्रेंच तत्त्वज्ञ कोन्त म्हणतो की, मानवाचा स्वभाव म्हणजे त्याने घडविलेला इतिहास होय. मानवाने केलेल्या निर्मितीच्या धर्म, विज्ञान आणि कला या तीन कक्षा आहेत. या निर्मितीची बाह्य भौतिक साधने त्याच्या स्वाधीन नसतील, तर त्याची अंतरंगाची निर्मितीसुद्धा अशक्य होईल. या बाह्य भौतिक साधनांमध्ये रंग व रूप अथवा आकार आणि ध्वनीलाच अर्थपूर्ण शब्दाचे रूप मनुष्यजातीच्या जन्माबरोबर प्राप्त झाले आणि एकदम विश्वव्यापी प्रकाश पडला. म्हणून दंडी या कवीने म्हटले आहे, ‘शब्द हा प्रकाश नसता, तर विश्व अंध:कारात बुडाले असते.’ केशवसुतांनी ‘शब्दांनो, मागुते या’ या कवितेत याच दृष्टीने सांगितले की, ‘‘तेजाचे पंख वाऱ्या परि हलवीत ती चालली शब्दपंक्ती, देव्हारा शारदेचा उचलुनि गगनातुनि ती नेत होती.’’ शब्दाच्या आकाशवाहनात शारदा विहार करीत असते. माणसाची सामाजिकता निर्माण करणारे सर्वश्रेष्ठ साधन व सामाजिक शक्ती भाषा ही होय.

यात व्यक्तिस्वातंत्र्य व बंधमुक्त मानव या दोन मुद्द्यांचा तर्कतीर्थांनी केलेला ऊहापोह विचार करण्याजोगा आहे. तोच नवमानवतावादी विचाराचा केंद्रबिंदू आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com