‘‘विचार व साहित्य यांचा शाश्वत सहभाव असतो. विचारमूल्याशिवाय साहित्याला स्वत:चे कलात्मक, आनंदमय असे मूल्य आहे. साहित्याचा गाभा विचारापेक्षा भावनाच अधिक असतो, या समीक्षक दृष्टीचा अद्याप निर्णय झालेला नाही. असे लक्षात येते की, त्या त्या युगातील प्रभावी विचारांनी साहित्याचा आशय व आकार (फॉर्म) बदलला आहे. महान आशयाला योग्य आकार प्राप्त झाला की, या साहित्य वा कलेला संस्कृतीत अढळ स्थान प्राप्त होत असते. विचारमय किंवा ज्ञानमय रचनेचा निरपेक्ष (डिसइंट्रेस्टेड) आनंद मिळवून देणारे जे साहित्य तर्कसंगतीला प्राधान्य देणारे असते, त्यात निबंध, इतिहास, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, सृष्टीविज्ञान इत्यादी विषयांसंबंधी ग्रंथांचा अंतर्भाव होतो.’’ असे सूत्र घेऊन केलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे हे भाषण अनेक अर्थांनी त्या काळी विचारप्रवण मानले गेले होते.

हे भाषण तर्कतीर्थांनी २९ डिसेंबर, १९६२ रोजी पणजी (गोवा) येथे झालेल्या ११व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून दिले होते. ही संमेलने त्या काळी गोमंतक साहित्य सेवक मंडळ आयोजित करीत असे. प्रस्तुत भाषण अनेक संदर्भांनी युक्त आहे. कारण, त्यामागची पार्श्वभूमी विविध घटना, प्रसंगांची शृंखला आहे. गोवा राज्य १९ डिसेंबर, १९६१ रोजी भारतीय सैन्याने पोर्तुगीज साम्राज्यातून मुक्त केले. त्यानंतरच्या काळात गोव्यात अनेक संघर्ष निर्माण झाले. तेथील राज्यभाषा मराठी की कोंकणी असावी, ते राज्य स्वतंत्र व्हावे की महाराष्ट्रात विलीन करावे इत्यादी. शिवाय हा काळ भारत-चीन संघर्षाचा होता. मार्क्सवाद, कम्युनिझम या विचारसरणींवर मोठे मंथन सुरू होते. या सर्वांचा परामर्ष घेणारे हे तर्कतीर्थांचे भाषण वैचारिक मंथन करणारे ठरले होते.

आपल्या या भाषणात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले होते की, गोमंतक हा महाराष्ट्राचा अविच्छेद्या भाग आहे. कोंकणी ही मराठीची बोली आहे, ती स्वतंत्र भाषा नाही. त्यामुळे गोव्याने मराठी भाषेचा स्वीकार करून महाराष्ट्रात विसर्जित होणे हिताचे. तत्कालीन राजकीय क्षितिजावर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा या विचाराचा होता. हे संमेलन योजणारे याच विचारांचे पुरस्कर्ते होते.

प्रस्तुत भाषणासंदर्भात भारतीय सीमेवर चिनी आक्रमणाचा तत्कालीन प्रश्न ऐरणीवर आल्याचा उल्लेख ओघाने येणे क्रमप्राप्त होते. युद्धसाहित्याची निर्मिती, युद्धसंकल्प, इत्यादी गोष्टींचा साहित्याशी असलेला संबंध अधोरेखित करीत तर्कतीर्थांनी या भाषणात इच्छाशक्ती, साहित्य, संस्कृती आणि विचार या तत्त्वांचा गोफ विणत म्हटले होते की, ‘‘इच्छाशक्तीला प्राधान्य देणारी सांस्कृतिक परंपरा पाश्चात्त्य संस्कृतीला लाभली आहे. नात्यातील उच्चतम कलाकृती म्हणजे दु:खान्तिका (ट्रॅजिडी) पाश्चात्त्य मनुष्याला निर्माण करता आली. पाश्चात्त्य जनतेने तिचे हजारो वर्षे रसिकतेने स्वागत केले. भारतीय संस्कृतीच्या प्रकृतीला दु:खान्तिका यशस्वी रीतीने निर्माण करता येत नाही व सोसतही नाही. याचे कारण, नियतीवर मात करणारा इच्छाशक्तीचा (विल पॉवर) प्रबळ स्राोत येथील संस्कृतीने निर्मिलेला नाही. संकल्पाचा महिमा व अदम्य इच्छाशक्तीचे श्रेष्ठत्व भारतीय संस्कृतीला जेव्हा जनहृदयात स्थापन करता येईल, तेव्हाच आक्रमणाचा पराभव करता येईल.’’

चिनी आक्रमणामागे लाल साम्राज्यवादाची प्रेरक शक्ती होती. ती कम्युनिझमची वैचारिक बैठक होती. हा विचार आक्रमक होऊन शस्त्रधारी बनतो आणि राक्षसी संहार करावयास उद्याुक्त होतो. या पार्श्वभूमीवर तर्कतीर्थ म्हणतात, ‘‘प्रत्येक मानवी विचार व उच्च विचारसरणी ही परिस्थितीने मर्यादित असते. त्यामुळे मर्यादित प्रमाणातच त्यात सत्यांश राहतो. यात संभावणारी असत्ये शोधून काढणे, हे एक मुख्य मानवी कर्तव्य आहे. चिनी कम्युनिस्ट हुकूमशाहीचे आक्रमण थोपविण्याच्या उपायांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे संशोधन करणे, हे विचारवंतांचे व साहित्यिकांचे सद्या:स्थितीतील आद्याकर्तव्य आहे. मानवी संस्कृतीच्या विकासाचा व सत्यशोधनाचा जिवंत तेजस्वी स्राोत शस्त्राने अडविणारा कम्युनिस्ट विचार आहे. कम्युनिझम सशस्त्र होऊन उभारतो, तेव्हा त्याचे विचाररूप नष्ट होते; ती क्रूर व ती विकृत अंधश्रद्धा बनते. हेच सत्य साहित्यिकांनी व विचारवंतांनी जनतेस पटविण्याचे कार्य केले पाहिजे.’’

हे विचार वाचताना तर्कतीर्थ कधी काळी (१९३० -४८) सशस्त्र विचारधारेचे समर्थक होते, यावर विश्वास बसत नाही.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com