‘तर्कतीर्थविचार’ सदर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षा’चे औचित्य साधून सुरू करण्यात आले. या सदराचा हा शतकपूर्ती भाग. तो १९५२चा ‘नोबेल शांतता’ पुरस्कार संपादन करणाऱ्या मानव्य सेवक आणि संस्कृती तत्त्वज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर यांना समर्पित.

४ सप्टेंबर, १९६५ रोजी ९०व्या वर्षी त्यांचे निधन झाल्यावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या ऑक्टोबर, १९६५ च्या अंकात त्यांच्या कार्याचा गौरव करीत श्रद्धांजली लेख लिहिला होता. त्यानुसार डॉ. श्वाइट्झर यांचा जन्म ४ ऑक्टोबर, १८७५ रोजी फ्रान्सच्या अल्सेस प्रांतातील कैसरबर्ग-विग्नोबल येथे झाला. तो ऑडेल आणि लुई श्वाइट्झर यांचा मुलगा. बालपणापासून त्याला संगीताची आवड होती. घरी धर्मोपदेशक परंपरा होती. त्यामुळे नीती, सदाचार, सेवा इ. मूल्यांचे संस्कार होत राहिले. त्यांची मातृभाषा जर्मन होती. डॉ. श्वाइट्झर यांनी स्ट्रासबर्ग विद्यापीठातून (फ्रान्स) धर्मशास्त्रात पदवी प्राप्त केली. पुढे १८९९ मध्ये ट्युबिंगेन विद्यापीठातून (जर्मनी) पीएच.डी. पदवी मिळविली. १९१३ मध्ये ते स्ट्रासबर्ग विद्यापीठातून वैद्याकशस्त्रातील एम.डी. झाले. अशाप्रकारे तत्त्वज्ञान, धर्म, संगीत, वैद्याक अशा विषयांत पारंगत होऊन त्यांनी आपल्या असाधारण प्रज्ञा आणि प्रतिभेची प्रचीती देऊन सर्वांना चकित केले.

पण ही काही त्यांची खरी ओळख नव्हे. १९५० मध्ये नॅशनल आर्टस् फेडरेशनने जगातील १७ देशांमधील साहित्यकार, संगीतकार, कलाकार असलेल्या मान्यवरांकडून ‘विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ पुरुष’ म्हणून जो जनमत संग्रह केला होता, त्यात जगाने डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर यांची निवड केली होती. त्या अनुषंगाने वि. स. खांडेकर यांनी ‘विसाव्या शतकातला श्रेष्ठ पुरुष : डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर’ शीर्षकाचा हृद्या लेख ‘किर्लोस्कर’ मासिकाच्या जानेवारी, १९५६च्या अंकात प्रसिद्ध केला होता. त्यात डॉ. श्वाइट्झर यांच्या ‘जीवनार्थ प्रेरणा’ (विल टू लिव्ह) तत्त्वानुसार जगणे सांगून ठेवले आहे. ते असे- ‘‘अनेक गोष्टी आपल्याला आई-वडिलांकडून, गुरूंकडून, मित्रांकडून, नातेवाईकांकडून मिळतात आणि त्या आपल्या जीवनावर नकळत संस्कार करतात. हे सर्व ऋण यथाशक्ती फेडणे प्रत्येकाचे कर्तव्य असते.’’

डॉ. श्वाइट्झर यांनी ब्रेसली हेलेन यांच्याशी १९१२ ला विवाह केल्यानंतरचे १९१३ ते १९६५ असे ५२ वर्षांचे आयुष्य कृष्णवर्णीय आफ्रिकनांच्या (निग्रो) सेवेत घालविले. या समाजसेवेस प्रारंभ झाल्याचा क्षण प्रेरक आहे. फ्रान्समध्ये ख्रिाश्चन मशिनरीजकडून चालविल्या जाणाऱ्या अनाथाश्रमास आग लागून त्याची राखरांगोळी होते. सहृदयी डॉ. श्वाइट्झर त्या आश्रमातील अनाथ मुलांना आपल्या घरी नेऊन सांभाळू इच्छित होते. आश्रमाच्या फादरचे म्हणणे होते की, ही आमची जबाबदारी आम्हीच उचलली पाहिजे. अशा विमनस्क स्थितीत असताना पॅरिस मशिनरी सोसायटीचा अहवाल त्यांच्या हाती आला. त्यात आफ्रिकेतील फ्रेंच वसाहतीतील लँबॅरने (गॅबॉन)मधील कृष्णवर्णीयांचे हलाखीचे वर्णन करण्यात येऊन मदतीची हाक दिली होती. जन्मत: संवेदनशील, धर्मपरायणवृत्तीच्या डॉ. श्वाइट्झरना ‘पृथ्वीच्या पाठीवरील अत्यंत उपेक्षित जीवन’ या वाक्याने अस्वस्थ केले व ते सपत्नीक तिथे गेले नि तिथेच सेवारत राहात त्यांनी आपला प्राण सोडला.

डॉ. श्वाइट्झर यांनी ऐन चाळिशीत हा अरण्यवास पत्करला. तर्कतीर्थांनी त्यांच्या असीम मानव्य व संस्कृतीसेवेचे वर्णन करीत या श्रद्धांजली लेखात म्हटले आहे की, ‘‘त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अलौकिक महिमा म्हणजे दु:खित व पतित मानव्याची सेवा करण्याकरिता समर्पित केलेले त्यांचे जीवन होय. पतन पावत असलेल्या व विनाशाकडे धावणाऱ्या मानवी संस्कृतीला वाचविण्याकरिता व कर्तव्यकर्माची दिशा दाखविणारा आदेश म्हणजे डॉ. श्वाइट्झर यांचे जीवन होय.’’ डॉ. श्वाइट्झर यांनी वैद्याक मिशनरी म्हणून कृष्णवर्णीयांसाठी उभारलेली वसाहत, रुग्णालय, जीवनार्थ प्रेरणा तत्त्वज्ञानाची रुजवण, विश्वदृष्टी स्वरूपात केलेले कार्य व लेखन यांची नोंद घेत १९५२ चा ‘नोबेल शांतता’ पुरस्कार लाभला, तेव्हा ते म्हणाले होते की, ‘‘कृष्णवर्णीय रुग्णांची सेवा करण्यात आयुष्य झिजविणे हे माझ्या जीवनाचे इतिकर्तव्य होय. हे केवळ सत्कर्म नव्हे. जे टाळणे अयोग्य व अशक्य आहे, असे हे मुख्य कार्य होय.’’

डॉ. सुनीलकुमार लवटे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com