सदाशिव बागाईतकर (१९२३-१९८३) राष्ट्रसेवा दल, शेतकरी पंचायत, कामगार संघटनांशी संबंधित कार्यकर्ते होते. ते राज्यसभा सदस्यही (१९७८-१९८३) होते. १९८४ ला त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमाला सुरू केल्यावर पहिल्याच वर्षी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना व्याख्याता म्हणून आमंत्रित केले होते. तत्कालीन राजकीय पटलावर सुरू असलेल्या खलिस्तान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘शिखांचा पंथ व इतिहास’ विषयावर तर्कतीर्थांची दोन व्याख्याने झाली. त्यांचे विषय होते – १) शिखांचा धार्मिक इतिहास, २) शिखांचा राजकीय इतिहास. या दोन भाषणांचा संग्रह म्हणजे ‘शिखांचा पंथ व इतिहास’ हा ग्रंथ आहे.
‘शिखांचा पंथ व इतिहास’ (१९८४) ग्रंथातील पहिल्या भाषणात तर्कतीर्थांनी विशद केले आहे की, ‘शीख’ या शब्दाचा अर्थ आहे शिष्य. या धर्माचे गुरू नानकदेव (१४६९-१५३९) होत. सर्वधर्मानुयायी त्यांचे शिष्य होते. ‘गुरूग्रंथसाहिब’ हा या धर्माचा ग्रंथ. हे संतवचनांचे संकलन आहे. ते पंजाबी भाषेच्या गुरूमुखी लिपीत लिहिले आहे. संत नानकदेव, अंगद, अमरदास, रामदास, अर्जुन, हरगोविंद, हरराय, हरकिशन, तेघबहादूर, गोविंदसिंह हे या धर्माचे आद्यागुरू होत. ‘गुरूग्रंथसाहिब’ ग्रंथ संत वचनांचे संकलन आहे. ते संत अंगद यांनी कबीर, धन्ना, रविदास, सेना, परमानंद, सूरदास, त्रिलोचन भीकना, मीराबाई यांची पदे संकलित करून साकारले आहे. हा धर्म मूर्तिपूजा मानत नाही. तो जातपातही मानत नाही. ‘एकं सत्य’ तत्त्वावर हा धर्म उभा आहे. ‘भजन संगत, भोजन पंगत’ या धर्माचारातून हा धर्म विकसित होत आला आहे. ‘ॐ सत् नाम, करता, पुरूख, निरभऊ, निवैरू, अकालमूरति, अजोनि, सैभङ् गुरूप्रसाद’ हा या धर्माचा मूलमंत्र आहे. ‘गुरूग्रंथसाहिब’ची पूजा, नमन, स्मरण, भजन, संकीर्तन हा या पंथाचा धर्माचार आहे. जहाँगिराच्या काळात या धर्माच्या अनुयायांवर अत्याचार झाले. त्यातून मूलत: वारकरी असलेला हा पंथ धारकरी बनला. त्यातून कृपाण, कंगवा, केस, कच्छ (आखूड वस्त्र), कडे या पाच गोष्टी त्यांची सकृद्दर्शनी ओळख बनून गेली.
‘शिखांचा राजकीय इतिहास’ व्याख्यानाद्वारे तर्कतीर्थांनी इतिहासावर प्रकाश टाकला आहे. त्यानुसार मुघल साम्राज्य काळात शिखांनी अस्तित्व रक्षणार्थ मुघलांचा मुकाबला केला. हा काळ इसवी सनाच्या सतराव्या-अठराव्या शतकाचा आहे. १८०१ मध्ये राणा रणजितसिंह यांना राजपद मिळाले. मराठे व शीख एकत्र लढले असते, तर मुघल पराभूत होऊ शकले असते. अखेर इंग्रजांनी मुघलांचा पाडाव केला. राणा रणजितसिंह यांनी सर्वधर्मसमभावाचे धोरण अंगीकारल्याने त्यांना व्यापक समर्थन लाभले. ‘हिंदुओं का गुरू और मुसलमानों का पीर’ अशी द्वैती मान्यता त्यांच्या धार्मिक उदारतेतून त्यांना मिळाली. लछमन दास ऊर्फ बंदा बैरागी (१६७०-१७१६) यांनी कंबर कसून शीख धर्माचे रक्षण केले. त्यामुळे शिख समुदाय संघटित झाला. उत्तरेत सोनपत व दक्षिणेत नांदेडपर्यंत शीख धर्माचा प्रसार त्यामुळे होऊ शकला. बंदाच्या हत्येनंतर गुरू गोविंदसिंगांनी नांगरांच्या तलवारी करून धर्मरक्षण केले. हिंदू-शीख समन्वयामुळे अनेक वेळा मुघलांनी स्वाऱ्या करूनही शीख धर्म अबाधित राहिला. शीख संघटन व्यापक होत मिसाल (मिस्ल) स्थापनेमुळे १७६८ ते १७९८ पर्यंत पंजाब प्रांत शीख प्रांत म्हणून सुरक्षित राहिला. एकोणिसाव्या शतकातही शीख धर्मास अस्तित्व रक्षणार्थ निकराने लढा देत राहणे भाग पडले. १८५७ च्या बंडात शिखांनी ब्रिटिशांना साथ देऊनही जालियनवाला बाग हत्याकांड (१९१९) घडल्याने शिखांना भ्रमभंगाचे दु:ख अनुभवावे लागले. अस्तित्व रक्षणासाठी वारंवार कराव्या लागणाऱ्या संघर्षाच्या नैराश्याचे प्रगट रूप म्हणजे खलिस्तान आंदोलन (१८८०-८४). पंजाब व हरियाणा विभाजन त्याचे आणखी एक कारण (१९६६). या संक्षिप्त इतिहासातून तर्कतीर्थांनी शीख समाजाची ससेहोलपट मांडली असून, शिखांच्या निरंतर संघर्ष, बलिदानातून देशाच्या सीमा रक्षणार्थ केलेले कार्य शब्दांकित करून त्यांच्याप्रति आदर व्यक्त केला आहे.
drsklawate@gmail.com