अंबानी आणि पेट्रोलसंबंधीच्या वक्तव्यावर वारंवार स्पष्टीकरण देऊन वैतागलेले दादा रात्री उशिरा बंगल्यावर परतले पण त्यांना झोपच येईना! कूस बदलूनसुद्धा डोळे मिटत नाहीत हे बघून ते उठले. आता ‘पश्चात्तापपर्वा’शिवाय पर्याय नाही, असे म्हणत त्यांनी फक्त त्यांच्याचकडे असलेल्या चावीने ‘प्रीती संगम’ असे लिहिलेल्या खोलीचा दरवाजा उघडला. आत प्रवेश करून दिवे लावताच यशवंतरावांच्या कराडमधल्या समाधीसारखीच हुबेहूब समाधीची प्रतिकृती बघून ते जरा सुखावले. माध्यमांच्या गराड्यात पश्चात्तापासाठी तिथे जाण्यापेक्षा हे घरच्या घरी बरे, असे म्हणत त्यांनी समाधीसमोर बसून डोळे मिटले. ‘गुरुवर्य, मी काहीही चुकीचे बोललो नाही. धीरूभाई अंबानी पंपावर पेट्रोल सोडून मोठे झाले, हे माझे मूळ वाक्य पण माध्यमांनी ‘सोडून’ऐवजी ‘चोरून’ हा शब्द तिथे टाकला व माझी नाहक बदनामी सुरू केली. महत्प्रयासाने मी सत्ता मिळवली. त्यात विघ्न आणण्याचे काम सुरू झाले आहे. मी काय करू? तुम्हीच सांगा आता’ अशी आळवणी केल्यावर अचानक त्यांच्या बंद डोळ्यांसमोर यशवंतरावांची आकृती दिसू लागली. आजवर इतक्यांदा या खोलीत बसलो पण कधीच यशवंतराव असे सामोरे आले नाहीत.
आज आले म्हणजेच आपली तपश्चर्या फळाला आली. किमान आता तरी ते लवकर अंतर्धान पावू नये म्हणून त्यांनी डोळे गच्च मिटले. ‘हे बघा, तुमची वेदना मला समजली पण हे तुमच्याच बाबतीत वारंवार का घडते याचा विचार केला का कधी तुम्ही? इतकी वर्षे तुम्ही काकांसोबत घालवली. त्यांच्यातला राजकारण करण्याचा गुण तुम्ही बरोबर आत्मसात केला पण मोजून मापून बोलण्याचा व योग्य भाषा वापरण्याचा गुण का नाही घेतला? पंपावर पेट्रोल हे टाकले अथवा भरले जाते. सोडणे हा शब्द कुठून आणला तुम्ही? पंपावरचा माणूस पेट्रोल काय पकडून ठेवतो काय, सोडायला? तुम्ही भरले म्हटले असते तर तुमचा शब्द ‘चोरण्याची’ हिंमतच झाली नसती कुणाची. संकल्प सोडला जातो, पेट्रोल नाही. हे टाळायचे असेल तर तुम्ही वाचन वाढवा. काका किती वाचतात ठाऊक आहे ना तुम्हाला. आता तुम्ही ज्यांच्या संगतीत गेला आहात त्यांचे वाचन ‘स्वामी’, ‘छावा’, ‘श्रीमान योगी’ पुरते मर्यादित. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता काका काय वाचतात याची माहिती मिळवा व तसे वाचन करा. आपसूकच तुम्हाला चांगले व योग्य शब्द सुचतील. ‘आकडेमोड’ करण्यात वेळ घालवण्यापेक्षा हे केव्हाही चांगले.’ यावर दादा म्हणाले. ‘तुमचे म्हणणे योग्यच, पण वाचायला वेळच मिळत नाही. सामान्यांशी थेट जोडले जावे म्हणून गावठी भाषा वापरतो.
थोडे रांगडेपणाने बोललो की लोकांनाही ते आवडते व स्पष्टवक्तेपणसुद्धा दिसते.’ हे ऐकून यशवंतराव हसत म्हणाले ‘चूक. चांगली भाषा व शब्द वापरूनही स्पष्टवक्तेपण टिकवता येते. आजवर याच रांगडेपणामुळे तुम्ही किती वेळा अडचणीत आलात? विचार करा जरा. आणि वारंवार राजकारण सोडेन अशी धमकी कशाला देता. राजकारण ही तुमची गरज आहे. लोकांची नाही. नेहमी ‘सोडेन, सोडले’ असे शब्द वापरत राहाल तर हास्याचे धनी व्हाल. त्या बाबासाहेब भोसले वा राजनारायणसारखे. आजकाल संगमावर खूप लोक येतात पण मी कुणालाच सल्ला देत नाही. तुम्हाला दिलेला हा पहिला व शेवटचा सल्ला’ असे म्हणत यशवंतरावांचा चेहरा लुप्त होताच दादांनी डोळे उघडले. खोलीतून बाहेर आल्यावर आता वाचायचे काय यावर त्यांनी भरपूर विचार केला पण त्यांना काकांच्या ‘लोक माझे सांगाती’ याशिवाय दुसऱ्या एकाही पुस्तकाचे नाव आठवेना!