उद्धव ठाकरे – आता काहीही झाले तरी त्या नकली सेनेला ठेचण्याची संधी सोडायची नाही म्हणजे नाही. नव्या संख्याबळामुळे चांगलीच खिंडीत सापडली आहे ती मिंध्यांची सेना. आता दाखवतोच ठाकरे काय चीज आहे ते. महापौरपदाबाबत ‘देवाची इच्छा’ काही उगीच मनात आणली नाही मी. टोमण्यावर नियंत्रण ठेवत वर्मी बसेल असा बाण सोडला. ‘देवाभाऊ’ म्हटले असते तर ते थेट संकेत देणारे ठरले असते. देवाच्या मनात म्हटल्याने जायचा तो संदेश बरोबर गेला. होऊ देत की भाऊंचा महापौर. यानिमित्ताने २०१७ ची परतफेड तरी करता येईल पण त्या नकली सेनेला कुठलेही पद नको म्हणजे नको. ते दिले नाही तर चरफडण्याशिवाय पर्याय तरी काय आहे त्या पक्षाकडे.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागेल. बदला म्हणतात तो हाच. आता या चाली रचताना ‘त्या थोरल्या साहेबांचे काहीही ऐकायचे नाही. फोनही घ्यायचा नाही. ते करणारही नाहीत. तेही घरातल्या गुंत्यात अडकलेले. या चाली बिघडू नयेत म्हणून त्या संजयलाही सांगून ठेवायला हवे. नको ते बोलू नको म्हणून. काहीवेळा वाचाळपणाने नुकसानही होते. एकदा का ‘देवाच्या मनातले’ जुळून आले की आपला वनवास संपला. अस्सल चीज हाताशी लागल्यावर देवही त्या भेसळयुक्त कंपूच्या नादी कशाला लागेल? शेवटी आपणही सिद्ध केलेच की काहीही नसताना ६५ जणांना निवडून आणून. आता सूर जुळत असतील ते जुळवून घ्यायचेच. तसाही आघाडीत काही राम उरलेला नाही. ज्यांच्या खांद्यावर डोलारा उभा होता तेच पुतण्याला शरण जाताना दिसताहेत. मग आपणच फटफजिती का करून घ्यायची? आतून असो वा बाहेरून सत्तेत राहिलो तर नगरसेवकही खूश राहतील. मुख्य म्हणजे मिंध्यांचे पार बारा वाजतील. अल्पजिवी लेकाचे. (जोरात हसतात)

देवेंद्र फडणवीस – आता देवाचा धावा करायला लागले म्हणजे उपरती झालेली दिसते या ब्रँडला. मीही सर्टिफाईड नागपूरकर आहे. दिले उत्तर लगेच. वरचा देव काहीही म्हणो, या देवाच्या मनात जे असेल तेच होईल ना! टोमणे सोडून अशी भक्तीची करत आहेत म्हणजे यांना कळलेच असेल आमचा पक्ष काय चीज आहे ते. आता येत असतील पंखाखाली तर घ्यायचे. असली व नकलीचा प्रश्न आपसूकच निकालात निघेल. तसेही सोबतचे नकली फारच उसने अवसान आणू लागलेत अलीकडे. त्यांनाही झटका मिळेल. एका दगडात दोन पक्षी. आपल्या पक्षाला काँग्रेसची भीती नव्हतीच कधी. होती ती प्रादेशिक पक्षांचीच. तेच शरण येत असतील तर हात पुढे करायला काय हरकत आहे? हे घडले तर तो रोज सकाळचा भोंगा बंद होईल. त्यामुळे रिकामे झालेल्या प्रवक्त्यांना दुसरी कामे देता येतील.

शत्रूला पार शक्तिहीन करून टाकायचे व मगच जवळ घ्यायचे हीच चाणक्यनीती. ती राबवण्याची वेळ आता आली आहे. सोबतचे नकली दिल्लीच्या बळावर उड्या मारत आहेत, पण मारून मारून जातील कुठे? पर्यायच नाही त्यांच्याजवळ. सारा देश पक्षमय करायचा असेल तर अशी पावले उचलावीच लागतात. तसेही दोन्ही भाऊ एकत्र येण्याचे श्रेय राजने मला जाहीरपणे दिलेच होते. आता प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे महायुतीत आले तर दोघेही मलाच श्रेय देतील. २०१७ला जे औदार्य आपण दाखवले त्याची परतफेड होत असेल तर ‘याठिकाणी’ ते योग्यच. आव्हान देणारे एकेक करून संपवायचे हेच तर आपल्या पक्षाचे ध्येय. त्या दुसऱ्या पक्षाचे काय ते नंतर ठरवता येईल. शेवटी काय तेही आपणच जन्माला घातलेले अपत्य. त्याचा सांभाळ करायचा की दत्तक द्यायचे ते ठरवू नंतर. सत्ता हाती असली की सारेच साध्य होते हेच खरे! (मंद स्मित करतात)