आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी निवडणुकीच्या काळात महागडी वाहने व घडय़ाळे वापरू नका. साध्या राहणीचा अंगीकार करा, असे आवाहन मुंबईत केले. त्यावरून राज्यभरातील नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे. हा संभ्रम दूर होण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना येथे देत आहोत.

१) तुमचे महागडे वाहन शक्यतो नातेवाईकाकडे अथवा घराच्या मागे गॅरेज असेल तर तिथे झाकून ठेवा. दौरे करताना एखाद्या कार्यकर्त्यांकडे नॅनो किंवा तत्सम वाहन असेल तर त्याचा वापर करा.

pankaja munde
“वर्गणी काढून मला घर बांधून द्या, मी मरेपर्यंत…”, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
archana patil dharashiv ncp candidate
राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणतात, “मी कशाला पक्षाचं वर्चस्व वाढवू?” तीन दिवसांपूर्वीच पक्षप्रवेश केलेल्या अर्चना पाटील यांचं विधान चर्चेत!
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम
Do not participate in party campaign without consent confusion due Vanchits new Instructions
… तोपर्यंत मित्र पक्षाच्या प्रचारात सहभागी होऊ नका, वंचितच्या फतव्याने संभ्रम

२) छोटय़ा वाहनांचा वेग मर्यादित असतो, तेव्हा लांब जायचे असेल तर महागडे वाहन वापरायला हरकत नाही. अशा वाहनाचे टायर घासून गुळगुळीत झालेले असतील तर उत्तमच. वाहनावर ठिकठिकाणी ओरखडे दिसावेत अशी व्यवस्था करा. जुने, म्हणजेच सेकंडहँड वाहन आहे असा आभास निर्माण करा. आतल्या सीट फाटलेल्या हव्यात. वाहनाची बाहेरील बाजू चेपलेली दिसावी यासाठी किरकोळ तोडफोड केली तरी हरकत नाही. ३) जनसंपर्कादरम्यान सूटबुटाचा पेहराव अजिबात नको. शक्यतो जुने, भरभराटीपूर्वीचे कपडे वापरा. पँटसुद्धा मळलेली असावी. आजकाल फाटकी जीन्स सहज मिळते. तिचा शोध घ्या. शहरात काही नाक्यांवर असे कपडे सहज मिळतात.

४) एकाच दिवशी लांब अंतरावरच्या तीन-चार सभा घ्यायच्या असतील तर पक्ष हेलिकॉप्टर देईल पण त्यातून प्रवास करतानासुद्धा तुमचा वेश बावळा हवा. तो इतकाही नको की तुम्हाला पायलटही ओळखणार नाही. हवाई प्रवासातील छायाचित्रे समाजमाध्यमावर टाकू नका.

५) खानपानाची व्यवस्था साधीच असायला हवी. पिठलं, भाकरी व ठेचा आणि पिण्याच्या पाण्याची जुनी बाटली सोबत ठेवा. ठेचा जास्त खाऊ नका.

६) कार्यकर्त्यांच्या हाती महागडी घडय़ाळे विश्वगुरूंना आवडत नाहीत. यासंदर्भातला जावडेकरांचा किस्सा आठवत असेलच. त्यामुळे या काळात ही घडय़ाळे अलमारीत ठेवा व चोरबाजारात शंभर रुपयांत मिळणारी घडय़ाळे विकत घ्या. त्यात वेळ बघताना मुद्दाम त्यावर हाताने ठोका म्हणजे घडय़ाळ साधे आहे हे लोकांना कळेल.

७) कपडे जुने पण बूट महागडे असे विरोधाभासी चित्र दिसू नये. त्यामुळे ममतादीदी वापरतात तशा हवाई चप्पल वापरा. त्या कधीही तुटू शकतात म्हणून एक जास्तीचा जोड कायम सोबत ठेवा.

८) मुक्काम करायची वेळ आलीच तर महागडय़ा हॉटेलऐवजी धर्मशाळेचा आसरा घ्या. आपल्या परंपरावादी भूमिकेला ते साजेसे असेल. धर्मशाळा नसल्यास गरीब कार्यकर्त्यांचे घर गाठा. तिथेही शक्यतो चटईवर झोपा. या अवघड झोपण्याचा सराव घरीच करून घ्या म्हणजे त्रास होणार नाही.

९) या साध्या राहणीचा अंगीकार केल्यावर ‘यांच्याकडे तर काहीच नाही तेव्हा हे काय देणार आपल्याला’ असा मतदारांचा समज अजिबात व्हायला नको. त्यासाठी आवश्यक असलेले वाक् चातुर्य शिकून घ्या व विश्वगुरूंचा उल्लेख सतत करत राहा.