‘मॅडम, पक्षाच्या मुख्यालयातून महासचिवांचा फोन…’ असे सांगत साहाय्यकाने भ्रमणध्वनी हातात देताच कंगना मॅडमचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्यांनी फोन कानाला लावला. ‘ये देखो, मैं अब कुछ भी सुनने के मूड मे नहीं हूं! काय चालवलेय काय तुम्ही? अरे, तुमच्या प्रचारमोहिमेचा भाग म्हणून मी हा सिनेमा करायला घेतला. जवळ पुरेसे पैसे नव्हते तर स्वत:चे घर गहाण ठेवले. त्या महाविकास आघाडीच्या काळात त्याची तोडफोड झाल्याने गहाणखत करूनसुद्धा हवे तेवढे पैसे मिळाले नाहीत. मग उधारउसनवारी करून सिनेमा पूर्ण केला. कारण काय तर इंदिराजींची आणीबाणी आजच्या पिढीला कळावी म्हणून. म्हणजे यात राजकीय फायदा तुमचाच. तरीही माझा सिनेमा रखडवला जातो? त्याला प्रमाणपत्र दिले जात नाही? ही अघोषित आणीबाणी नाही तर आणखी काय?’

पलीकडून आवाज येतो ‘मॅडम, सुनो तो’ त्याला मध्येच थांबवत मॅडम पुन्हा चिडून बोलू लागतात ‘पहले, मेरी सुनो. मला तर मारे सांगत होतात, देशातली सर्व व्यवस्था आपल्या ताब्यात आहे म्हणून. मग कुणीतरी उठतो व न्यायासाठी दाद मागण्याची प्रचारकी खेळी करतो त्याला एवढे एंटरटेन केलेच कसे जाते? सिनेमा बघायच्या आधीच हे लोक बोंबलायला लागलेत. हे तेच लोक आहेत ज्यांनी आणीबाणीच्या काळात ‘किस्सा कुर्सी का’ची रिळे जाळून टाकली. ‘आंधी’च्या प्रदर्शनात खोडा घातला. हे तुम्हाला कळत नाही काय? तरीही तुमचे बोर्ड अजून प्रमाणपत्र दिलेच नाही असे सांगते. आम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूने असे म्हणत प्रमाणपत्र देणार असे ठणकावून सांगत का नाही? अशा आणीबाणीच्या वेळी माझ्या पाठीशी उभे राहायचे सोडून चालढकल का केली जाते? तुमच्यासाठी मी साऱ्या इंडस्ट्रीशी पंगा घेतला. देश २०१४ ला स्वतंत्र झाला अशी नवी व्याख्या रुजवली. त्या विक्रमादित्याचा पराभव केला. तुमच्यासाठी मी विमानतळावर मार खाल्ला. शेतकऱ्यांचे आंदोलन ‘फेक’ होते असे ‘नरेटिव्ह’ सेट केले. तुमची तळी उचलताना झाली असेल एखादी चूक माझ्याकडून. म्हणून काय त्याची अशी शिक्षा द्यायची? कंगनाचा सिनेमा, त्याला कोण अडवणार असा समज सर्वत्र असताना त्याला तडा देण्याचे काम तुम्हीच करता? आमच्या इंडस्ट्रीत प्रदर्शनाची तारीख जाहीर करून त्या वेळी सिनेमा प्रदर्शित न होणे हे लाजिरवाणे समजले जाते. तीच वेळ तुम्ही माझ्यावर आणली. विचारांच्या प्रसारासाठी झोकून देणाऱ्या एखाद्या कलाकाराचा, लोकप्रतिनिधीचा असा अपमान तुम्ही कसा काय करू शकता? आजकाल कोर्टबाजीसुद्धा खूप महागली. त्यासाठी कुठून पैसा आणू? जबलपूर, मुंबईच्या फेऱ्या किती काळ करत बसू? आता विरोधक सिनेमा डब्यात जाणार असे कारण देत चेष्टेने माझे घर विकायच्या जाहिराती समाजमाध्यमावर करू लागले आहेत. त्यांना काय उत्तर देऊ? ते काही नाही, मला प्रमाणपत्र पाहिजे म्हणजे पाहिजे’ असे म्हणत कंगना मॅडमनी थोडा मोकळा श्वास घेतला.

तीच संधी साधून पलीकडचा म्हणाला ‘मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी भाजपचा नाहीतर काँग्रेसचा महासचिव बोलतोय. तुमची अडवणूक बघून सांत्वन करण्यासाठी व कंटाळल्या असाल तर येता का आमच्या पक्षात हे विचारण्यासाठी फोन केला होता’ हे ऐकताच मॅडम क्षणकाळ सुन्न झाल्या. तातडीने फोन कट केल्यावर त्यांच्या मनात आले ‘या ऑफरवर विचार करायला काय हरकत आहे?’