‘दादा, आपल्या जनसन्मान यात्रेचा पहिला टप्पा अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाला. तुमचे माफी मागणे, चूक कबूल करणे सामान्यांना खूप भावले. पुढच्या टप्प्यात या माफीवरच भर देणे योग्य.’ यात्रा सूत्रधाराचे हे म्हणणे ऐकताच दादांचा चेहरा त्रासिक झाला पण सत्तेचे फायदे आठवताच ते लगेच सावरत म्हणाले, ‘म्हणजे प्रत्येक टप्प्यात कांद्यासाठी माफी, बहिणीच्या विरुद्ध सुनेत्रा ही चूक असेच वारंवार म्हणायचे का? हे अतिच होईल. एकतर माझा स्वभाव तसा नाही. त्याला मुरड घालून मी हे करतोय. एखाद्या सभेत मूळ स्वभाव उफाळून आला आणि कितीदा माफी मागायची असे बोलून गेलो तर पंचाईत व्हायची.’ हे ऐकताच सूत्रधार म्हणाला, ‘तसे नाही दादा, प्रत्येक वेळी तुम्ही नवा मुद्दा घेत चुकलो, असे करायला, वागायला नको होते. ते माझे वक्तव्य योग्य नव्हते. त्या कृतीचा आता मला पश्चात्ताप होतो. ‘त्या’ चुकीसाठी मी प्रायश्चित्त घ्यायला तयार, असे वेगवेगळे शब्द व वाक्ये वापरून स्वत:विषयी सहानुभूती निर्माण करायची. एकूणच काय तर सध्या थोरल्या साहेबांकडे वळलेली सहानुभूती स्वत:कडे वळवायची. प्राप्त परिस्थितीत हा एकमेव मार्ग शिल्लक उरला आहे.’
हे ऐकताच दादांनी कपाळावरून रुमाल फिरवला. ‘अरे, पण प्रत्येक वेळी माफी, चूक व कबुली द्यायला नवे मुद्दे तर हवेत ना! मी काय इतक्या चुका केल्यात का की राज्यभरातील सभांसाठी त्या पुरतील?’ हे ऐकून सूत्रधार चाचरत म्हणाला, ‘हो’. हा शब्द ऐकताच दादा खुर्चीतून उठले व दालनात येरझाऱ्या घालू लागले. त्यांच्या मुठी आवळल्यात हे लक्षात येताच जमलेल्या विश्वासूंच्या मनात भीतीची एक लहर दौडून गेली. सारा धीर एकवटून सूत्रधार म्हणाला, ‘माझा उद्देश तो नव्हता दादा, पण तुम्हाला जे योग्य वाटते ते लोकांना चूक वाटू शकते. आपल्या यात्रेतच ‘जन’ असल्याने त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करत प्रतिमासंवर्धनासाठी प्रायश्चित्त घेत पुढे जायचे हाच आपला हेतू. एकदा सत्ता आली की मग पाच वर्षे अजिबात माफी मागू नका. आणखी ठसक्यात बोला. आता हे करताना मात्र माफी हा वैश्विक विचाराचा आविष्कार आहे. अनेक थोरामोठ्यांनी ती मागितलेली हे मनात ठेवा. तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही.’ हे ऐकून दादा मुठी सैल करत पुन्हा बसले. ‘लोकांना दुखावणारी वक्तव्ये व कृती मी कुठेकुठे केली हे आता आठवत नाही. तुम्हीच ती शोधा व माझ्या भाषणात समाविष्ट करा आणि प्रत्येक वेळी ‘माफी’ हा शब्द नको अन्यथा विरोधक मलाच माफीवीर म्हणून चिडवायचे. चुकीची कबुली देणारी नवनवी वाक्ये शोधा.’
हे ऐकताच दीर्घ श्वास घेत सूत्रधार म्हणाला, ‘काळजी नको दादा, शेतकऱ्यांसाठी धरणाचा, विद्यार्थ्यांसाठी पीएचडीचा, विदर्भासाठी निधी पळवल्याचा असे अनेक विषय आहेत.’ हे ऐकून दादा पुन्हा भडकले. ‘अरे, यावर अनेकदा माफी मागून झाली आहे. किती लाचार कराल तुम्ही मला. उद्या पक्ष फोडला म्हणून तुम्ही थोरल्या साहेबांचीही माफी मागायला लावाल तर लोक आपल्याला मते तरी कशाला देतील? आणि यात्रेलाही माफीयात्रा म्हणून हिणवतील.’ हे ऐकून सूत्रधारासकट साऱ्यांचीच बोलती बंद झाली. मग साऱ्यांकडे रागाने बघत दादा शयनकक्षात निघून गेले.