चलो सावनेर, चलो चलो सावनेर! राज्यातील तमाम मद्याप्रेमी बंधूंनो, लाडक्या बहिणींमुळेच आपण सत्तेत आलो या ‘गैर’समजात वावरणाऱ्या महायुतीचा बुरखा फाडण्याची वेळ आली आहे. जे घडेल याची भीती होती ते शेवटी घडले व सरकारने दारूच्या किमतीत अवाच्या सवा वाढ करून खिशाला झटका दिला. शासकीय लाभासाठी राज्यातले सारेच घटक संघटित होत असताना आपणच का मागे राहायचे म्हणून ही सभा सावनेरला आयोजित करण्यात आली आहे. सावनेरच का याचे उत्तर ‘संगीत एकच प्याला’ या ऐतिहासिक नाटकाच्या निर्मितीत दडले आहे.

राम गणेश गडकरींनी याच गावात बसून हे नाटक लिहिले. त्यातल्या तळीरामाने ‘आर्य मदिरा मंडळ’ स्थापन केले. तेच मंडळ आता पुनरुज्जीवित करून सरकारला जेरीस आणण्याचा निर्धार गडकरींच्या ऐतिहासिक निवासस्थानासमोर ‘बसून’ आपल्याला करायचा आहे. इतिहास उकरून काढण्याची सवय असलेल्या सरकारसमोर त्याच माध्यमातून आव्हान उभे करण्याचा हा प्रयत्न आहे. अजूनही समाजात मद्यापींविषयी बरे बोलले जात नाही. त्यामुळे बहुसंख्य लोक लपून ‘घोट’ घेतात. याच असंघटितपणाचा फायदा घेत सरकारने आपली लूट चालवली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने आधुनिक तळीरामाच्या भूमिकेत शिरण्याची गरज आहे. ज्या बहिणींचे नाव समोर करून आपल्या खिशावर दरोडा घालण्याचा निर्णय सरकारने घेतला त्यांची मते मिळावीत म्हणून पाच वर्षे त्यांना पंधराशे रुपये प्रतिमाह देणार आणि मतदानाच्या एक दिवस आधी पाचशे, हजार अथवा तेवढ्याचीच एक बाटली देऊन आपलीही मते मिळवणार. मित्रांनो, तुम्हीच सांगा यातली स्वस्त व ‘परवडेबल’ योजना कोणती? मतदानाच्या आधी जशी आपली ‘सोय’ बघितली जाते तशी बहिणींचीही बघावी. घरखर्चासाठी त्यांना तेव्हा पैसे दिले तरी त्यांची मते मिळतील. हा सोपा मार्ग सोडून एका मतासाठी पाच वर्षे त्यांना पैसे देण्याचे कारणच काय? ‘टेबलावर’ बसल्यावर सहज सुचणारा हा युक्तिवाद सरकारला सुचत नसेल तर यांच्या सत्तेत राहण्याला अर्थ काय? जनकल्याणकारी योजना राबवताना स्त्री-पुरुष असा भेदभाव करू नये या साध्या तत्त्वाचा विसर सरकारला पडला आहे. सरकारने लाडक्या बहिणींना मदत देता यावी म्हणून भरपूर दारू प्या, जास्त घेणाऱ्याला घरी सोडण्याची व्यवस्था सरकार करेल, कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मद्याप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांना पोलिसांचा ‘एस्कॉर्ट’ दिला जाईल, कुठे भांडण झालेच तर गुन्हे दाखल न करता पोलीस मध्यस्थी करतील, डुलत जाणाऱ्यांच्या गळ्यात हार घालून त्यांना ससन्मान घरी पोहोचवले जाईल अशा प्रोत्साहनपर योजना जाहीर केल्या असत्या तर राज्यात सहज १४ हजार कोटींचा अतिरिक्त महसूल गोळा झाला असता. मात्र भाववाढ करून सरकारने समस्त मद्याप्रेमींच्या जिभेवरच मीठ चोळले आहे. आता ताकद दाखवून देण्याशिवाय पर्याय नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हणून येत्या रविवारी सायंकाळी सर्वांनी गडकरींच्या घरासमोर जमायचे आहे. येताना बाटली घेऊन आलात तरी चालेल. सुरुवातीला ‘एकच प्याला’ या नाट्यसंहितेचे पूजन करून त्यात तळीरामाने नमूद केलेले दारूचे फायदे वाचून दाखवले जातील. त्यानंतर नशेचा अंमल चढू लागताच सरकारविरुद्धच्या आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यात येईल. तेव्हा भावांनो, हा मॅसेज सर्वांना फारवर्ड करा व या सावनेरला. भेटूच तिथे!