सूचनापत्र क्रमांक एक – सध्याची राजकीय साठमारीची परिस्थिती व मराठवाड्यात घडलेला प्रकार बघता सर्व मनसैनिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी राज साहेबांचा दौरा यशस्वी करण्यासाठी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. ‘साहेब तुमच्या भागात येण्याच्या आठ दिवस आधीपासूनच सुपारी विक्रेत्यांवर कडक नजर ठेवावी. कुणी घाऊक सुपारी घेण्यास आला तर त्याला विक्री करायची नाही अशी तंबी या सर्वांना द्यावी. सुपारीचे गोदाम किती? वाहतूक करणारे कोण? याची यादी तयार करून ‘तुमच्यावर लक्ष आहे’ असे बजवावे. साहेबांचा दौरा आटोपेपर्यंत सुपारी फोडण्याचे काम कामगारांना देऊ नये, असा दम घाऊक विक्रेत्यांना भरावा. पानठेले व टपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात सुपारी उपलब्ध असते. ती किलोच्या प्रमाणात कोणी घेणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून पाळत ठेवावी.

कुणी अरेरावी केली तर ‘खळ्ळखट्ट्याक’ कार्यक्रम करावा. सत्ताधारी सोबत असल्यामुळे कारवाई झाली तरी काळजी करू नये. श्रावण सुरू असल्याने घरोघरी पूजाअर्चा सुरू आहेत. यातील सुपारी पुजारी घेऊन जातात. त्यामुळे त्यांची यादी तयार करून सर्वांशी प्रत्यक्ष बोलावे व दौरा संपल्यावरच सुपारीची विल्हेवाट लावावी, असे निर्देश द्यावेत. साहेब ज्या हॉटेलला थांबतील तिथे व ज्यांच्या घरी चहापानासाठी जातील तिथे सुपारीचे तबक दिसणार नाही याची कसोशीने काळजी घ्यावी. स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत गनिम असू शकतो. शक्यतो पान व मावा खाणाऱ्यांना त्यांच्याजवळ फिरकू देऊ नये. याउपरही कुणी सुपारी फेकण्याचा प्रयत्न केलाच तर अडकित्त्यासारखे त्याच्यावर तुटून पडावे व खांड न करता खांडोळी करून सोडावे.’

सूचनापत्र क्रमांक दोन – ‘येत्या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धवसाहेब राज्यभर दौरा करणार आहेत. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिवसैनिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. ‘दौरा सुरू होण्याच्या २४ तास आधी शहरात गुरांचे गोठे किती? त्यात जमा होणाऱ्या शेणाची विल्हेवाट कशी लावली जाते याची माहिती गोळा करावी. कुणी घाऊक पद्धतीने शेण गोळा करण्याचा प्रयत्न करताना दिसला तर त्याला तिथेच चोप देत त्याच शेणाने माखावे. साहेब ज्या रस्त्याने जाणार आहेत, त्याच्या आजूबाजूला चरणारी गुरे हाकलून लावावी. सभा ज्या मैदानावर आहे तिथे शेण दिसायला नको. मैदानाच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी शेणाची विक्री करू नये अशी तंबी ‘सेनास्टाइल’ने द्यावी. नुकसानीची भाषा केल्यास स्वत: शेण विकत घ्यावे व ते शहराबाहेर फेकावे.

श्रावण असल्याने नारळाची खरेदी विक्री वाढली आहे. कुणी पोत्याने नारळ खरेदी करताना दिसले तर ओळख पटवावी. मंदिरात जमा होणाऱ्या नारळांची ठोक विक्री करायची नाही अशी तंबी द्यावी. एवढे करूनही कुणी नारळ फेकण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला पकडून त्याच्याच डोक्यावर ते फोडावेत. सत्ता आली की सर्व खटले मागे घेतले जातील. या काळात श्रावणीसाठी शेण वापरणाऱ्यांना मात्र अजिबात त्रास देऊ नये. तसे केले तर हिंदुत्वाच्या मुद्द्याची अडचण होईल हे लक्षात ठेवावे.’