प्रचारातील व्यग्रतेमुळे वेळच मिळत नसल्याने अस्ताव्यस्त वाढलेल्या दाढीला आकार देण्याची संधी मिळताच नीलेशभाऊ मालवणातील एका केशकर्तनालयात शिरले तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. ग्राहक नाहीत व सर्व कारागीर निघून गेल्याने एकटाच असलेला मालक आपल्याच भाषणाचा व्हिडीओ पाहतोय हे बघून भाऊ थोडे सुखावले. खुर्चीत बसल्यावर त्यांनी दाढीकडे बोट दाखवताच मालक हसला व म्हणाला ‘भाऊ, राग येणार नसेल तर एक विचारू का’ त्यांनी मानेनेच हो म्हणताच तो म्हणाला, ‘तुम्ही दाढी ठेवताच कशाला?’ हे ऐकताच ते रागाने त्याच्याकडे बघू लागले. मग स्वत:ला आवरत हसत म्हणाले, ‘बोल, काय ते’ हे ऐकताच अवजारे हातात घेत सलूनवाल्याची टकळी सुरू झाली. ‘आता मी तुमचेच भाषण ऐकत होतो. दाढी पिकली तरी मंत्री झालो नाही या आशयाचे. तुम्ही म्हणाल तर मी दाढीला आणखी चांगली करून देतो. कट वगैरे मारून व्यवस्थित साइजमध्ये आणतो, पण निवडणुकीत यश मिळवून मंत्री व्हायचे असेल तर ही दाढी तुम्ही न ठेवणेच चांगले. माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून सांगतो. वाढलेल्या दाढीची माणसे ज्येष्ठांच्या कॅटेगिरीतली म्हणून ओळखली जातात. साहेबांचा मुलगा हीच ओळख तुम्हाला मंत्रीपद मिळवून देऊ शकते. मुलगा हा केव्हाही लहान म्हणूनच ओळखला जातो. दाढी व त्यातल्या त्यात पिकलेली असेल तर तुमच्याकडे वयस्क म्हणूनच बघितले जाते. तुम्ही भाषणात ज्या नेतापुत्रांचा उल्लेख केला त्यांचे चेहरे बघितले का? ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, अमित देशमुख, विश्वजीत कदम यापैकी कुणीही दाढी ठेवण्याच्या भानगडीत पडले नाही. अमितच्या भावांनी दाढी वाढवली पण त्यांनी नाही. मध्ये विश्वजीत यांनीही दाढी वाढवली होती, पण नंतर त्यांना काय साक्षात्कार झाला कुणास ठाऊक, पण काढून टाकली. त्यामुळे ते कायम ‘चिकने’ दिसतात. हीच खरी नेतापुत्र असल्याची ओळख.

दाढी वाढवून तीच तुम्ही घालवून बसलात. आता उशिरा का होईना पण तुम्हाला आमदार होण्याची संधी मिळाली आहेच तर सर्वप्रथम दाढी काढा. मग बघा कसा तुमचा भाग्योदय होतो ते. तुमचे लहान बंधू बघा. (हे ऐकताच भाऊ रागाने बघतात) दाढी ठेवत नसल्याने अजूनही कसे ‘लहान’ वाटतात. सध्या ते स्टार प्रचारक नसले तरी त्यांचाच सर्वाधिक बोलबाला आहे. तेव्हा तुम्हीही हा ‘केशसंभार’ काढून टाका. मग बघा कसे भराभर पुढे जाता ते. नेतापुत्रांच्या स्पर्धेत राहायचे असेल तर हे करणे आवश्यक. अर्थात दाढी काळी करणे हासुद्धा एक पर्याय आहे, पण अशी दाढी असलेल्या व्यक्तीकडे लोक ‘चांगल्या’ नजरेने बघत नाहीत. अनेकदा खलनायक ठरवतात. त्यामुळे ती जोखीम तुम्ही घ्यायला नकोच. खरे तर तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा लोकसभेत संधी मिळाली तेव्हा हे सारे नेतापुत्र ‘बच्चे कंपनी’त गणले जात होते. नंतर ते पुढे गेले व तुम्ही मागे राहिले. हा अन्यायच. मात्र यासाठी दाढीला दोष देऊन काय फायदा? त्यापेक्षा ती उडवूनच टाका. ऐन प्रचारात का काढली म्हणनू काही खवचट कोकणी लोक बोलतील काहीबाही, पण लक्ष नका देऊ तिकडे. उलट मते वाढतील तुमची. सांगा काय करू’ हे ऐकून क्षणभर विचारात पडलेले भाऊ म्हणाले ‘काढ’. मग काय त्याने पाच मिनिटात गिऱ्हाईक मोकळे केले. भाऊ तिथून जाताच शटर बंद करत तो गुणगुणू लागला, ‘पिकल्या दाढीचा केस की हो हिरवा’.

Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
Loksatta anvyarth Judgment led by Chief Justice Dr Dhananjay Chandrachud regarding privately owned land
अन्वयार्थ: ‘हिताचा’ निकाल…
loksatta readers feedback
लोकमानस: उतावीळपणा पुन्हा अंगलट!
Story img Loader