मी इथे आलो आहे आज

हेच सांगायला की राखा तुम्ही माझी लाज

तुमच्या राजकारणात तुम्ही केला माझा मासा

मला एकदा सांगा,

मी माझा पक्ष सांभाळणार कसा

दिल्या असत्या दोन-चार सिटा

तर काय होणार होते

किती काळ सांभाळायचे मी

बिनपदांचे पोते

सगळेच आता ओळखू लागले

माझ्या राजकारणाचा बाज

हेच सांगायला आलो की

राखा तुम्ही माझी लाज

राजकारण सोपे नाही

इथे प्रतिभा हवी

तुम्हाला तर ठाऊकच

मी आहे शीघ्र कवी

संसदेत साऱ्यांना हसवतो

हसतात खुद्द पंतप्रधान

मग द्यायला काय हरकत

चार- दोन सिटांचे दान

आता काय म्हणतील माझी माणसं

निश्चित होतील माझ्यावर नाराज

हेच सांगायला आलो की

राखा तुम्हीच माझी लाज

माझीच आता राज्यसभेची

संपत आली आहे मुदत

पुन्हा दिल्लीत टिकण्यासाठी

तुमचीच लागणार आहे मदत

तेव्हाच अर्थ माझ्या कवितेला

तरच टिकेल माझं मंत्रीपद

तरच टिकून राहतील माझी माणसं

टिकून राहील त्यांची रसद

मंत्रीपद हाती तर

शोभून दिसतो सारा साज

हेच सांगायला आलो की

राखा तुम्ही माझी लाज

आता तोंड दाखवायला,

जागा नाही राहिली

याच विचाराने जिवाची,

होतेय माझ्या काहिली

राजकारणात कोणीही,

येत नाही कामा

तुम्ही केली खेळी,

पण झाला माझा मामा

राग आला तरीही,

नाही मी नाराज

हेच सांगायला आलो की

राखा तुम्ही माझी लाज