रात्री उशिरा मुंबईहून परतल्यामुळे सकाळी अंमळ उशिराच उठलेल्या गुलाबरावांनी दिवाणखान्यात प्रवेश केला तर समोर जळगावातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील शिवसैनिक थरथरत उभे. पाटलांनी खुणेनेच त्यांना काय झाले म्हणून विचारताच त्यातले दोघे धाय मोकलून रडू लागले. त्यांच्यातला तिसरा म्हणाला, ‘‘साहेब काहीही करा पण कार्यालयाची जागा बदला. तिथे भूत आहे. ठाकरे गटाच्या लोकांनी काही मोडतोड करू नये म्हणून आम्ही रोज तिथेच झोपतो. रात्री उशिरा कक्षाची दारे अचानक धाडधाड वाजू लागतात. वारा नसतानासुद्धा मध्येच छमछम असा आवाज येतो. कधी किंकाळी ऐकू येते. कदाचित विरुद्ध गटाने केलेली ही करणी असेल म्हणून आम्ही खूप आधी हाताला बांधलेले शिवबंधनही तोडले पण हा प्रकार काही थांबायला तयार नाही.’’ हे ऐकताच गुलाबरावांची नजर स्वत:च्या हातावर गेली.
बांधलेल्या अनेक गंडेदोऱ्यांत शिवबंधन नाही हे बघून त्यांना हायसे वाटले. मग चौथा म्हणाला, ‘‘तुम्ही त्या दिवशी भाषणात म्हणालात, तिथे काही भूत वगैरे नाही. नि:शंक मनाने कार्यालयात या. या आवाहनानंतर कार्यकर्त्यांची वर्दळ सुरू झाली, पण मग दिवसाही असेच घडू लागले. एक कार्यकर्ता तर कुणीतरी माझा गळा आवळतोय असे ओरडून बेशुद्ध पडला. आम्ही लगेच त्या चॅनलवाल्याला बोलावले ज्याने आधीची भूतबातमी केली होती, पण त्याने येण्यास नकार दिला. कारण विचारले तर डॉ. नारळीकर गेल्याच्या दिवशीच अशी बातमी का केली म्हणून चॅनलकडून शो कॉज मिळाल्याचे त्याने सांगितले.’’ हे ऐकून गुलाबराव विचारात पडले.
कुणालाही न घाबरणारा आपला पक्ष व त्यातले सैनिक भुताला घाबरतात असा संदेश सर्वत्र गेला तर आणखी हसे होईल. त्यापेक्षा आपणच रोज कार्यालयात जाऊन बसायचे असे ठरवत ते उठले. मंत्रीच रोज उपलब्ध असणार ही बातमी सर्वत्र पसरताच शिंदे कॉलनीतल्या त्या कार्यालयात गर्दी होऊ लागली. मग ठरलेल्या वेळी ते कार्यालयात पोहोचताच उत्साहित शिवसैनिकांनी ‘ए भुतांनो, परत जा परत जा’ असे नारे देत त्यांचे स्वागत केले. लोकांना भेटण्याआधी त्यांनी कार्यालयात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या लिंबू-मिरच्या फेकायला लावल्या. अभ्यागतांची कामे मार्गी लावता लावता दोन तास गेले. तेवढ्यात अचानक कक्षाची दारे आपोआप उघडझाप करू लागली. त्यात हजर असलेल्या दोघांना गळा आवळला जातोय असा भास होऊ लागला. हे कळताच पळापळ होऊन क्षणात कार्यालय ओस पडले. आता काय करायचे ते गुलाबरावांना कळेना. त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते मांत्रिकांची नावे सुचवू लागले. त्यावर ते भडकले. माझे मंत्रीपद घालवता काय असे म्हणत त्यांनी सर्वांना चूप केले.
याच इमारतीत राहणाऱ्या निवासी गाळेधारकांना भुतांचा त्रास नाही, मग इथेच तो का हा प्रश्न त्यांना छळू लागला. तेवढ्यात एक सैनिक म्हणाला, ‘‘साहेब तुम्ही इथून निघा, आम्ही करतो या भुतांचा बंदोबस्त.’’ जे काही व्हायचे ते माघारी होऊ दे म्हणत ते उठले. नंतरचे आठ दिवस या कार्यालयाचा संपूर्ण परिसर सैनिकांनी सील करून टाकला. कुणालाही या परिसरात फिरकू दिले नाही. या काळात तिथे नेमके काय झाले? काही पूजाअर्चा झाली का याची माहिती गुप्त ठेवण्यात आली. नवव्या दिवशी हा भाग नागरिकांसाठी खुला करण्यात आला तेव्हा कार्यालयाच्या अगदी प्रवेशद्वाराच्या बाजूला चपलाजोड्यांचे एक मोठे दुकान सुरू झालेले लोकांना दिसले. नंतरच्या आठ दिवसांत एकदाही भुतांचा त्रास झाला नाही, त्याला कारण हे नवे दुकान याची महती सैनिकांनी पटवून दिल्यावर गुलाबरावांनी मोठ्या आनंदाने कार्यालय उद्घाटनाची तारीख जाहीर केली.