नियोजित कार्यक्रम आटोपून शासकीय बंगल्यावर परतलेले मंगलप्रभातजी सुरक्षारक्षक, स्वीय साहाय्यकांची पांगापांग होईस्तोवर पोर्चमध्ये उभे होते. सर्वजण निघून गेल्यावर हळूच त्यांनी खाजगी वाहन बाहेर काढले. पंधराव्या मिनिटाला ते इच्छित स्थळी पोहोचले तेव्हा मानसोपचारतज्ज्ञ त्यांची वाटच बघत बसले होते. रुग्णालयात कुणीच नाही हे बघून त्यांना हायसे वाटले. नेमका त्रास काय असे डॉक्टरांनी विचारताच धडाधडा ते सांगू लागले. ‘अलीकडे मला नावे बदलण्याचे व्यसन जडलेय.
सुरुवातीला पक्षाचे धोरण म्हणून मी या ‘बदल’ कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतला. माझ्या खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व औद्याोगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलली. २०१४ लाच स्वातंत्र्य मिळाले हे जनतेवर ठसवण्यासाठी विविध ठिकाणची ब्रिटिश नावे काढून टाका यासाठी आग्रह धरू लागलो. केईएममधील एडवर्ड हे नाव काढा हा त्यातूनच घडलेला प्रकार. त्यावर त्या संजयचा भोंगा वाजला पण त्याकडेही नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. खरी स्वातंत्र्यनिष्ठा सिद्ध करण्यासाठी हीच कृती योग्य अशी मनाची समजूतही घातली. यावर बराच विचार केल्यामुळे की काय पण त्याच दिवशीपासून मला समोर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे नाव बदलण्याचा मोह सुटला. गेल्या तीन दिवसांत तो इतका वाढला की मी हैराण झालोय.’
हे ऐकून डॉक्टरांनी आ वासला. मग म्हणाले. ‘नेमके काय झाले ते सांगा’ मग ते पुन्हा सांगू लागले. ‘वाहनातून जाताना रस्त्यावरच्या दुकानांची नावे बघून मला ‘या’ ऐवजी ‘हे’ नाव ठेवले तर असे तीव्रतेने वाटू लागते. एकदा तर इतकी उबळ आली की वाहन थांबवून दुकानदाराला ‘बानासन्स’ ऐवजी ‘बाना उद्याोगसमूह’ असे नाव ठेव म्हणून दरडावले. माझा साहाय्यक मध्ये पडला म्हणून वाद वाढला नाही. नाव बदलण्यासाठी कुणीच नजरेला पडत नाही तेव्हा मी चालक व साहाय्यकांनाच तुमची नावे बदलून अमुक अमुक ठेवा असा आग्रह धरू लागलो. घरी एकटाच होतो तेव्हा ही ऊर्मी दाटून आल्यावर मोबाइलमधील नावेच बदलून टाकली. त्यात सीएमचे डीसीएम कसे झाले ते कळलेच नाही.
मग देवाभाऊंना लावलेला फोन एकनाथरावांकडून उचलला जाऊ लागला. बराच गोंधळ उडाला. बदललेल्या नावांऐवजी त्यांची मूळ नावे नमूद करताना पुन्हा नवी नावे सुचायला लागली. शेवटी नाद सोडला व संपूर्ण मोबाइलमधली माहितीच काढून टाकावी लागली. खात्याचे कामकाज सांभाळतानाही असेच व्हायला लागले. एखादी फाइल समोर आली की त्यातला मजकूर मी वाचतच नाही. नावे वाचतो. मग नवे काय देता येईल यावर विचार करू लागतो. यामुळे फाइलचा ढीग साचला आहे. माझ्यात निर्माण झालेला हा नामांतराचा कौशल्य विकास आता मलाच छळू लागला आहे. प्लीज डॉक्टर काहीतरी करा. उपचार द्या व कुणाला सांगू नका’ असे म्हणताना त्यांचे डोळे भरून आले.
मग डॉक्टरला दया आली. ‘तुम्ही १९४७ मध्येच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले व या देशावर कधीकाळी मुघल व ब्रिटिशांची सत्ता होती हे वाक्य मंत्रासारखे सकाळी व रात्री एकशे एक वेळा म्हणा. आपसूकच हे व्यसन जाईल व तुम्हाला आराम पडेल.’ यामुळे खुशीत आलेले मंगलप्रभातजी दिवस-रात्र हेच वाक्य म्हणू लागले तशी भाजपमध्ये चर्चा सुरू झाली. ‘लोढा फितूर निघाले’.

