‘मी… पक्षसाक्षीने शपथ घेतो की… पक्षाने स्थापित केलेल्या धोरणानुसार मंत्री म्हणून माझे कर्तव्य पार पाडेन. माझ्या या कार्यकाळात न्याय अन्यायाचा विचार न करता पक्षाच्या फायद्यासाठी जे जे योग्य असेल ते अमलात आणण्यासाठी कुठलीही चाड न बाळगता प्रयत्नरत राहीन. सरकार हे सर्व जनतेचे प्रतिनिधित्व करणारे असते या आता कालबाह्य ठरलेल्या संकल्पनेला त्यागून मी पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी हातभार लावलेल्या सर्व मतदारांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहीन. मंत्री म्हणून दायित्व पार पाडताना मी कधीही स्वहिताचा विचार करणार नाही. केवळ पक्षहिताचाच करेन. पक्षाने आखून दिलेली कर्तव्ये पार पाडताना गुप्तता न बाळगता सर्व गोष्टी सार्वजनिकरीत्या चव्हाट्यावर आणेन.

जिथे जिथे माझ्या पक्षाला तसेच सत्तेत सहभागी असलेल्या मित्रपक्षांना निवडणुकीत यश मिळेल तिथे निधीवाटपात मी कधीही हात आखडता घेणार नाही. गेल्या ११ वर्षांत विरोधक हा शब्दच अस्तित्वहीन ठरवण्याच्या पक्षाच्या प्रयत्नांना आता मोठे यश मिळू लागले असले तरी काही ठिकाणी या संदर्भात मतदारांमध्ये जाणीवजागृती करण्यात पक्षाला अद्याप यश आलेले नाही. अशा ठिकाणच्या मतदारांना विरोधकांविना लोकशाही कळावी म्हणून निधी न देण्याची सौम्य शिक्षा देण्यात मी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावेन. यानंतरही मतदारांमध्ये सुधारणा झाली नाही तर ही शिक्षा अधिक कठोर कशी करता येईल यावर पक्षाशी सल्लामसलत करून निर्णय घेण्यास बांधील असेन.

सर्वंकष सत्ता हे पक्षाचे ध्येय असून ते पूर्णत्वास नेण्यासाठी मी निष्ठापूर्वक प्रयत्न करेन. सरकारी तिजोरीत जमा होणारा पैसा हा सर्वसामान्य जनतेच्या मालकीचा हा गैरसमज सर्वदूर मोठ्या प्रमाणावर पसरला असून तो दूर करण्यासाठी मंत्री म्हणून मी प्राणपणाने झटेन. ज्याची सत्ता त्याचीच सरकारी तिजोरीवर मालकी ही आधुनिक लोकशाहीत रुजवली जात असलेली व्याख्या सामान्य जनतेच्या मनात ठसवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन. मंत्रीपदाच्या संपूर्ण कार्यकाळात सरकारने हे केले, ते केले असे कधीच म्हणणार नाही. मी हे केले किंवा फार फार तर आम्ही वा आमच्या पक्षाने हे केले असेच ‘वैधानिक’ शब्द मी कायम वापरत राहीन.

२०१४ नंतरच्या नव्या विकसित भारतात मतदार हा राजा हे समीकरण आता बाद ठरले असून सत्तापक्षांच्या निवडणूक चिन्हांवर जिवापाड प्रेम करणारा मतदारच राजा असेल आणि याकडे पाठ फिरवणारे मतदार शत्रू असतील. हे गृहीतक सर्वांना पटवून देण्यासाठी मी दिवसरात्र मेहनत करेन. मी अधिकची शपथ घेतो की पालकमंत्री म्हणून मला नियुक्त केल्यावर त्या जिल्ह्यातील सर्वप्रकारच्या मालमत्तांवर माझा अधिकार असेल व पक्षीय धोरण बघून मी त्या अधिकाराचा वापर करेन. विरोधकमुक्त सत्ता हा पक्षाच्या धोरणाचाच एक भाग असून त्याचे पालन सर्व पातळ्यांवर होईल यावर मी लक्ष ठेवेन. निधी आणि विकासकामे हेच आमच्या पक्षाचे (आणि सरकारचेही) धोरण असून जिथे पक्षाला यश मिळाले अशा ठिकाणी ते राबवणे हा माझ्या कर्तव्याचा भाग असेल.’ कमळ व धनुष्यबाण दिसले तरच निधी, मशाल निघाली तर नाही हे विधान ऐकल्यावर उत्साहित झालेल्या एका कार्यकर्त्याने आणून दिलेला हा शपथेचा नमुना वाचून नितेश राणे भलतेच खूश झाले. यात सुरुवातीला स्वत:चेच व नंतर पक्षाचे नाव टाकले की झाले. आता अशीच शपथ घ्यायला हवी. मग कुणाला माझी विधाने चूक ठरवण्याचा अधिकारच उरणार नाही असे म्हणत ते तातडीने देवाभाऊंच्या भेटीला वर्षाकडे निघाले.