काँग्रेसी विचारांचा माणूस लोकसभेत पाठवणार्या सांगलीत धर्मजागरण मेळाव्याला झालेली गर्दी बघून शरदराव सुखावले. ‘नथुराम’ला असाच प्रतिसाद दिला असता तर प्रयोग थांबवावे लागले नसते असे शब्द त्यांच्या ओठावर आले पण त्यांनी ते गिळले. ‘धर्माभिमानींनी महागाईला कसे सामोरे जावे’ या विषयावर जोरदार व्याख्यान दिल्यानंतर अनुभव कथनासाठी लोकांनी व्यासपीठावर यावे असे आवाहन त्यांनी करताच काही मोजके समोर आले. त्यातला पहिला सांगू लागला. ‘प्लंबर व वायरमन कितीही उर्मट असला तरी आपल्याच धर्माचा हवा या आवाहनाला प्रतिसाद देत मी नळकामासाठी प्लंबरला बोलावले. काम छोटेच होते पण तो हजार रुपये म्हणाला. धर्मासाठी खिशाला चाट बसली तरी हरकत नाही असे म्हणत त्याला हो म्हटले. तो घरी आल्यावर मलाच कामे सांगायला लागला. काम करत असताना इमारतीच्या मागे एक मोठा पाइप हातात देऊन मला उन्हात उभे केले. नंतर पाइप भिंतीवर फिट करताना मलाच शिडीवर चढवले. एकदा तर मी पडता पडता वाचलो, पण धर्मासाठी सारे सहन करण्याची तयारी ठेवलीच होती. दुरुस्ती सुरू असताना पाण्याचा प्रवाह बंद करण्यासाठी मलाच चारदा गच्चीवर पाठवले. यामुळे झालेली दमणूक मी सहन केली.
(एकटे शरदरावच टाळ्या वाजवतात) काम पूर्ण झाल्यावर ते सांगितल्यापेक्षा जास्त निघाले म्हणून त्याने जास्तीचे हजार रुपये घेतले. मी हरकत घेताच त्याने कपाळावरच्या टिळ्याकडे बोट दाखवताच मी धर्मासाठी गप्प बसलो.’ मग दुसरा ध्वनिक्षेपकावर आला. ‘माझ्या घरात विजेची समस्या निर्माण झाली. खूप शोध घेतल्यावर मला इच्छित असा वायरमन सापडला. सुरुवातीचे दोन दिवस तो कबूल करूनही आला नाही. त्यामुळे अंधारात राहावे लागले. धर्मसंस्कार शिकवणारे मंत्र म्हणून ते दोन दिवस ‘मजेत’ काढले. गर्मीचा अजिबात त्रास झाला नाही. तो टोलवाटोलवी करतोय हे बघून शेवटी मीच त्याला माझ्या स्कूटरवर बसवून घेऊन आलो. धर्मबांधव म्हणून नाश्ता, चहा दिला पण तो एरवी हजारात होणार्या कामाचे चार हजार मागू लागला. वारंवार शरदरावांचे नाव घेत तो आम्हालाच हा वायर पकडा, हे बटन हातात धरा अशी कामे सांगत होता. मी शांतपणे सहन केले.
काम पूर्ण करून तो निघून गेल्यावर पुन्हा वीज गेली. मग त्याच्या मागे न लागता मी नवा वायरमन शोधण्याचा प्रयत्न सुरू केला जो अजून मिळाला नाही, पण मी अजिबात चिडचिड केली नाही.’ हे दोन्ही प्रसंग ऐकून आनंदित झालेल्या शरदरावांनी सभेत घोषणा केली. ‘आता इंधनवाढीवरचा उपाय म्हणून सर्वांनी थेट मिरजेपर्यंत चालत जायचे. लक्ष्य पूर्ण करणार्यांना तिथे ‘धर्मनिष्ठ’ असे प्रमाणपत्र मिळेल.’ शरदराव चालू लागताच हजारोंचा जमाव त्यांच्यामागून घोषणा देत निघाला. अध्र्या किलोमीटरनंतर त्यांनी मागे वळून बघितले तर मोजकेच लोक. तेवढ्यात त्यांना काही लोक दुचाकीवर बसून पुढे जाताना तर काही अन्य धर्मीयांना लिफ्ट मागून पुढे जात असल्याचे दिसले. अनेकजण मधूनच माघारीही फिरत होते. धर्मासाठी लोक एवढेही चालू शकत नाहीत हे बघून त्यांना दु:ख झाले पण जागरणाचे प्रयत्न सोडायचे नाहीत हे त्यांनी ठरवले. शरदराव मिरजेत पोहोचले तर तिथे प्रमाणपत्रांसाठी झुंबड उडालेली. खेचाखेचीत अनेकांची प्रमाणपत्रे फाटून गेलेली. शंभर वर्षांत यांना शिस्त लावू शकलो नाही अशी खंत व्यक्त करत ते गर्दीपासून दूर उभे राहिले. ती ओसरल्यावर त्यांच्या लक्षात आले, आयोजकही पळाले. मग ते एकटेच पुन्हा सांगलीच्या दिशेने पायी निघाले.

