सलग तीन दिवसांचा नागालँड व महाराष्ट्राचा दौरा आटोपून दिल्लीत परतलेले कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान बंगल्याच्या हिरवळीवर निवांत बसले होते. तेवढ्यात त्यांच्या प्रसिद्धीचे काम सांभाळणारे दोन सहाय्यक लगबगीने आले व वर्तमानपत्रांची कात्रणे, वाहिन्या तसेच समाजमाध्यमांवरून प्रसारित झालेल्या चित्रफिती दाखवू लागले. एका चित्रफितीवर ते थबकलेच. ‘बापरे, तब्बल दहा लाख व्ह्यू’ असे म्हणत त्यांनी ती पुन्हा पुन्हा बघायला सुरुवात केली. ‘रास्ते पर बिकनेवाली खिरी खरीद कर खाना तो हर मध्य प्रदेशवासी के जीवन का अभिन्न अंग है’ असे ते पुटपुटले. कसलेच नावीन्य नसलेली ही बाब भक्तांना कशी काय नावीन्यपूर्ण वाटली याचे कोडे त्यांना उमगेना! सहाय्यकांना सांगावे की नाही यावर त्यांनी विचार केला. प्रसिद्धी मिळतेय, तर कशाला गुपित फोडायचे असे मनाशी म्हणत ते शांत बसले.
आम्ही नर्मदेच्या खोऱ्यात राहणारे लोक. नदीच्या पात्रातली काकडी खाणे हा आमचा धर्म. मंत्री असणे वा नसण्याशी याचा काहीच संबंध नाही. तरीही देशभरातील भक्तांना मी ताफा थांबवून काकडी विकत घेतली हे जाम आवडलेले दिसते. अनेकांनी याचा संबंध माझ्या मंत्रीपदाशी जोडत सात दशकांत असा कृषीमंत्री बघितला नाही, असेही म्हटले. सध्या ‘ट्रेंडिंग’वर हीच चित्रफीत आहे. याचा अर्थ आणखी चार, पाच दिवस तरी आपलीच चर्चा देशभरात होणार असा विचार मनात येताच मामा कमालीचे सुखावले. म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ मागे पडले की काय अशी शंका मनी येताच त्यांनी जीभ चावली.
मंत्री म्हणून दौरे करताना ताफा थांबवून भाज्या, फळे विकत घ्यायची. विक्रेते शेतकऱ्यांशी संवाद साधायचा ही जाणीवपूर्वक आखलेली योजना आता देशभर लोकप्रिय होतेय हे बघून त्यांचे मन समाधानाने भरून आले. आपल्याला आवडणारी काकडी, भाजीपाला याच काळात रस्त्यावर मिळतो. एकदा पावसाळा सुरू झाला की शेतकरी मशागतीत व्यग्र होतात. रस्त्यावर फारसे कुणी दिसत नाही. त्यामुळे आताच उन्हाच्या झळा सहन करत जास्तीत जास्त दौरे करायचे. वाटेत थांबायचे. प्रसिद्धी कशी मिळेल ते सहाय्यक बघतीलच. बाकी या कृतीला सर्वदूर पसरवायला भक्त आहेतच. पावसाळा सुरू झाला की चिखलाचे साम्राज्य असते. चिखल तसाही आपल्याला आवडत नाहीच. मागे मुख्यमंत्री असताना तो तुडवावा लागू नये म्हणून सुरक्षारक्षकांनी उचलून घेतले होते. तेव्हा केवढी किरकिरी झालेली. कसेबसे त्या वादावर पांघरूण घातले. आता नव्याने काही नको. त्यातल्या त्यात देशाच्या शेतीची जबाबदारी आता आपल्यावर. त्यामुळे पावसाआधी जेवढे भटकायचे तेवढे भटकून घ्यायचे. घरी न जेवता रस्त्यातल्या काकडीवरच दिवस काढायचा. लहानपणी करत होतो अगदी तसेच, असे मनाशी ठरवत ते आता कोणत्या राज्यात जायचे यावर विचार करू लागले. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला.
राष्ट्रीय माध्यमांचे प्रतिनिधी काकडीवर ‘बाइट’ घेण्यासाठी येत आहेत म्हणून. त्यांच्याशी बोलताना मध्य प्रदेश व काकडीचे नाते अजिबात सांगायचे नाही, असे स्वत:ला बजावत ते सावरून बसले. नेमके तेव्हाच त्यांच्या ताफ्यातील चालक वाहनांच्या डिक्कीतून खराब झालेल्या काकड्या, भाजीपाला व फळांच्या पिशव्या फेकण्यासाठी म्हणून बाहेर काढत होते. हे बघून चिडलेल्या मामाजींनी त्यांना तात्काळ रोखले व मग त्यांचा आंबा तर आपली काकडी असे म्हणत ते बाइटसाठी सज्ज झाले.